आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 06:55 AM2024-06-20T06:55:17+5:302024-06-20T06:55:42+5:30

पुण्यात अशाच घटनेत लेशपाल जवळगे व हर्षद पाटील नावाच्या तरुणांनी एका मुलीचा जीव वाचविला होता. तेव्हा, दोघांचे जागोजागी सत्कार झाले होते.

Todays editorial on vasai aarti yadav murder case | आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली..

आजचा अग्रलेख: माणुसकीची ‘आरती’ विझली..

वसईत भल्या सकाळी वर्दळीच्या रस्त्यावर एक माथेफिरू कामावर निघालेल्या त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला गाठतो. गॅरेजमध्ये नट-बोल्ट खोलण्या-बसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाडजूड पोलादी पान्याने मागून तिच्या डोक्यावर वार करतो. ती कोसळते. आपल्याऐवजी कुणीतरी दुसरा मुलगा शोधल्याच्या संतापाने एकापाठोपाठ एक असे सोळा-सतरा वार करतो. काही फटक्यांमध्येच आरती यादव नावाच्या पंचविशी ओलांडलेल्या मुलीचा जीव जातो. तरीदेखील रोहित यादव नावाचा नराधम मृतदेहावरही वार करीत राहतो. आपल्याबरोबर असे ‘क्यूं किया, क्यूं किया’, असे किंचाळत तो तिचा चेंदामेंदा करतो. थरकाप उडविणारी ही घटना घडत असताना रस्त्यावर पायी, वाहनाने जाणारे बघे त्या क्रूरकर्म्याला अडवीत नाहीत. अपवाद म्हणून एकजण पुढे जातो, तर हातातला पाना रोहित त्याच्यावर उगारतो. तो तरुणदेखील मागे सरतो. त्या एकासोबत आणखी दोघा तिघांनी थोडे धाडस दाखविले असते तरी कदाचित आरती वाचली असती. दरम्यान, अनेक बघे ही घटना त्यांच्या मोबाइलमध्ये चित्रित करीत राहतात. असे वाटावे, की आरती यादव नव्हे, तर समाजातील माणुसकीच मरण पावलीय, रस्त्यावर निपचिप पडून आहे. अलीकडे हे नेहमीचे झालेय. उत्तर भारतातून एक व्हिडीओ असा आला की, एका पोलिस इन्स्पेक्टरला कडाक्याच्या उन्हाचा तडाखा बसला. उष्माघाताने भोवळ आलेल्या अधिकाऱ्याला तातडीने दवाखान्यात नेण्याऐवजी त्याचे सहकारी व्हिडीओ काढण्यात व्यस्त आहेत. थोडक्यात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी कोणी कायदा हातात घेत असेल, उपद्रव करीत असेल तर त्याला रोखण्याचे धैर्य समाज गमावून बसला आहे. एरव्ही, कुत्र्या-मांजरांसाठी हळहळणाऱ्या दांभिक लोकांना माणसांच्या जिवाचे काहीही मोल नाही. समूहातील माणुसकी संपली आहे. त्यामुळे संतापून नराधम रोहितसोबत या बघ्यांवरही गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी काहींनी केली आहे. तथापि, हा खूप एकतर्फी विचार झाला. अशा घटनांवेळी बहुतेकजण विचार करतात की, न जाणो पुढे गेलो आणि आपल्यावरच हल्ला झाला किंवा नको त्या प्रसंगाला तोंड द्यावे लागले तर उगीच झंझट कशाला? लोकांच्या या मानसिकतेला पोलिसही कारणीभूत आहेत.

अपवादात्मक असे धाडस दाखविणाऱ्यांच्या मागेच पोलिसांचा ससेमिरा लागतो. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेणाऱ्यांची पोलिसांनी चाैकशी करू नये, असे न्यायालयांनी वारंवार सांगूनही अशा घटना किंवा गुन्ह्यांच्या तपासांत माहिती मिळविण्यासाठी पोलिस प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनाच अधिक छळतात. संशयित आरोपींपेक्षा साक्षीदारांनाच पोलिस ठाण्याच्या अधिक चकरा माराव्या लागतात. वसईच्या घटनेत तर रोहितने आपला मोबाइल घेऊन फोडला म्हणून आदल्या दिवशी आरती व तिची बहीण पोलिस ठाण्यात गेली होती. पोलिसांना नेहमीचे किरकोळ प्रकरण वाटले. रोहितला समज देऊन सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याने आरतीचा घात केला. गुन्हा घडण्याआधी पोलिसांनी घेतलेली ही अशी जुजबी दखल किंवा अपघात व अन्य घटनांवेळी प्रत्यक्षदर्शींना होणारा त्रास पाहता, पोलिसांमध्ये काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचे होईल. समाजानेच सार्वजनिक ठिकाणी असे अमानवी गुन्हे करणाऱ्यांना राेखण्यासाठी पुढे यायला हवे. अशा धाडसी तरुणांची एक फळी तयार व्हायला हवी आणि त्यांनी धाडस दाखविल्यानंतर समाजाने त्यांच्या पाठीवर काैतुकाची थाप टाकायला हवी. मागे पुण्यात अशाच घटनेत लेशपाल जवळगे व हर्षद पाटील नावाच्या तरुणांनी एका मुलीचा जीव वाचविला होता. तेव्हा, दोघांचे जागोजागी सत्कार झाले होते. असे तरुण प्रत्येक गावात, शहरात पुढे यायला हवेत. आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी - आमच्या संवेदनाही लोकांच्या जाती-धर्म पाहून उफाळून येतात.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील हुबळीत नेहा हिरेमठ नावाच्या तरुणीचा तिचा प्रियकर फयाझ खंडूनायक याने काॅलेजच्या आवारात भोसकून जीव घेतला. तेव्हा लोक रस्त्यावर आले. नराधम फयाझला फासावर लटकविण्याची मागणी करण्यात आली. लटका आक्रोश उभा केला गेला. कारण, दोघांचे धर्म वेगळे होते. वसईच्या घटनेत दोघेही एकाच धर्माचे असल्याने, दोघांचे आडनावही एकच असल्याने हे प्रकरण त्यांचा खासगी मामला ठरू नये. या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दबाव वाढवायला हवा. जाती-धर्मावर आधारित दुजाभाव न करता समाज म्हणून आपण निव्वळ मानवतेचा आणि माणसांच्या जिवाचा विचार करू, तेव्हाच माथेफिरूंच्या हल्ल्यात बळी जाणारी ‘आरती’ तेवत राहील. 

Web Title: Todays editorial on vasai aarti yadav murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.