समाधीच्या अनुभवाचे पर्यटन...
By Admin | Updated: April 10, 2016 02:43 IST2016-04-10T02:43:15+5:302016-04-10T02:43:15+5:30
चीनमधील शांघायमध्ये समाधीचा अनुभव किंवा मृत्यूचा अनुभव अशी एक पर्यटन टूम निघाली आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळतो आहे. पैसे कमविण्याच्या या मजेशीर व्यवसायाच्या निमित्ताने...

समाधीच्या अनुभवाचे पर्यटन...
- विनायक पात्रुडकर
चीनमधील शांघायमध्ये समाधीचा अनुभव किंवा मृत्यूचा अनुभव अशी एक पर्यटन टूम निघाली आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळतो आहे. पैसे कमविण्याच्या या मजेशीर व्यवसायाच्या निमित्ताने...
आर्थर रोड कारागृहाच्या ज्या अंडा सेलचे काम छगन भूजबळ गृहमंत्री असताना मान्य झाले त्याच अंडासेलमध्ये त्यांचे आज वास्तव्य आहे. हा काळाचा सूड उगविणारा जिवंत अनुभव सर्वांसमोर आहेच. एकाच आयुष्यात पुढच्या सात पिढ्यांची व्यवस्था करणाऱ्या माणसाचे सुरवातीला कौतुक होते. पण तो पैसा गैरमार्गाने असेल तर ज्या उंचीवर तो गेलेला असतो त्याच्या कितीतरी पट खाली त्याची पत घसरलेली असते. विजय मल्या हे आजच्या काळातले दुसरे उदारहण. त्यामुळे ‘जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ’ हे गीतेचे तत्वज्ञान एकाच आयुष्यात पहायला मिळाल्याची शेकडो उदाहरणे आहेत.
कोणाच्या डोक््यात काय कल्पना येईल, काही सांगता येत नाही. माणसाचा मृत्यू हा विषय नेहमीच गूढ आणि भीतीचा बनून राहिलेला आहे. ‘मृत्यूनंतरचे जीवन’ या विषयावर वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांची, बुवांची शेकडो पुस्तके बाजारात आहेत. उत्सुकता आणि कुतूहलापोटी अनेक जण ती वाचतात आणि स्वत:च्या कल्पनेत रमूनही जातात.
मृत्यूचे गूढ जाणून घेण्याचे आकर्षण माणसाला आदिम काळापासून आहे. ‘मृत्यू’ त्या विचाराभोवती तो कळत्या वयापासून फिरत असतो.
शरीर मरते म्हणजे नेमके काय होते, हे ती केवळ जैविक प्रक्रिया असल्याचे वैज्ञानिक मानतात, तर त्यातील आत्मा जिवंत असल्याचा दावा आस्तिक करतात. एकूण हा विषय गंभीर आणि दीर्घ चर्चेचा आहे. तो या लेखाचा विषय नाही, पण मृत्यूच्या या विषयाभोवती रमणाऱ्या माणसांसाठी चीनच्या शांघायमधील एकाने चक्क ‘मृत्यूचा अनुभव घ्या’ अशी टूम काढत पर्यटन स्थळ काढले. आश्चर्य म्हणजे, लोकांचा या पर्यटन स्थळाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शांघायमधील एका व्यावसायिकाने ही शक्कल लढविली. एका शवपेटीतून हा प्रवास सुरू होतो. मग गरम भट्टीतून त्याला नेले जाते. मध्ये-मध्ये नरकाचे विचित्र अनुभव येत हा प्रवास संपविला जातो. त्या व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, या ‘समाधी’ अनुभवानंतर लोकांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. लोक तणावमुक्त होतात. छोट्या-छोट्या मत्सरातून, द्वेषातून, असूयेतून मन मोकळे होते. त्याचबरोबर, लोभ, मोह, माया या बेड्यांतूनही मनाची सुटका होते. हा तरल आध्यात्मिक अनुभव आपल्याकडेही बऱ्याच योगविद्या किंवा इतर प्रशिक्षण वर्गातून दिला जातो. आपल्याकडे नित्यनेमाने होणाऱ्या कीर्तन, प्रवचन, निरुपणातून नेहमीच मनावरील जळमटे दूर करण्याचा प्रयत्न झालेला आढळतो. परवा याबाबतचा छान संदेश व्हॉट्सअपवर फिरत होता. एकाने प्रश्न विचारला की, ‘मृत्यू आणि मोक्ष यातील फरक काय?’ फार छान उत्तर दिले गेले. ‘माणूस मेल्यानंतरही त्याचे लोभ, मद, मत्सर, माया, मोह, काम हे षड्रिपू कायम राहात असतील, तर तो मृत्यू आणि तो जिवंत असतानाही या षड्रिपंूूपासून मुक्त असेल तो मोक्ष.’ आपण सारे जण या भावनांसह जगत असतो. रोजच्या हाता-तोंडाची मारामार सुरू असल्याने हा संत विचार क्वचित स्पर्श करून जातो. तरीही आयुष्यभर संघर्ष करीत जगणारा मनुष्य थोड्या आर्थिक स्थिरस्थावरतेनंतर जगण्या-मरण्याचा गांभीर्याने विचार करीत असतो. त्याच वेळी कुठल्या तरी बुवा-बाबाचे तत्त्वज्ञान त्याला आवडते आणि मग टाळ्या वाजवत त्या बाबाच्या मागे तो आयुष्यभर धावत असतो. आयुष्याकडे निरपेक्ष पाहण्याची दिव्य दृष्टी देत, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६व्या वर्षीच जिवंतपणी समाधी घेतल्याची नोंद आपल्याकडे आहे. त्यानंतर गेली ७०० वर्षे माणसाला शेकडो संत-महंतानी लोभ, मायेपासून दूर राहण्याची शिकवण दिली, पण शिकेल तो माणूस कसला. किंबहुना, चुकेल तोच माणूस अशी धारण आपण करून घेतल्याने मोह-मायेच्या चक्रात आपण पार गुरफटून गेलो आहोत.
शांघायमधील व्यावसायिकाने पैसे कमविण्याच्या उद्देशाने हा समाधीचा अनुभव लोकांना देण्याचा धंदा सुरू केला असला, तरी आपल्याकडे संतविचाराने ही शिकवण गेली शेकडो वर्षे सुरू आहे. काहीतरी वेगळा अनुभव द्यायचा आणि कमाई करायची, हाच एकमेव हेतू ठेवून समाधी अनुभवाचे पर्यटन सुरू झाले आहे. चीनी लोक सध्या तरी त्याला प्रतिसाद देत आहेत. तब्बल ७० डॉलर्स मोजून लोक हा समाधी अनुभव घेत आहेत. यातून नेमकी किती जणांची दृष्टी बदलेल, हा संशोधनाचा विषय आहे, पण माणसाच्या मृत्यूकडे केवळ भय आणि गूढतेने पाहण्यापेक्षा त्याच्या पलीकडची दृष्टी देऊन किमान जिवंतपणी स्वर्गानंदाचा अनुभव मिळणार असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मृत्यूनंतर खरेच आयुष्य असते काय? किंवा असते तर कसे? यावर चर्चा होत राहिलच, पण सध्या जे जीवन जगतो आहोत, ते सुसह्य आणि स्वानंदी झाले, तरी पुरे. इतकी अपेक्षा सर्वसामान्य माणूस बाळगून असतो. त्याला मृत्यू पलीकडचं आयुष्य समजावून घेण्यापेक्षा मृत्यू अलीकडे आयुष्य आनंदी, तणावमुक्त कसे करता येईल, याची भ्रांत पडलेली असते.
आपण आजूबाजूला नजर टाकली, तरी शेकडो वेगवेगळ्या तणावाखाली असलेली माणसे जगताना दिसतात. त्यांच्या ताणात भर न घालता, त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची एक लकेर चमकवू शकलो, तरी आपल्याला आयुष्य सार्थकी लागल्यासारखे वाटेल. स्वत:च्या आयुष्याचा निरपेक्ष विचार करताना इतरांच्या आयुष्यात आनंदाची बिजे पेरू शकलो, तर त्यासारखे समाधान नाही, असे म्हटले जाते. समाधी अनुभव घेण्यापेक्षा सरळ-साधे आयुष्य आनंदाने जगण्याचा अनुभव अधिक निखळ असतो, हे यातून समजले तरी पुरे. त्यामुळे मेड-इन चायनाचा समाधी अनुभवापेक्षा वारकरी संप्रदायची शिकवण अधिक मोलाची हेही तितकेच खरे.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबर्ई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)