इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 10:01 AM2023-11-13T10:01:21+5:302023-11-13T10:23:51+5:30

नव्या समाजरचनेत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आल्याने साऱ्या समाजाच्या कल्याणाचा विचार मागे पडतो आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

We hope that Diwali will be worshiped at home and our native Indian culture will shine. | इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय!

इडापिडा टळो... सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढतेय!

‘इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’  असे म्हणत आपण बळीराजाचे हजारो वर्षांपासून आजही स्मरण करतो आहोत. अशा सर्वगुणसंपन्न राजाची दिवाळीत घराघरांत पूजा व्हावी आणि आपली मूळ भारतीय संस्कृती उजळावी, अशी अपेक्षा करत असतो. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत जीवसृष्टीच्या साथीने जगण्याची संकल्पना खूप मौल्यवान आहे. अपेक्षा, संकल्पना आणि संस्कृती ही नेहमीच आदर्शवत मूल्यांवरच पुढे जात राहते. तिला छेद देणाऱ्या घटना-घडामोडींचा कोणी गर्व करीत नाही. हीच मनोधारणा असते. अशा परंपरेच्या पार्श्वभूमीवर आपला परिवार, गाव-शहर, राज्य-देश ते जगाच्या कक्षा जिथपर्यंत व्यापल्या आहेत, तेथे मानवी कल्याणाच्या मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी नवे काही घडते आहे, की काही बिघडते आहे, याचा विचार करण्याची दिवाळी ही एक मोठी संधी असते. कारण माणूस नेहमी अपेक्षित यशाच्या-आशेच्या प्रतीक्षेत जगत असतो. मात्र, नव्या समाजरचनेत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाला महत्त्व आल्याने साऱ्या समाजाच्या कल्याणाचा विचार मागे पडतो आहे का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे.

महाराष्ट्रातील विविध आंदोलने पाहा. त्यावर समाजमंथन नकारात्मक होते आहे, याची चिंता वाटते. बिहारने जातनिहाय जनगणना केल्यानंतर तेरा कोटी जनतेचे जीवनमान काळाच्या कसोटीवर तपासले, तर किती दुर्बल आहे, याची राज्यकर्त्यांना, विचारवंतांना आणि नियोजनकारांना चिंता पडावी, असे हे उघडेनागडे वास्तव आहे. मणिपूरच्या अवस्थेवर गेली सहा महिने आरोप- प्रत्यारोप करीत राहिलो. मात्र, मणिपुरी जनतेच्या हालअपेष्टा संपत नाहीत. परस्परातील विश्वासाच्या नात्याला तडे गेले आहेत. त्याला जोडण्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. देशाच्या विविध प्रदेशांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतो आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये आपण हे पाहिले. मध्य भारतात कमी झालेल्या पावसाने कृषी संस्कृतीतील दोन्ही हंगाम वाया गेल्यात जमा आहेत. या साऱ्याचा परिणाम माणूस मोठ्या संख्येने स्थलांतरित होऊन दोन वेळच्या अन्नाची तजवीज करतो आहे. अशा धडपडीतूनही बळीराजाचे स्मरण करून समाजधुरीणांनी काही सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी प्रार्थना आपण दिवाळीनिमित्त करीत असतो. 

महाराष्ट्राला तर सुमारे हजार वर्षांची संतांची परंपरा आहे. संतांनी समाजातील व्यंगांवर वार केले. अपप्रवृत्तीचा तिरस्कार करून माणसांचा व्यवहार अधिक चांगला व्हावा, अशी अपेक्षा करीत समाजाचे प्रबोधन केले, याचा अर्थ संतांना सारे व्यंग किंवा अपप्रवृत्तीच दिसत होती, असा आक्षेप घेऊ शकत नाही. आपली जबाबदारी, कर्तव्ये आणि व्यवहार नीट करणे यात नावीन्य नाही. याउलट अपप्रवृत्तीवर वार करून समाजासमोरच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे कार्य करणाऱ्याला युगप्रवर्तक म्हणतात, तसे होताना दिसत नाही. आजूबाजूचे वर्तमान अस्वस्थ करणारे आहे. परंपरेप्रमाणे उपेक्षित वर्ग आणि महिला आजही अत्याचाराच्या शिकार होताना दिसतात. उत्पन्नाची साधने नसणारे अधिकच गर्तेत जात आहेत. त्यांना आधार देणाऱ्या धोरणांची अपेक्षा आहे. ऊन, वारा, पाऊस, पाणी ते जीवसृष्टीचे संवर्धन ते नवे विकास कार्य करताना सर्वांना बरोबर घेण्याची गरज अधिकच अधोरेखित होत आहे. यासाठी बळीराजाची प्रार्थना करावी आणि दिवाळीनिमित्त सदिच्छा व्यक्त केली गेली पाहिजे. 

या साऱ्यासाठी सत्तेचा सोपान हाती घेऊन बसलेल्यांची जबाबदारी वाढते आहे. समान मूल्यांच्या आग्रहाने राज्यव्यवस्थेची रचना केली आहे. त्यांनी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. विविध राज्यांत सरकार आणि राज्यपालांचा संघर्ष चांगला नाही. संसदेच्या नैतिकता समितीचा व्यवहार आणि चौकशीचा फार्स योग्य नाही. निवडणुका चालू आहेत, त्यातील पैशांचा, जातीपातींचा वापर फारच चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या काही जागा रिक्त आहेत. त्याला तीन वर्षे झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांना पक्षाघात व्हावा, अशी अवस्था आहे. शेती आणि आरक्षणासाठी आत्महत्या चालू आहेत. अशा अंध:कारात जगण्याची सवय करून घेण्याऐवजी त्यातून नवा मार्ग शोधणारा संकल्प दिवाळीनिमित्त करायला हवा आहे. सण-समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम हे त्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असते. आपल्या जीवनातील इडापिडा टळून जावो आणि मूल्यसंवर्धन करणारे बळीराजाचे राज्य येवो, अशी अपेक्षा करूया!

Web Title: We hope that Diwali will be worshiped at home and our native Indian culture will shine.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.