हा देशद्रोहच!
By Admin | Updated: July 17, 2014 09:01 IST2014-07-17T09:01:03+5:302014-07-17T09:01:03+5:30
भारतद्रोही माणसाला भेटायला संघाचे संस्कार घेतलेला वैदिक पाकिस्तानात जातो आणि त्याची मुलाखत दूरचित्रवाहिनीच्या पडद्यावर दाखवितो हा प्रकार त्या हफीज या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला हिरो बनविणारा आहे.

हा देशद्रोहच!
मुंबई शहरावर सशस्त्र हल्ला चढवून १८७ निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सूत्रधार हफीज सईद याची पाकिस्तानात जाऊन सदिच्छा भेट घेणारा वेदप्रकाश वैदिक हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक, नरेंद्र मोदींचा समर्थक, भाजपाचा कार्यकर्ता आणि योगविक्रेत्या रामदेवबाबाचा पट्टशिष्य आहे आणि त्याने केलेली देशघातकी कारवाई सध्या संसदेत व देशात गाजत आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष त्याच्या झाडाझडतीची मागणी करीत असताना भाजपा, संघ परिवाराचे सभासद व रामदेवबाबाचे ग्राहक त्याच्या समर्थनासाठी एकत्र आले आहेत. यातली ताजी बाब ही, की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपण संघटनेच्या पातळीवर प्रयत्न केले आहेत, असे या वैदिकाने आता सांगितले आहे. ‘जो माणूस मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधाराची भेट घेतो, तो देशद्रोही आहे आणि त्याला कसाबसारखेच वागविले पाहिजे,’ असे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सांगून आपल्या पक्षाची वेगळी व प्रखर भूमिका याविषयी मांडली, तर ‘हफीज सईदसोबत यासीन मलिकनेही उपोषण केले होते (ते उपोषण कशाचे होते, हे न सांगता),’ असे या प्रकाराचे लंगडे व अविश्वसनीय समर्थन भाजपाच्या प्रकाश जावडेकरांनी केले आहे. ‘वैदिक हा संघाचा स्वयंसेवक नव्हताच,’ असे आता पूर्वाश्रमीच्या संघाच्या व आताच्या भाजपाच्या राम माधवांनी सांगितले, तर ‘वैदिकने हफीजची भेट त्याचे हृदयपरिवर्तन करण्यासाठी घेतली,’ असा अत्यंत अफलातून व लुच्चा पवित्रा रामदेवबाबाने घेतला आहे. वैदिकने हफीजची भेट एक पत्रकार म्हणून घेतली, असे सांगायलाही काही शहाणे पुढे झाले आहेत. मात्र, तो हफीजला पत्रकार म्हणून भेटला असेल, तर त्या भेटीचा वृत्तांत त्याने कोठे प्रकाशित केला, हेही अद्याप कोणाला कळाले नाही. सुब्रह्मण्यम स्वामी या माणसाने प्रथमच आपली अक्कलहुशारी वापरून वैदिकविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. वैदिक आणि हफीज यांची भेट अकस्मात ठरली व अचानक झाली, असे नक्कीच नाही. जो हफीज भारताच्या गुप्तचर यंत्रणेला आणि अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याला सातत्याने गुंगारा देतो, तो या वैदिकाला सहजगत्या सापडला असेल, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे त्याच्या भेटीची व्यवस्था व पूर्वतयारी करणारे कोण, तिच्याविषयीची गुप्तता अखेरपर्यंत बाळगणारे कोण आणि देशाच्या एवढ्या मोठ्या शत्रूला सरकार वा त्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या अंधारात ठेवून भेटणारा सरकार पक्षाचाच हा वैदिक कोण व कसा, याची माहिती देशाला व सरकारला मिळणे आवश्यक आहे आणि ती रामदेवबाबा आणि संघ परिवार यांनीच देणे गरजेचे आहे. हफीजला ताब्यात घेण्यासाठी भारताने गेली काही वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. त्यासाठी त्याने अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेची मदत मागितली आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणेकडेही त्यासाठी भारताने विचारणा केली आहे. हा हफीज पाकिस्तानात आहे, असे तो देश कधी तरी सांगतो आणि कधी तरी तो आम्हाला माहीत नाही, अशी बतावणीही करतो. दाऊद इब्राहिम या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराच्या मागे भारतासह जसे सारे जग लागले आहे, तसाच या हफीजचाही त्याने पाठपुरावा चालविला आहे. या भारतद्रोही माणसाला भेटायला संघाचे संस्कार घेतलेला वैदिक पाकिस्तानात जातो आणि त्याची मुलाखत दूरचित्रवाहिनीच्या पडद्यावर दाखवितो हा प्रकार त्या हफीजला भारताविषयीचे फार प्रेम असल्याचे प्रशस्तिपत्र देणारा व एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला हिरो बनविणारा आहे. त्याचे संघ, भाजपा, नरेंद्र मोदी आणि रामदेवबाबा यांच्याशी असलेले निकटचे नाते त्याच्या या गुन्हेगारीला असलेले कमालीचे संशयास्पद व अभद्र स्वरूप सांगणारे आहे. आश्चर्य व संतापाची बाब ही, की या वैदिकाचा बचाव करण्यासाठी भाजपाच्या संसदीय मंडळाची व संसदसदस्यांची बैठकच त्या पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत बोलावली आहे. पत्रकार या नात्याने एखाद्या अतिरेक्याला वा भूमिगत चळवळ चालविणाऱ्या पुढाऱ्याला कोणी भेटणे, ही बाब समजण्याजोगी आहे. तशा भेटीच्या बातम्या व त्यातील धाडसाचे कौतुकही देशाने याआधी अनेकदा केले आहे. मात्र, देशाविरुद्ध आक्रमण करणाऱ्या आणि त्याच्या निरपराध नागरिकांचा अमानुष बळी घेणाऱ्या शत्रूला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरचे व्यासपीठ मिळवून देणे, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि त्याचे समर्थन करणारे लोकही संशयास्पद देशभक्ती असणारे आहेत. या प्रकरणाची व त्यातल्या वैदिकाची बाजू घेऊन उद्या मोदी उभे राहिले, तरी त्यांची संभावना अशीच झाली पाहिजे.