घर मिळवण्याचा हटके मार्ग
By Admin | Updated: August 14, 2016 02:59 IST2016-08-14T02:59:36+5:302016-08-14T02:59:36+5:30
एका भाड्याच्या घरातून सुरू झालेली एक संकल्पना आज जगभरातील पर्यटकांसाठी स्थानिक आणि जागतिक स्तरावर राहण्यासाठी घर मिळवण्याचा पहिला पर्याय बनला आहे. आज अनेक

घर मिळवण्याचा हटके मार्ग
- कुणाल गडहिरे
एका भाड्याच्या घरातून सुरू झालेली एक संकल्पना आज जगभरातील पर्यटकांसाठी स्थानिक आणि जागतिक स्तरावर राहण्यासाठी घर मिळवण्याचा पहिला पर्याय बनला आहे. आज अनेक नामांकित सेलीब्रिटी, व्यावसायिक, उद्योजक एअर बीएनबीचा वापर करतात. आतापर्यंत ६ करोडहून अधिक लोकांनी एअर बीएनबीचा वापर केला आहे. जगभरातील १९१ हून जास्त देशांत २० लाखांहून जास्त निवासस्थानाचे पर्याय एअर बीएनबीवर उपलब्ध आहेत. एकेकाळी ज्या कंपनीला ती चालवण्यासाठी फूड पॅकेट्स विकावे लागले होते त्या कंपनीचं बाजारमूल्य आज ३० बिलियन डॉलर्स इतकं आहे.
ब्रायन चेस्की आणि जो जेबिया हे जेमतेम २६ वर्षांचे दोन तरुण सॅन फ्रान्सिस्को शहरात एका डिझाइन कॉन्फरन्ससाठी आले होते. ते दोघे एकत्र राहत असले तरी जागेचं भाडं त्यांना परवडत नव्हतं आणि म्हणून आपल्यावरचा आर्थिक भार थोडा हलका व्हावा या इतक्याच उद्देशाने त्यांनी ते राहत असलेल्या जागेत, त्यांच्यासोबतच आणखी काही गरजूंना तात्पुरत्या निवासाची सोय भाडे आकारून करायचे ठरवले. मात्र हे करताना भाडेकरू थोडे लवकर मिळावेत आणि सातत्य असावं यासाठी त्यांनी, भाडेकरूंना सकाळचा नाश्ता आणि रात्री झोपण्यासाठी हवा भरून वापरता येईल अशा सोफ्याची (एअर मॅट्रेस) सोय केली. आता अशा प्रकारच्या तात्पुरत्या निवासाची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे याची जाहिरात करावी लागणार होती. तेव्हा अमेरिकेत अशा प्रकारच्या जाहिराती या क्रेगलीस्ट या वेबसाइटवर केल्या जात असत. परंतु या दोघांनी हे थोडंसं वेगळ्या प्रकारे करायचं ठरवलं. त्या वेळी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आणखी एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. मात्र शहरातील हॉटेलांमध्ये जागा नव्हती आणि म्हणून मग त्यांनी जागेच्या फोटोसहित ते देत असलेल्या सुविधांची माहिती देणारी स्वतंत्र वेबसाइट बनवली. दोघांची ही कल्पना तेव्हा उत्तम जमून आली आणि त्यांना तीन भाडेकरू मिळाले. सॅन फ्रान्सिस्को शहरात अशा प्रकारे राहण्याची उत्तम सोय आहे ही माहिती कळल्यानंतर त्यांच्याकडे राहण्याची सोय होऊ शकते का याची चौकशी करणारे अनेक ई-मेल त्यांना येऊ लागले. हे ई-मेल फक्त अमेरिकाच नव्हे तर लंडन आणि जपानसारख्या ठिकाणांहूनदेखील आले होते. आणि त्या क्षणाला या संकल्पनेची गरज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक स्वरूप ब्रायन आणि जो या दोघांच्या लक्षात आलं.
त्यांची वेबसाइट तेव्हा एअर बेड अॅण्ड ब्रेकफास्ट या नावाने ओळखली जात होती. आपली संकल्पना ही स्टार्ट अप म्हणून प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी त्यांनी नेथन ब्लेकरझिक या त्यांच्या मित्राची मदत घेतली. नेथनने हार्वर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यामुळे त्यानेच नव्याने व्यावहारिक दृष्टिकोनातून कंपनीची वेबसाइट बनवली. परंतु प्रत्यक्ष ही संकल्पना राबवताना त्यांना अपेक्षित व्यावहारिक यश मिळत नव्हतं. एकूणच आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि तेव्हा पैसे कमावण्यासाठी या मित्रांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कल्पकतेने वापर केला. बराक ओबामा आणि मॅक केन या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकांना त्यांची फूड पॅकेट्स विकायला सुरुवात केली. या पॅकेट्सवर ते ओबामा आणि मॅक केन यांची छायाचित्रे छापत होते. त्यामुळे दोघा उमेदवारांच्या समर्थकांकडून त्यांना प्रतिसाद मिळत होता आणि त्यातून मिळालेल्या पैशांवर कंपनीचं काम चालत होतं. मात्र हे समीकरण फार वेळ चाललं नाही आणि शेवटी या मित्रांना मॅक केन यांचे ब्रॅण्डिंग असणाऱ्या उरलेल्या फूड पॅकेट्सवर आपली भूक शमवावी लागत होती. २००९ पर्यंत एक जबरदस्त संकल्पना आणि शून्य पैसे अशी परिस्थिती असताना वाय कॉम्बिनेटर या नामांकित स्टार्ट अप्स प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. त्यांच्याकडून त्यांना सुमारे वीस हजार डॉलर्सची फंडिंग मिळाली. तिथे मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना आपली संकल्पना आणखी परिणामकारकपणे व्यावसायिक समीकरणात बांधता आली. त्यानंतर त्यांना आणखी दोन गुंतवणूकदार संस्थांकडून गुंतवणूक मिळाली. तर काही गुंतवणूकदारांनी त्यांना परतदेखील पाठवले. ते गुंतवणूकदार आज त्यांच्या या निर्णयाचा जाहीर पश्चात्ताप करतात आणि ती आपली सर्वत मोठी चूक असल्याचे मान्य करतात. आता वेबसाइट फक्त एअर बीएनबी या नावाने ओळखली जात होती. एकीकडे गुंतवणूकदार मिळत असताना जास्तीत जास्त जागा आपल्या वेबसाइटवर राहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. या वेळी ज्या क्रेगलीस्टला सुरुवातीला ब्रायन आणि जो यांनी टाळून स्वत:ची वेबसाइट सुरू केली होती, त्याच क्रेगलीस्टचा त्यांनी कल्पकतेने वापर करून मोठ्या प्रमाणात लोकांना आणि जागेच्या मालकांना आपल्याकडे आकर्षित केले. त्यासाठी त्यांनी एक कॉम्प्युटर प्रोग्राम (बॉट) तयार केला आणि त्या माध्यमातून क्रेगलीस्टवर आपले घर भाड्याने देण्याची जाहिरात करत असलेल्या घरमालकांना त्या प्रोग्रामच्या माध्यमातून एअर बीएनबीची माहिती देणारे ई-मेल जात होते. हे काम प्रोग्रामच्या माध्यमातून होत असल्याने अतिशय कमी वेळात त्यांनी क्रेगलीस्टचा वापर घर भाड्याने देण्यासाठी करणाऱ्या लोकांना मोठ्या संख्येने आपल्याकडे वळवले आणि यातल्या जवळपास सगळ्यांनीच कालांतराने क्रेगलीस्टचा वापर करणंच बंद केलं. स्टार्ट अप्स जगतात ही एक नावाजलेली ग्रोथ हॅकिंग स्ट्रॅटेजी म्हणून ओळखली जाते.