Veermata's heartbeat .. DJ's throat! | वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका !

वीरमातांचा हुंदका.. डीजेचा गलका !

- सचिन जवळकोटे

 यंदाच्या शिवजयंतीतसोलापूरनं छत्रपतींच्या मराठी मातीला नव्या परंपरेचा सुगंध दिला. कोणतीही मिरवणूक म्हटलं की, ज्या गावात बाया म्हणे घराच्या दारं-खिडक्या बंद करून आत बसायच्या, तिथल्याच भगिनी यंदा रात्री बारा वाजता घराबाहेर पडून अनोख्या सोहळ्यात सामील झाल्या. अख्ख्या महाराष्ट्रासमोर नवा आदर्श निर्माण करण्यात सोलापूरचा ‘शिवचौक’ यशस्वी ठरला. याठिकाणी मिळालेला मानसन्मान पाहून कैक वीरमाता-वीरपत्नी सद्गगदित झाल्या. भावुक झाल्या; मात्र.. मात्र दुसºयाच दिवशी मिरवणुकीतील काही मूठभर मंडळांच्या कर्णकर्कश ‘डीजे’नं सोलापूरकरांच्या कानठळ्या बसविल्या. आदल्या दिवशीचा स्वप्नवत वाटणारा पवित्र सोहळा मनात ठेवून मोठ्या विश्वासानं मिरवणुका पाहायला बाहेर पडलेली मंडळी दचकली. कालचा वीरमातांचा हुंदका खरा की आजचा ‘डीजे’चा गलका.. असा प्रश्न पडला.

छत्रपतींच्या मराठी मातीला नव्या परंपरेचा सुगंध..

जानेवारी महिन्यातली गोष्ट. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळांचे प्रमुख पदाधिकारी ‘लोकमत’ कार्यालयात स्वत:हून आलेले. ‘लोकमत’नं जशी सोलापूरची गड्डा यात्रा ‘दीपोत्सव’नं उजळवून टाकली, तसाच वेगळा काहीतरी प्रयोग यंदाच्या ‘शिवजयंती’तही व्हावा, ही अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली. या अपेक्षेमागे सोलापूरकरांनी ‘लोकमत’वर टाकलेला प्रचंड विश्वास लपला होता.. अन् या विश्वासाला जपतच ‘लोकमत भवन’मध्ये झालेल्या बैठकीत एक वेगळी संकल्पना मांडली गेली.

रात्री-बेरात्री फटाके उडवून कायदा मोडण्यापेक्षा एका वेगळ्या वातावरणात लोकांना घेऊन जाण्याची ती आगळी-वेगळी कल्पना होती. साºया पदाधिकाºयांनाही ती खूप आवडली. एक वेगळा विचार घेऊन सारे भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडले. झपाटल्यागत रात्रंदिवस काम करत राहिले. ‘लोकमत’मधूनही त्यांच्या बारीक-सारीक हालचाली टिपल्या गेल्या. जगासमोर मांडल्या गेल्या. वातावरण निर्मिती होत गेली. सोलापुरात यंदा काहीतरी वेगळी सामाजिक क्रांती होणार, याचीही कुणकुण महाराष्ट्राला लागली.

अखेर ती सुंदर वेळ आली. अठरा तारखेला रात्री दहानंतर सारे रस्ते जणू छत्रपती शिवाजी चौकाकडे धावू लागले. पारंपरिक वेशभूषेतल्या हजारो महिलांची पावलं याच ‘शिवचौका’कडं वळू लागली. पाहता-पाहता अवघा चौक शिवकन्यांनी भरून गेला. शिवघोषणांनी भारून गेला.

यात साºयाच जाती-धर्माची मंडळी होती. ‘मराठी पैठणी’च्या बाजूला ‘कन्नड इरकल’ साडीही नटूनथटून दिसत होती. या दोघींसोबतच ‘उर्दू बुरख्या’चीही उपस्थिती लक्षणीय होती. हजारो लोक एकत्र जमलेले असूनही कुठंही कसला गोंधळ नव्हता. विशेष म्हणजे गेल्या चार-पाच दिवसांपासून थोडंसं अलर्ट असणारं ‘खाकी डिपार्टमेंट’ ही सारी ‘शिस्तबद्ध एकी’ पाहून पुरतं रिलॅक्स झालं होतं. सोलापुरात असंही काहीतरी चांगलं घडू शकतं, यावर अनेकांचा खरंच विश्वास बसत नव्हता. अखेर बाराला अवघी दोन मिनिटं कमी असताना त्या भावनिक सोहळ्याला सुरुवात झाली. साºयांच्याच अंगावर जणू रोमांच उभारले.

‘लोकमत’च्या कॅमेºयातून बाहेरच्या जगापर्यंत हे ‘लाईव्ह’ पोहोचू लागलं. स्टेजवर जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरमाता अन् वीरपत्नी होत्या. त्यांच्या हातूनच शिवजन्मोत्सव सोहळ्यातील ‘शिवपाळणा’ पुजला गेला. साºयांच्याच नजरा मोठ्या श्रध्देनं पाळण्याकडं होत्या. हे पाहून सर्वच वीरमाता अन् वीरपत्नींना भरून आलं. त्या सद्गगदित झाल्या. डोळे पाणावले. आयुष्यात प्रथमच मिळालेला मानसन्मान पाहून अनेकींना हुंदकाही फुटला. मात्र दुसºया दिवशी याच सोलापुरात लोकांना ‘डीजे’चा दणका बसला.

रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही... ..

ऐसा तळतळाट होईल : छत्रपतींचे पत्र

स्थळ : चार पुतळा परिसर. शिवजयंतीची मिरवणूक थाटात निघालेली. हजारो शिवभक्तांच्या सळसळत्या उत्साहाला अक्षरश: उधाण आलेलं. छोटी-छोटी लेकरंही आपल्या इवल्याशा सायकलवर ‘शिवमूर्ती’ घेऊन मोठ्या रुबाबात निघालेली. ‘माझा शिवबाऽऽ’ ही हक्काची अन् स्वाभिमानाची भावना प्रत्येकाच्या चेहºयावरून ओसंडून वाहू लागलेली. चौकातल्या मोकळ्या जागेत शिवकन्यांच्या ‘मर्दानी’ खेळांचं प्रात्यक्षिकही हजारो नागरिक मोठ्या कौतुकानं पाहू लागलेले. अस्सल सोलापुरी ठेक्यावर लेझमींचे पैतरेही दिमाखात बदलू लागलेले... आकाशात उधळलेल्या गुलालात सारं वातावरण कसं छानपैकी ‘शिवमय’ झालेलं...

..मात्र याचवेळी काही मूठभर मंडळांच्या ट्रक्सवर ‘डीजे’चे अगडबंब स्पीकर्स धडाडू लागले. त्यांच्या कर्कश आवाजानं आजूबाजूच्या लोकांना कानठळ्या बसू लागल्या. अनेकांच्या छातीचे ठोके वाढले. आजूबाजूच्या वास्तूही हादरू लागल्या. हे पाहून सोलापूरकरही हादरले. आदल्या रात्रीचा सुंदर सोहळा मनी ठेवून आज बाहेर पडलेल्यांना मानसिक धक्का बसला. अनेक जण बोटांनी कान झाकून दूर पळू लागले. याच ठिकाणी दोन चिमुकल्या मुलीही मोठ्या हौसेनं आलेल्या. हा गदारोळ पाहून त्यांनी आपल्या वडिलांना मोठ्या काकुळतीनं विचारलं, ‘पप्पाऽ आपल्या महाराजांची मिरवणूक अशी कशी? ही आपली नाहीच.. चला, आपण जाऊ.’

जे या इवल्याशा चिमुकलीला समजलं, ते आपल्यालाही नक्कीच उमजलं असणार. ‘रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही... ऐसा तळतळाट होईल !’ अशा स्पष्ट अन् कठोर भाषेत छत्रपतींनी त्या काळी सरदारांना सक्त ताकीद दिलेली. तशी पत्रंही आजपावेतो जपून ठेवली गेलेली. मग त्याच शिवरायांच्या मिरवणुकीत जनतेच्या कानठळ्या बसविण्याचा अधिकार या मूठभर मंडळींना दिला कुणी? अवघ्या महाराष्ट्राला अनोख्या जन्मोत्सव सोहळ्याचा आदर्श घालून देणाºया सोलापूरच्या नावाला धक्का लावण्याचा अधिकार या मूठभरांना दिला कुणी?

...होय. आता जाब विचारण्याची आलीय वेळ. चांगल्याला चांगलं म्हणत असतानाच चुका करणाºयांची खोडही ठेचून काढण्याची गरज झालीय निर्माण. म्हणूनच आज मनापासून लेखणीची ही उठाठेव. लगाव बत्ती...

सोलापूरचे कट्टर शिवभक्त दास शेळके सांगत होते,‘शांतता कमिटीच्या बैठकीतच आम्ही या ‘डीजे’वाल्यांना कडाडून विरोध केला होता. तरीही मिरवणुकीत कर्णकर्कश आवाज घुमला, याची खूप खंत वाटली. तो आवाज माझ्या कानावर आदळल्यानंतर माझ्या छातीची धडधड वाढली. कानावर हात दाबून ठेवत मी नाईलाजानं मिरवणूक सोडून घर गाठलं. खूप-खूप वाईट वाटलं.’

‘यंदाच्या मिरवणुकीत ‘डीजे’साठी ट्रेलर अन् ट्रक्स वापरण्यात आले. त्यांच्यावर कलाकारांना उभं करून सजीव देखावे ठेवले असते तर बरे वाटलं असतं. सव्वीस जानेवारीला दिल्लीच्या संचलनात प्रत्येक राज्याचे कलाकार ज्या पद्धतीनं वेशभूषा करून इतिहास साकारतात, तसंच इथंही घडायला हवं. छत्रपतींच्या आयुष्यातील गाजलेले प्रसंग साकारायला हवेत. पुढच्या वर्षी हे ‘डीजे’ कोनाड्यात ठेवून सजीव देखाव्यांवर आम्ही नक्कीच भर देऊ,’ ही स्पष्ट भूमिका व्यक्त केलीय पुरुषोत्तम बरडे यांनी.

डीजे’ चालकांची जिरवाच !

 कायद्यानुसार ‘डीजे’चा आवाज किती डेसिबल ठेवायचा, याचं तांत्रिक ज्ञान ‘डीजे’ मालकालाच असतं. त्यामुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. तरी सर्वाधिक कठोर शिक्षा या ‘डीजे चालकां’नाच व्हायला हवी. त्याशिवाय बटनं गरागरा फिरवून आवाज वाढविणाºयांचा मस्तवालपणा जिरणार नाही. पोलीस आयुक्तांनीही आक्रमक भूमिका घेऊन यांची नांगी ठेचल्याशिवाय मुजोरी संपणार नाही.

(लेखक 'सोलापूर आवृत्ती'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Veermata's heartbeat .. DJ's throat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.