जल-अभियांत्रिकी आणि पाणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:30 IST2019-08-13T04:29:54+5:302019-08-13T04:30:46+5:30
- सुलक्षणा महाजन नगररचनातज्ज्ञ वर्षाचे चार-पाच महिने सोडले तर उन्हाळा आणि पावसाळ्याच्या ७-८ महिन्यांच्या कालावधीत वर्तमानपत्रांमध्ये सर्वात जास्त चर्चा ...

जल-अभियांत्रिकी आणि पाणीबाणी
- सुलक्षणा महाजन
नगररचनातज्ज्ञ
वर्षाचे चार-पाच महिने सोडले तर उन्हाळा आणि पावसाळ्याच्या ७-८ महिन्यांच्या कालावधीत वर्तमानपत्रांमध्ये सर्वात जास्त चर्चा असते ती दुष्काळ आणि पूर यांची. हवामान आणि गुंतागुंतीचा भूगोल यांच्याभोवती भारतामधील सर्व समाजकारण आणि अर्थकारण फिरत असते. नेमेची येतो पावसाळा आणि दुष्काळ! त्याचे आपल्या जनजीवनावर होणारे विपरीत परिणाम आपण नित्यनेमाने अनुभवत असतो. गेल्या शतकापासून पाणी व्यवस्थापन हा विषय आधुनिक अभियांत्रिकी क्षेत्राशी जोडला गेला आहे. विशेषत: वाढती लोकसंख्या, वाढती शहरे, औद्योगिकीकरण आणि शेती यांच्यातील वेगवान बदलांच्या नात्यासंदर्भात पाणी हा विषय खूपच गुंतागुंतीचा झाला आहे.
विसाव्या शतकात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. शहरी आणि शहरांभोवती विस्तारलेल्या नागरिकांचे प्रमाण तर १५ टक्क्यांवरून ६० टक्के झाले. हे घडू शकले ते केवळ आधुनिक अभियांत्रिकी क्षेत्र आणि तज्ज्ञ मंडळींमुळे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. जल-अभियांत्रिकीचा पाया भारतामध्ये खऱ्या अर्थाने घातला तो भारतरत्न सर विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) यांनी. ग्रामीण भागातील शेतीचे आणि शहरातील पाण्याचे व्यवस्थापन अतिशय वेगळ्या पद्धतीने करावे लागते. त्यासाठी पाण्याचे गुणधर्म आणि अभियांत्रिकी तंत्रे माहीत असावी लागतात तसेच स्थानिक हवामान, भूगोल, समाज आणि लोकसंस्कृती तसेच आर्थिक क्षमतांचेही भान असावे लागते. शिवाय जल अभियांत्रिकीच्या तंत्रज्ञांना बांधकाम शास्त्र, जलविद्युत आणि यंत्रतंत्रांचेही ज्ञान असावे लागते. सर विश्वेश्वरय्या यांना ते होते आणि म्हणूनच त्यांना जागतिक क्षेत्रात मान मिळाला होता. त्यानंतर गेल्या ५० वर्षांमध्ये जल-अभियांत्रिकीच्या क्षेत्रात पर्यावरण, माहिती आणि संगणक शास्त्रे-तंत्रे यांची साथ मिळाल्यामुळे ते क्षेत्र खूप प्रगत झाले आहे. हे सर्व ज्ञान उपलब्ध होऊन, भारतामध्ये आणि विशेषत: महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हजारो अभियांत्रिकी पदवीधर शिकून बाहेर पडत असूनही येथील पाणी-प्रश्न प्रभावीपणे हाताळता आलेला नाही. उलट दुष्काळाचे आणि पुराचे प्रश्न शहरात, महानगरी प्रदेशात उग्र स्वरूपात अनुभवास येत आहेत. याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे जलअभियांत्रिकी आणि नगर नियोजनात असलेला दुरावा. त्याचबरोबर अभियांत्रिकी क्षेत्राच्या प्रभावी वापरासाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ हेही एक कारण आहे.
ग्रामीण किंवा शहरी भागांसाठी आवश्यक असलेल्या जलअभियांत्रिकी क्षेत्राचा राजकीय कारणांसाठी होणारा गैरवापर हे नियोजन आणि आर्थिक तरतुदी या दोन्हीच्या आड येते आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या क्षेत्रावर शासकीय संस्थांची असलेली मक्तेदारी आणि त्यामुळे त्यात होणारे अवास्तव हस्तक्षेप. बांधकाम क्षेत्र हे तर गैरव्यवहारांचे महाआगार झाले आहे. सिंचन घोटाळे, सुमार प्रतीची धरणे, न बांधलेले कालवे, या सर्व शेती-ग्रामीण भागांशी संबंधित समस्या. तर गळणाºया आणि फुटणाºया जलवाहिन्या, पाण्याच्या टँकर माफियांची चोरी, मोजून मीटरने पाणी देण्यासाठी होणारा एकांगी सामाजिक चळवळींचा विरोध, अत्यल्प पाणीपट्टी आणि अपुरी वसुली, पाणीवाटपातील प्रचंड विषमता, अपुरे नियोजन, विजेचा खर्च, अपुºया नळ योजना आणि अर्धवट झालेले आणि वाया गेलेले खर्च, अकार्यक्षम व्यवस्थापन आणि देखभाल दुरुस्तीची हेळसांड अशा अनेक समस्या नागरी पाणीपुरवठा क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातला मक्तेदारी भ्रष्टाचार हा खासगी, स्पर्धात्मक भांडवली व्यवस्थेच्या नफ्यापेक्षा जास्त घातक आहे. असे असूनही खासगी क्षेत्राला होणारा तात्त्विक -राजकीय विरोध हासुद्धा दुष्काळ आणि पूर समस्या सोडविण्यातला मोठा अडथळा आहे.
विश्वेश्वरय्या यांच्या कार्यकर्तृत्व काळामध्ये त्यांनी शासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करून महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध प्रदेशांतील शेती सुजलाम-सुफलाम केली होती. त्याचबरोबर पुणे, म्हैसूर, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई अशा अनेक शहरांच्या पाणीपुरवठा आणि मैलापाणी व्यवस्था अतिशय कार्यक्षम पद्धतीने राबविल्या होत्या. तपशिलात जाऊन प्रदेशातील भूगोल, पर्यावरण, हवामान आणि समाज यांच्या अभ्यासाची जोड त्यांनी अभियांत्रिकीला दिली होती. हे करण्यासाठी त्यांना जसे कार्यस्वातंत्र्य मिळाले होते तसेच आर्थिक स्वातंत्र्य आणि विश्वास राज्यकर्ते आणि नागरिकांकडून मिळाला होता.
कोणत्याही अभियांत्रिकी प्रकल्पाची रचना करण्यासाठी जसे हे सर्व प्रकारचे ज्ञान लागते तसेच ते यशस्वी करण्यासाठी नेतृत्वगुण लागतात. अभियांत्रिकी क्षेत्रात आजही तज्ज्ञांची कमतरता नाही. मात्र दुर्दैवाने येथे त्यांना पुरेसे स्वातंत्र्य नाही, अधिकार नाहीत. पूर्ण आर्थिक विश्वास नाही. तंत्रज्ञांवर विश्वास टाकण्याची आणि मुळात तंत्रज्ञांच्या क्षमतांची आणि मर्यादांची अजिबात जाणीव नसल्यामुळे या क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप मोठा आहे. त्यामुळे सर विश्वेश्वरय्या यांच्यासारखे नेतृत्व भारतामध्ये आज क्वचितच निर्माण होते आहे. आपली पाणीबाणी आपल्याच आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मागासलेपणाच्या प्रक्रियेमुळे गंभीर बनली आहे.