-अतुल कुलकर्णी, संपादक लोकमत, मुंबई
एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये गेले. प्रत्येकाने आपापल्या सोयीने त्या-त्या ठिकाणी जुळवून घेण्याचे प्रयत्न केले. दोन राष्ट्रवादीमधील कुरबुरी फारशा चव्हाट्यावर येत नाहीत. त्यांचे नेते एकमेकांशी जुळवून घेऊन फार वाद घालत नाहीत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते काँग्रेसविषयी फार टोकाची भूमिका घेऊन बोलताना किंवा आपापसात देखील टोकाला जाऊन वाद घालताना दिसत नाहीत. याउलट एका शिवसेनेतून दुसऱ्या शिवसेनेत गेलेले नेते एकमेकांशी भांडण्याची, एकमेकांना वाटेल ते बोलण्याची एकही संधी गमावत नाहीत.
उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील ‘शब्द-युद्ध’ उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री गणेश नाईक आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यात वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. माजी खासदार राजन विचारे आणि विद्यमान खा. म्हस्के यांच्यातील भांडणे कमी होती म्हणून की काय आता गणेश नाईक आणि म्हस्के यांच्यातही वाद सुरू झाले आहेत. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले शिवसेनेचेच नेते आपल्या जुन्या शिवसेनेतील नेत्यांशी टोकाची भांडणे करताना दिसत आहेत.
मुंबईमध्ये शिंदेसेनेचे रामदास कदम आणि ठाकरेसेनेचे अनिल परब, सिंधुदुर्गमध्ये भाजपवासी झालेले मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे राजन तेली यांच्यातील भांडणांनी सध्या टोक गाठले आहे. नारायण राणे आणि रामदास कदम हे दोघेही सत्ताधारी पक्षात असले तरी त्यांच्यातील वादही अधूनमधून उफाळून येताना दिसतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे यांचे विद्यमान मंत्री संजय शिरसाठ यांच्याशी सतत भांडण सुरू असते. मध्यंतरी मंत्री उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यातही शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील ‘सख्य’ यवतमाळमध्ये सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. त्यांच्या आपापसांतल्या भांडणांचा फायदा अर्थातच भाजपला होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येतील तसे हे वाद विकोपाला जातील. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना फोडली. त्यातून शिंदे यांची शिवसेना जन्माला आली. भाजपला उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खटकत होती. तिथे आणखी एक शिवसेना वाढावी, असे भाजपला कसे वाटेल? ज्या ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे तेथे देखील भाजपच्या आमदारांना महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची तीव्र इच्छा आहे. मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘स्वबळावर तयारीला लागा’ असा संदेशही ठाण्यातल्या नेत्यांना दिल्याच्या बातम्या आल्या.
त्याउलट दोन राष्ट्रवादीमधील भांडणे टोक गाठताना दिसत नाहीत. शरद पवार यांच्या गोटातले अनेक नेते अजित पवार यांच्याशी चांगले संबंध ठेवून आहेत. अजित पवारही शरद पवार यांना भेटायला जाण्याचे निमित्त सोडत नाहीत. जे नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत ते पुढे आपल्यासोबतच येतील असे अजित पवार यांना वाटत असावे. काँग्रेसमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते स्थानिक भाजप नेत्यांशी जुळवून घेताना दिसतात. वाद असलेच तरी ते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पडद्याआड सोडवण्याइतके पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते मुरलेले आहेत.
राहता राहिला प्रश्न दोन शिवसेनांचा. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह इतरही काही जिल्ह्यांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी दोन शिवसेनांमध्ये वाद आहेत तेथे आपला फायदा होईल, असा राजकीय तर्क भाजपकडून मांडला जात आहे. ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ ही म्हण खरी ठरवण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेना मनापासून करताना दिसतात. सर्वोच्च न्यायालयातला खटला आणखी एक महिना पुढे गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता सुनावणीसाठी १२ नोव्हेंबर तारीख दिली आहे. बिहारचा निकाल १४ नोव्हेंबरला आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी ‘शिवसेना कोणाची?’ हा निकाल लागला तर दोन्ही शिवसेनांतील भांडणे आणखी विकोपाला जातील. त्याचा राजकीय लाभ जो पक्ष उचलेल त्याचा फायदा निश्चित आहे. atul.kulkarni@lokmat.com
Web Summary : The constant infighting between the two Shiv Sena factions benefits the BJP. Leaders relentlessly attack each other, especially before elections. While other parties reconcile, this division strengthens the BJP's position in key regions like Mumbai and Thane.
Web Summary : दो शिवसेना गुटों के बीच लगातार लड़ाई से भाजपा को फायदा हो रहा है। नेता लगातार एक-दूसरे पर हमला करते हैं, खासकर चुनावों से पहले। जबकि अन्य पार्टियां सुलह करती हैं, यह विभाजन मुंबई और ठाणे जैसे प्रमुख क्षेत्रों में भाजपा की स्थिति को मजबूत करता है।