यात्रांचा धुराळा ; प्रचाराची पातळी सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:25 PM2019-08-09T12:25:56+5:302019-08-09T12:26:45+5:30

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाजनादेश यात्रा’, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ...

Travel aisles; Manage promotion levels! | यात्रांचा धुराळा ; प्रचाराची पातळी सांभाळा !

यात्रांचा धुराळा ; प्रचाराची पातळी सांभाळा !

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाजनादेश यात्रा’, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ आणि राष्टÑवादीचे युवा नेतृत्त्व डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवस्वराज्य यात्रा’ पक्षीय भूमिका, कामगिरी मांडत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे. राजकीय पक्ष या यात्रांच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहे.
देशापुढील ज्वलंत, महत्त्वाच्या प्रश्नावर जनतेचे आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी यात्रा काढल्याचा इतिहास आहे. महात्मा गांधी यांची स्वातंत्र्यपूर्व काळातील दांडीयात्रा, चंद्रशेखर यांची पदयात्रा, समाजसेवक डॉ.बाबा आमटे यांची भारत जोडो यात्रा, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांची राम रथयात्रा, डॉ.मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा, शरद पवार यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नागपूर विधिमंडळ अधिवेशन काळातील पदयात्रा अशा प्रमुख यात्रांनी त्या काळातील राजकारण, समाजकारणावर मोठा परिणाम केला होता. त्याची नोंद इतिहासात झाली. पुढे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची कामगिरी जनतेपुढे मांडण्यासाठी सत्ताधारी पक्ष तर सरकारचे अपयश, ज्वलंत प्रश्न, समस्या मांडण्यासाठी विरोधी पक्ष यात्रा काढत असते. पदयात्रा कमी होऊन वाहनाद्वारे यात्रा निघू लागल्या. वेळेची बचत आणि अधिकाधिक क्षेत्रात जाणे त्यामुळे शक्य झाले.
यात्रा या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे. त्यात पावित्र्य आहे. चारधाम यात्रा, अष्टविनायक यात्रा, हज यात्रा असे धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे. त्या शब्दाला राजकीय पक्ष व नेत्यांनी जागायला हवे. ही ‘यात्रा’ आहे, गावातली ‘जत्रा’ नव्हे, याचेही भान ठेवायला हवे. जत्रेत तमाशा, तगतराव असतात, त्यात सोंगाड्या असतो, त्याच्या करामती असतात. त्या लोकांना आवडतात. तसे होऊ नये, लोकप्रियता, लोकाग्रह, लोकानुनयासाठी कमरेचे काढून डोक्याला बांधू नये. दुर्देवाने हे भान काही राजकीय नेत्यांना राहिलेले नाही.
समाजमाध्यमांमुळे अशा प्रकारांना आणखी चालना मिळत आहे. शेलक्या शब्दांचा वापर, प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर शिवराळ भाषेत टीका, कमरेखालची भाषा अशा भाषणांना श्रोते, दर्शक मिळतात. त्याला पसंती भरपूर मिळते, ते प्रसारीतदेखील खूप होते, पण विचारी, सुज्ञ नागरिकांना ही भाषा रुचत नाही. त्या नेत्याची एकूण वैचारिक पातळी, सभ्यता, सुसंस्कृततेविषयी सामान्य नागरिक मत तयार करतो, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
डॉ.अमोल कोल्हे यांच्या रुपाने ेएका अभिनेत्याला महाराष्टÑाच्या राजकारणात अग्रस्थान मिळाले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत आचार्य अत्रे, निळू फुले, पु.ल.देशपांडे, शाहीर अमरशेख असे दिग्गज उतरले होते. आणीबाणीच्या विरोधात दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे, द.मा.मिरासदार यांच्यासारखी मंडळी उभी ठाकली होती. सक्रीय राजकारणात मात्र कलावंतांना यश मिळाल्याचे उदाहरण विरळा आहे. ना.धों.महानोर, रामदास फुटाणे यांच्यासारख्या साहित्यिकांना विधान परिषदेवर सन्मानपूर्वक पाठविण्यात आले. सुरेखा पुणेकर, आदेश बांदेकर यांच्यासह काहींनी निवडणुकीत भविष्य अजमावून पाहिले, परंतु यश आले नाही. शिवबंधन तोडून राष्टÑवादीचे घड्याळ हाती घेतलेल्या डॉ.कोल्हे यांना यश मिळाले. त्यात दूरचित्रवाहिनीवरील शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा मोठा वाटा या यशात आहे, हे नाकारुन चालणार नाही. त्यांच्या या प्रतिमेचा उपयोग करुन घेण्याचे आता राष्टÑवादी काँग्रेसने ठरविलेले दिसते. ‘शिवस्वराज्य’ या नावाने यात्रा सुरु करण्यात आली. त्याचा कितपत लाभ मिळतो, हे भविष्यात कळेलच. पण एन.टी.रामाराव, एम.जी.रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता यांच्यासारख्या दाक्षिणात्य कलावंतांना मिळालेले यश मराठी कलावंताच्या वाटेला कधी आले नाही. अर्थात रजनीकांत, कमल हसन यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. राष्टÑीय राजकारणात देखील वैजयंती माला, सुनील दत्त, हेमा मालिनी यांच्यापासून तर अलिकडच्या सनी देओल पर्यंत कलावंतांचा उपयोग हा फक्त त्यांच्या प्रतिमेचा पक्षासाठी फायदा करुन घेण्यासाठीच केला गेला आहे.
डॉ.कोल्हे यांच्या निमित्ताने दादा कोंडके यांचा किस्सा आठवला. बहुदा १९८५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी दादा कोंडके यांनी राज्यात काही ठिकाणी सभा घेतल्या. जळगावातही तेव्हाच्या जी.एस. ग्राऊंडवर सभा झाली होती. ज्या द्वयर्थी संवादासाठी दादा प्रसिध्द होते, तशीच भाषा त्यांनी सभेत वापरली. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यावरही टीका केली. अर्थात नकारात्मक परिणाम होऊ लागल्याने सेनेने अखेर दादा कोंडके यांना प्रचारातून हटवले होते. आता अभिनेते संयमशील असले तरी नेते त्यांच्यावर मात करु लागले आहे, हे चांगले लक्षण नाही.

Web Title: Travel aisles; Manage promotion levels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव