शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

‘गोखले पर्व’ पडद्याआड! अभिनयाची खरी चमक दिसली, ती ‘बॅरिस्टर’मधून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 10:15 AM

रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनेक वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी अफाट क्षमतेने रंगवल्या.

विक्रम गोखले यांची पणजी दुर्गाबाई कामत. भारतीय चित्रपट क्षेत्रातील त्या पहिल्या स्त्री अभिनेत्री. आजी कमला गोखले म्हणजे कमलाबाई कामत या पहिल्या बालकलाकार, तर वडील चंद्रकांत गोखले हे ज्येष्ठ अभिनेते. भारतीय चित्रपटाचा शतकभराचा इतिहास या नावांशिवाय आणि गोखले कुटुंबाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. हा विलक्षण वारसा घेऊन विक्रम गोखले आधी रंगभूमीवर आणि मग रूपेरी पडद्यावर आले. असा वारसा असणे अभिमानास्पद असले तरी ते ओझेही असते. असा वारसा पेलणे सोपे नसते. मात्र, कोणत्याही दडपणाशिवाय अभिनय करणाऱ्या विक्रम गोखले यांचे वैशिष्ट्यच हे की, त्यांचा पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचाही वावर सहजसुंदर होता. त्यात डौल होता. आत्मविश्वास होता. वडील प्रतिभावंत अभिनेते असले तर मुलावर कायम तुलना होण्याचं दडपण असतं. पण वडिलांच्या छायेत कायम राहूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाची वेगळी ताकद दाखवून दिली. त्यांच्या अभिनयाची खरी चमक दिसली, ती ‘बॅरिस्टर’मधून. ‘बॅरिस्टर’ हे जयवंत दळवी यांचे नाटक. समीक्षकांनी दाद दिलेले आणि कलावंतांसाठी आव्हानात्मक असणारे विलक्षण नाट्य या नाटकात आहे. ‘वडिलांबरोबर १९७७-७८च्या काळात ‘बॅरिस्टर’ नाटक केल्यानंतर बाबांनी आत येऊन कडकडून मिठी मारल्याचे आजही आठवते. तेव्हा तू चांगला नट आहेस. पण, इतक्या ताकदीचा नट आहेस हे माहिती नव्हतं’, असे बाबा म्हटल्याचे विक्रम गोखले अभिमानाने सांगायचे.

रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अनेक वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी अफाट क्षमतेने रंगवल्या. ‘कळत नकळत’सारख्या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांवर गारूड केले. मात्र, जितक्या ताकदीच्या भूमिका मराठी चित्रपटांमधून त्यांच्या वाट्याला यायला पाहिजे होत्या, त्या तितक्या फारशा आल्या नाहीत आणि पैशांसाठी तडजोड करणे, हे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मराठी निर्मात्यांची काहीशी नाराजी ओढवून घेतल्याने त्यांना काम मिळणे काहीसे कमी झाले होते. मग त्यांनी आपला मोर्चा हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळविला. तिथेही त्यांनी आपला अमिट ठसा उमटवला. ‘अग्निपथ’, ‘खुदागवाह’, ‘हम दिल दे चुके सनम’सारख्या विविध चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठीपेक्षा त्यांच्या हिंदी चित्रपटांचीच यादी मोठी असल्याचे दिसते. अमिताभसारख्या महानायकासमोर उभे ठाकल्यानंतरही विक्रम गोखले कधी दुबळे वाटले नाहीत. पण, तरीही त्यांचे रंगभूमीबद्दलचे प्रेम कमी झाले नाही. सत्तरीकडे वाटचाल करत असतानादेखील ‘दिल अभी भरा नहीं’ हे नाटक त्यांनी रिमा लागू यांच्यासमवेत उभं केलं. नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसादही मिळत होता. पण अचानक घशाच्या त्रासामुळे नाटकातून अभिनयसंन्यास घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कुठे थांबले पाहिजे, हे उमजणे आणि तशी कृती करणे याला एक कलाकार म्हणून प्रगल्भ धाडसच असावे लागते. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर पुन्हा कधी पाऊल ठेवले नाही. पण, तरीही विक्रम गोखले यांचा आत्मविश्वास ओसरला नाही. जोडीला परखडपणा, स्पष्टवक्तेपणा होताच. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी अनेकदा वादही ओढवून घेतले.

‘दूरचित्रवाणीवरून दाखविल्या जाणाऱ्या मालिका जर पाहण्याजोग्या नसतील, त्यांना दर्जा नसेल तर त्यांना नावं का ठेवता? तुमच्या हातात रिमोट असतो ना? बंद करून टाका ना ते. तुम्ही अशा मालिका बघत राहता. त्यामुळे प्रेक्षकांना असंच हवं असतं, असं म्हणत निर्माते अशा मालिका बनवत राहतात. म्हणून तसा माल बनविणारे मूर्ख की रिमोट असूनही त्याचा वापर न करणारे प्रेक्षक मूर्ख?,’ असा सवाल करणारे विधान करून त्यांनी वादाला तोंड फोडले होते. त्या विधानावरून निर्माते संतापले. अशी वादग्रस्त आणि क्वचित नाहक विधाने करून नंतरच्या काळात ते प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांच्यावर आरोपही होत राहिले. पंख मिटलेल्या कलावंतांसाठी वृद्धाश्रम बांधण्याकरिता त्यांनी चित्रपट महामंडळाला नुकतीच दोन एकर जमीन दान करीत आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविले होते. विक्रम गोखले यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात करिष्मा होता. पडद्यावर ते एक विलक्षण रसायन होतं. त्यांच्या निधनानं भारतीय पडद्यावरचे ‘गोखले पर्व’ काळाच्या पडद्याआड गेले आहे. अर्थात, जोवर चित्रपट नावाची गोष्ट आहे, तोवर हे पर्व अमर आहे. ‘लोकमत समूहा’च्या वतीने विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेbollywoodबॉलिवूडMarathi Actorमराठी अभिनेता