नेहरुवाद नव्हे, नेहरुंच्याच खच्चीकरणाचे प्रयत्न

By Admin | Updated: November 14, 2015 01:06 IST2015-11-14T01:06:19+5:302015-11-14T01:06:19+5:30

महात्मा गांधी यांच्यानंतरची (स्वातंत्र्योत्तर काळातील) सर्वात महान भारतीय व्यक्ती कोण, असा एक कार्यक्रम तीनेक वर्षांपूर्वी आम्ही दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून घेतला होता

Trying to exploit Nehru, not Nehru | नेहरुवाद नव्हे, नेहरुंच्याच खच्चीकरणाचे प्रयत्न

नेहरुवाद नव्हे, नेहरुंच्याच खच्चीकरणाचे प्रयत्न

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
महात्मा गांधी यांच्यानंतरची (स्वातंत्र्योत्तर काळातील) सर्वात महान भारतीय व्यक्ती कोण, असा एक कार्यक्रम तीनेक वर्षांपूर्वी आम्ही दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून घेतला होता. त्यात सवाधिक पसंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाली, तर जवाहरलाल नेहरू यांचे स्थान पहिल्या दहामध्ये होते. नेहरू आणि आंबेडकर या भारताच्या महान सुपुत्रांच्या वयात फक्त दोन वर्षाचे अंतर होते. या आठवड्यात नेहरूंच्या १२५ व्या जयंतीचा समारोप होईल व लगेच पुढील वर्षीच्या मार्चमध्ये डॉ.आंबेडकरांच्या जयंती समारोहाची तयारी सुरु होईल. बहुतेक प्रत्येक राजकीय पक्षाने आंबेडकरांची जयंती जोरात साजरी करण्याचे नियोजन सुरु केले आहे. महू या त्यांच्या जन्मस्थानी भाजपापासून बसपापर्यंत तर कॉंग्रेसपासून रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांपर्यंत सर्वांकडून मोठ्या सभांचे आयोजन अपेक्षित आहे.
नेहरूंना नेहमीच त्यांच्या सर्व समकालीन नेत्यांपेक्षा वरचे स्थान लाभले आहे. १९५०मध्ये सरदार पटेलांच्या निधनानंतर नेहरुच सर्वोच्च ठिकाणी राहिले. आंबेडकर घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. उत्कृष्ट विधीज्ञ, सुधारणावादी आणि प्रज्ञावंत असूनही ते नेहरूंच्या करिश्म्यामुळे काहीसे दुर्लक्षित राहिले. पण आता मागील दशकापासून दोघांच्या स्थानांची अदलाबदल झाली आहे. डॉ.आंबेडकरांना महत्वाचे स्थान लाभले असून नेहरू निंदेचा विषय झाले आहेत. असे का झाले असावे?
यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे नेहरू नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आव्हानात्मक ठरले. नेहरुंच्या मनात या भगव्या संघटनेविषयी द्वेष होता. त्यांच्या मते संघाची वाटचाल हिंदू पाकिस्तानच्या निर्मितीकडील होती. त्यांच्या या मतापायी त्यांनी काहींचा रोषही ओढवून घेतला होता. हे लोक नेहरुंच्या समाजवादाला संदिग्ध म्हणत आणि त्या माध्यमातून नेहरू अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करीत असल्याचा त्यांचा आरोप होता. नेहरू इंग्रजी मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत व त्यांची मते बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक-सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधातील असल्याचे या लोकाना वाटत होते.
आज सत्तेत असलेल्या भाजपाला नेहरूंचा वारसा नष्ट करायचा आहे आणि तोदेखील नेहरु समर्थकांनी राजकीय पटलावर दीर्घकाळ जे प्रभुत्व राखले, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनीदेखील सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभा करण्याच्या निमित्ताने देशाचे लक्ष पटेलांकडे केन्द्रीत करण्याचे प्रयत्न करतानाच नेताजी सुभाषचन्द्र बोस यांच्याशी संबंधित कागदपत्रे खुली करण्याचा व लाल बहादूर शास्त्री यांची स्तुती करण्याचा पवित्रा धारण केला आहे. ते हे जाणूनबुजून करीत असावेत किंवा त्यांना या माध्यमातून नेहरुंकडे दुर्लक्ष करावयाचे असावे. गेल्या महिन्यात झालेल्या भारत-आफ्रिका शिखर संमेलनात त्यांनी मुद्दामच भारत-आफ्रिका मैत्री संबंधातील नेहरुंच्या योगदानाचा उल्लेख टाळला होता.
नेहरूंच्या लोकप्रियतेच्या ऱ्हासाचे दुसरे कारण आहे खुद्द कॉंग्रेस पक्ष. या पक्षाने नेहमीच नेहरुंबाबत एकाधिकाराचे प्रदर्शन केले. परिणामी नेहरु केवळ विशिष्ट परिवाराचे आणि पक्षाचे प्रतिनिधी म्हणून समोर येत गेले. प्रत्यक्षात ते राष्ट्रीय नेते होते आणि ते तसेच समोर यावयास हवे होते. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेटेल्ली यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘नेहरूंचे मरणोत्तर जीवन बायबलमधील एका प्रसिद्ध आज्ञेच्या नेमके उलटे राहिलेले दिसते. ही आज्ञा म्हणते की, पित्याच्या हातून झालेल्या पापाची फळे पुढच्या सात पिढ्यांना भोगावी लागतात. पण नेहरूंच्या बाबतीत नेमके उलटे घडले आहे. त्यांची मुलगी, नातू, नातसून आणि पणतू यांच्या कर्माची फळे त्यांना भोगावी लागत आहेत’. आजची पिढी नेहरूंकडे त्यांच्या वारसांच्या माध्यमातून बघत आहे. नेहरूंनी राजकारणातील घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचे पुरेसे पुरावे नसले आणि १९६६ साली झालेल्या लालबहादूर शास्त्री यांच्या दुख:द आणि अचानक मृत्युमुळे इंदिरा गांधींना सत्ता केवळ अपघाताने मिळाली असली तरी काँग्रेस विरोधक नेहरुंवरच घराणेशाहीचा आरोप करीत असतात.
याउलट डॉ.आंबेडरांचा रिपब्लिकन पक्ष आज नगण्य ठरला असला तरी त्यांचा वारसा जिवंत आहे. मतपेटीच्या राजकारणाच्या उदयानंतर आंबेडकरांच्या कल्पनेतील सामाजिक समानता आणि न्याय ही तत्त्वे कोट्यवधी दलित आणि मागासवर्गीयांची मते एकत्रित करण्याची माध्यमे ठरत आहेत. आंबेडकरांनी जरी हिन्दू धर्मातील ब्राह्मणी जातउतरंडीला आव्हान दिले होते, तरी उच्चवर्णीयांचे प्राबल्य असणाऱ्या संघाने आंबेडकरांचे विचार (नाखुषाने का होईना) आपलेसे केले आहेत. आंबेडकरांच्या विचारांना आव्हान देण्याचे धैर्य कुठल्याही पक्षात नाही, कारण त्यात मोठ्या संख्येतली मते हातून निसटून जाण्याचा धोका असतो. उजव्या विचारसरणीच्या लोकांचे प्राबल्य असणाऱ्या सामाजिक माध्यमांमध्ये नेहरू समर्थकांची व्होट बँक अस्तित्वात नाही. पण आंबेडकरांवर थोडी जरी टीका झाली तरी त्यांचे समर्थक संबंधित सोशल साईटच बंद पाडू शकतात. या दोन्ही महान नेत्यांनी प्रचंड मोठे योगदान दिले असले तरी त्यांचा वारसा केवळ राजकीय पक्षपातातच अडकून पडला तर ते मात्र देशाच्या दृष्टीने फारच शोचनीय ठरेल.

Web Title: Trying to exploit Nehru, not Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.