‘मर्द बनने के लिए, शरीर नहीं, हिंमत चाहिए’, असे त्याच्या खास स्टाइलमध्ये सुनावणाऱ्या धर्मेंद्रने पडद्यावरच्या पुरुष प्रतिमेला वेगळीच उंची आणि खोली दिली! हा नायक दणकट होताच, पण त्याच्या डोळ्यांत हळवी सच्चाई होती. वेडाची झाक होती. प्रेमात आकंठ बुडालेला हा नायक त्यासाठी काहीही पणाला लावायला तयार होता, असा धर्मेंद्र आता आपल्यात असणार नाही, ही कल्पनाही असह्य आहे. सहा दशकांहून अधिक काळ रूपेरी पडदा गाजवत बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ बनलेल्या धर्मेंद्र अर्थात धरम पाजी तथा धर्मेंद्रसिंह देओल यांच्या ‘एक्झिट’नं हिंदी सिनेमाचं एक युग संपलं. अस्सल पंजाबी जाटांचं मर्दानी सौंदर्य, भरभक्कम देहयष्टी, खास गडगडाटी संवादशैली आणि डोळ्यांतून व्यक्त होणारा अंगार, हे धर्मेंद्र यांचं वैशिष्ट्य. त्यामुळंच अवघ्या चित्रपटसृष्टीनं ‘गरम धरम’ ही उपाधी बहाल केलेली. ती सार्थ करत तीनशेवर चित्रपटांमधून (त्यातही तब्बल ४३ ब्लॉकबस्टर) त्यांनी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं.
१९६० मध्ये ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’नं सुरुवात झाली, पण १९६६च्या ‘फूल और पत्थर’नं धर्मेंद्र यांना हिंदी सिनेमाचा पहिला ‘सोलो ॲक्शन हिरो’ बनवलं. सत्तरच्या दशकात त्यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. १९७१ ते १९७५ पर्यंत सलग पाच वर्षं सर्वाधिक कमाई करणारे ते अभिनेते होते. हा विक्रम आजही अबाधित आहे! ‘सीता और गीता’, ‘आया सावन झूम के’, ‘जुगनू’, ‘यादों की बारात’, ‘चुपके चुपके’, ‘प्रतिज्ञा’, ‘द बर्निंग ट्रेन’, ‘मेरा गाव मेरा देश’ यातून त्यांची बहुआयामी प्रतिभा दिसली. पण, खरा धमाका त्यांनी सत्तरच्या दशकात ‘शोले’मध्ये ‘वीरू’ साकारत केला. अमिताभ बच्चनच्या ‘जय’सोबत त्यांचा दोस्तीचा गहिरा रंग पडद्यावर इतका नैसर्गिक वाटला की, ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ हे गाणे आणि त्यांचे संवाद हिंदी सिनेमाच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले. ‘शोले’नंतर ‘धरमवीर’, ‘चरस’, ‘स्वर्ग नरक’, ‘हुकुमत’ अशा ॲक्शनपटांतून तर त्यांनी ‘बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ अशी नाममुद्रा उमटवली. याच दशकात हा सुपरस्टार जणू एखाद्या ज्वालामुखीसारखा उफाळून आला. स्टायलिश पँटमध्ये खोचलेला रंगीत फुलाफुलांचा शर्ट, रूंद पट्टा किंवा साध्या कुर्त्या-पायजम्यात त्यांचं राजबिंडं रूप खुलायचंच, पण खाकी युनिफॉर्म किंवा बंदुकीचा पट्टा खांद्यावर घेतलेल्या डाकूच्या घोळदार धोतर-सदऱ्यातच धर्मेंद्र नावाचा खरा ‘ब्रँड’ नावारूपाला आला. त्यांच्या डोळ्यांतली आग आणि रक्त तापायला लावणाऱ्या डॉयलॉगवर तेव्हाची तरुणाई फिदा होती. ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना!’ किंवा ‘कुत्ते, कमिने, मैं तेरा खून पी जाऊंगा’ अशा जबरी संवादांवर सिंगल स्क्रीन थिएटरच्या गॅलरीतून टाळ्या आणि शिट्ट्या एकदम उसळायच्या. धर्मेंद्र आणि हृषीकेश मुखर्जी हे अभिनेता-दिग्दर्शकाचं ‘कॉम्बिनेशन’ त्यावेळी परफेक्ट मानलं गेलं होतं! हृषीदांनी धर्मेंद्र यांच्यातला वेगळाच पैलू बघितला. संवेदनशील, संकोची, ग्रामीण पार्श्वभूमीचा आणि हळुवार माणसाचा! ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘चुपके चुपके’ यातून हृषीदांनी धर्मेंद्र यांच्यातला अभिनेता बाहेर काढला. ‘सत्यकाम’सारख्या कलात्मक चित्रपटातही धर्मेंद्र यांच्या डोळ्यांतली आग लपत नव्हती. त्यांना संयत अभिनय येतच नव्हता जणू, पण ही मर्यादाच त्यांचं वैशिष्ट्य बनली. प्रेक्षक त्यांना त्या प्रचंड ऊर्जेसाठी पाहायला यायचे.
पुढे ऐंशीच्या दशकात त्यांनी कमी बजेटच्या ॲक्शन चित्रपटांची मालिकाच काढली. ते एकटेच शंभर गुंडांना ठोकायचे! नंतर मोठा मुलगा सनी देओलच्या पदार्पणासाठी ‘बेताब’, तर धाकट्या बॉबीसाठी ‘बरसात’ची निर्मिती केली. वयाच्या नव्वदीत ‘अपने’, ‘यमला पगला दिवाना’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यातून दोन्ही मुलांसोबत पडद्यावर धमाल उडवून दिली. रूपेरी पडद्यावर चमकत असताना त्यांनी राजकीय क्षेत्रही आजमावून पाहिलं. २००४ मध्ये ते भारतीय जनता पक्षाकडून बिकानेरमधून लोकसभेवर निवडून गेले खरे; पण संसदेतली त्यांची हजेरी अत्यल्प राहिली. धर्मेंद्र केवळ अभिनेते नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे खरेखुरे प्रतिनिधी होते. जगण्याचा भरभरून आनंद घेणारा हा ‘पंजाबी पुत्तर’ नव्वदीतही सोशल मीडियावर सक्रिय होता. मातीतला माणूस आणि सुपरस्टार यांचा झकास मेळ घालणारा असा सच्चा, साधा, सशक्त आणि सेंद्रिय अभिनेता पुन्हा चित्रपटसृष्टीला लाभणं कठीणच. धर्मेंद्र आपल्यातून गेले असले, तरी‘ही-मॅन’ नावाची ही ‘फँटसी’ जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार आहे!
Web Summary : Dharmendra, Bollywood's 'He-Man,' redefined masculinity with his action and emotional depth. A versatile actor known for his iconic roles, dialogues, and enduring appeal, his passing marks the end of a golden era. He will forever be remembered for Sholay and many blockbusters.
Web Summary : धर्मेंद्र, बॉलीवुड के 'ही-मैन', ने अपनी एक्शन और भावनात्मक गहराई से मर्दानगी को फिर से परिभाषित किया। अपनी प्रतिष्ठित भूमिकाओं, संवादों और स्थायी अपील के लिए जाने जाने वाले, उनके निधन से एक सुनहरे युग का अंत हो गया। उन्हें हमेशा शोले और कई ब्लॉकबस्टर फिल्मों के लिए याद किया जाएगा।