शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Tokyo Olympics: आजचा अग्रलेख: टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचं यश सोन्याहून साजरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 6:34 AM

Tokyo Olympics Update: ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली.

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी टोकिओ हे लंडन झाले. मधल्या रिओच्या कटु आठवणी बहाद्दर खेळाडूंनी पुसून टाकल्या. दोन रौप्य, तीन कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने भारोत्तोलनमधील रौप्यपदकाचा पाया घातला. कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्या रौप्यपदकाने गुरुवारी देशाची मान पुन्हा उंचावली. बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधू, बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेन यांनी कांस्यपदक जिंकले. हॉकीतल्या पदकाने पदकांचे पंचक पूर्ण झाले. लंडनची कमाई सहा पदकांची होती. टोकिओचे दोन दिवस बाकी आहेत. कदाचित आठ वर्षांपूर्वीच्या कामगिरीची बरोबरीही होऊ शकेल. सुवर्णपदकाचा दु्ष्काळ मात्र कायम राहिला. बीजिंग ऑलिम्पिकनंतर बारा वर्षांमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. तथापि, गुरुवारी पुरुषांनी हॉकीतल्या पदकांचा ४१ वर्षांचा दुष्काळ संपवला. दोन गोलची पिछाडी भरून काढून बलाढ्य जर्मनीला हरवले. शुक्रवारी मुलीही असाच चमत्कार करतील, अशी आशा होती. परंतु तगड्या इंग्लंडला जबरदस्त टक्कर देऊनही एका गोलच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. हा चौथा क्रमांकही ऐतिहासिक आहे. मुलींनी पहिल्यांदाच उपांत्यफेरी गाठली.  

दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा नुसतीच मानाची व जागतिक आहे असे नाही. तिच्या भव्यदिव्यतेचा मानसिक दबावही खेळाडूंवर खूप असतो. एखाद्या खेळाच्या जागतिक स्पर्धेत कितीही मोठी कामगिरी केली तरी यशाची खरी खुमारी असते ती ऑलिम्पिकमध्येच. दोन स्पर्धांमधील चार वर्षे खेळाडूंसाठी तपश्चर्येपेक्षा कमी नसतात. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे, मानाच्या पोडियमवर उभे राहता यावे, भारताचे राष्ट्रगीत वाजावे आणि तिरंगा ध्वज डौलाने फडकावा, हे स्वप्न त्या तपश्चर्येचा अविभाज्य भाग असतो. हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्यांच्याच नशिबी हे येते, याची पुरेशी जाणीव असूनही खेळाडू प्रयत्न सोडत नाहीत. देदीप्यमान यश मिळवून देणारे खेळही या चार वर्षांमध्ये खालीवर होतात. मागची आठ-बारा वर्षे नेमबाजी, मुष्टियुद्ध, कुस्ती व झालेच तर बॅडमिंटनची होती. यंदा कुस्ती व बॅडमिंटनने ती परंपरा कायम राखली. पुरुष मुष्टियोद्धे माघारले जात असताना लवलीनाच्या रूपाने महिलांनी त्यांची जागा भरून काढली, तर मीराबाईने भारोत्तोलन हा नवा खेळ यशाच्या साखळीत जोडला. हॉकीतल्या कांस्यपदकाने जुन्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. जणू नव्या सोनेरी दिवसांचे झुंजुमुंजु झाले. म्हणूनच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरुष व महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी लगेच बोलले, पाठीवर कौतुकाची थाप टाकली. क्रिकेट हाच धर्म व क्रिकेटपटू देव बनलेल्या देशात हे दृश्य दुर्मीळ आहे. हे चॅम्पियन्स एरवी दखलपात्र नसलेल्या सामान्य वर्गातून पुढे आले, हे विशेष. महिला हॉकीची कर्णधार राणी रामपाल हिच्या वडिलांची परिस्थिती मुलीसाठी स्टिक खरेदी करण्याचीही नव्हती. हॅट‌्ट्रिकसह विजयाचा मार्ग प्रशस्त करणारी वंदना कटारिया, पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारा रवीकुमार दहिया, पदक जिंकण्याच्या जिद्दीने पेटलेली मीराबाई, आधीच थोर खेळाडूंच्या मांदियाळीत असलेली मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि हॉकीच्या पदकांचे दरवाजे पुन्हा उघडणाऱ्या संघातील बहुतेक सगळे खेळाडू हे सामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या जिद्दीला दाद देतानाच व्यवस्थेतील वैगुण्यांवरही चर्चा व्हायला हवी.

चॅम्पियन्स आकाशातून पडत नाहीत. ते घडविण्याची व्यवस्था लागते. अगदी लहान वयात त्या गुणवत्तेचे, क्षमतेचे खेळाडू हेरून त्यांच्यावर परिश्रम घ्यावे लागतात. उगवते जगज्जेते, त्यांच्या कुटुंबांना रोजीरोटीची काळजी घ्यावी लागते. दुर्दैवाने भारतात हे घडत नाही. आपण याबाबत खूपच भाबडे आहोत. गेल्यावेळच्या विजेत्यांकडूनच आशा बाळगतो. उगवत्यांची गुणवत्ता आपल्या नावीगावी नसते. पदक जिंकले किंवा जिंकता जिंकता हरले की तोंडदेखले कौतुक होते. नंतर खेळाडूंकडे ढुंकून पाहिले जात नाही. म्हणूनच एकशेचाळीस कोटींच्या देशातल्या ऑलिम्पिक विजेत्यांची संख्या एका किंवा फारतर दुसऱ्या हाताच्या बोटांवर मोजावी लागते. केंद्र सरकारने क्रीडा खात्याची तरतूद कमी केली होती. हॉकीमधील यशाचे गोडवे गाण्याची संधी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या पुढाकारामुळे ओडिशा सरकारने हॉकीचे संघ दत्तक घेतल्यामुळे लाभली, हे विसरता कामा नये. भारतात आर्थिक स्थैर्य, सुबत्ता क्रीडा कौशल्य व गुणवत्तेत परावर्तित होताना दिसत नाही. जिथे हे घडले तो पंजाब किंवा हरियाणा खेळाडू घडवतो. महाराष्ट्र, गुजरातसारख्या प्रगत राज्यांना मात्र ते जमत नाही. अर्थात टोकियोत सुवर्णपदक मिळाले नसले तरी जे मिळाले ते सोन्याहून कमी नाही.

टॅग्स :india at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021HockeyहॉकीBadmintonBadmintonboxingबॉक्सिंग