Join us  

जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य

जॅक फ्रेझर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने खणखणीत सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 9:05 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update -  जॅक फ्रेझर मॅकगर्क व अभिषेक पोरेल यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने खणखणीत सुरुवात केली. अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने राजस्थान रॉयल्सला ३ विकेट्स मिळवून दिल्या. पण, अन्य गोलंदाज DC च्या धावांचा वेग कमी करू शकले नाही. युझवेंद्र चहलने आज रिषभ पंतची विकेट मिळवून आयपीएलमध्ये दोनशे विकेट्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या गोलंदाजाचा मान पटकावला. शिवाय त्याने ट्वेंटी-२०त ३५० विकेट्सचा टप्पा गाठला आणि हा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला. गुलबदीन नैब व त्रिस्तान स्तब्स यांनी शेवटच्या फटक्यात चांगले फटके खेचून संघाला दोनशेपार पोहोचवले. 

आक्रमक ओपनर जॅक फ्रेझर-मॅकगर्क याने १९ चेंडूंत अर्धशतक झळकावून RR ला हलवून टाकले. आवेश खानच्या एका षटकात जॅकने ४,४,४,६,४,६ असे फटके खेचले. अनुभवी गोलंदाज आर अश्विनने RR ला पहिले यश मिळवून देताना जॅकला ५० धावांवर ( २० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार ) माघारी पाठवले. शे होप ( १) दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. अभिषेक पोरेलने मारलेला सरळ फटका गोलंदाज संदीप शर्माने अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू शर्माच्या हाताला लागून नॉन स्ट्राईक एंडच्या यष्टिंवर आदळला आणि क्रिज सोडून पुढे गेलेला होप रन आऊट झाला.  दोन विकेट पडल्यानंतरही अभिषेकची फटकेबाजी सुरूच होती. अश्विनने अक्षर पटेलला ( १५) घरचा रस्ता दाखवला. अभिषेकने  ३६ चेंडू, ७ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या आणि अश्विनने चतुराईने त्याला बाद केले. 

युझवेंद्र चहलच्या फिरकीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रिषभ ( १५) बाद झाला. चहलची ही आयपीएलमधील २०० वी, तर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ३५० वी विकेट ठरली. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. आयपीएलमध्ये २०० विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. दिल्लीकडून पदार्पण करणाऱ्या गुलबदीन नैबला स्ट्रॅडजी ब्रेकमध्ये सौरव गांगुली सल्ला देताना दिसला. अखेरच्या ६ षटकांत धावा वाढवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पण, RR च्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. अश्विनने ४-०-२४-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. चहल पुन्हा एकदा महाग ठरला आणि त्याने ४ षटकांत ४८ धावा देताना फक्त १ विकेट मिळवली. त्रिस्तान स्तब्सने चहलच्या चौथ्या षटकात २१ धावा चोपल्या. १९व्या षटकात बोल्टने गुलबदीनला ( १९) बाद केले.  पण, इम्पॅक्ट प्लेअर रसिख सलामने संजूच्या डोक्यावरून दोन चौकार खेचले. 

२०व्या षटकात स्तब्सने दोन षटकाराने संदीप शर्माचे स्वागत केले, परंतु तिसऱ्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्याने २० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४१ धावा करून आपली कामगिरी चोख बजावली. 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सयुजवेंद्र चहल