दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीराख्यांनी व्हाॅट्सॲपवर टाकलेला एक मेसेज विचार करायला लावणारा आहे. ‘शेतमालाच्या व्यापारातला मध्यस्थ हटविण्यासाठी नवे कृषी कायदे केले असे सांगता ना; तर मग आम्हाला डिझेल व पेट्रोलदेखील मध्यस्थांशिवाय हवे आहे. सरकार नावाचा मध्यस्थ दूर करा व आम्हाला कंपन्यांकडून इंधन थेट खरेदी करू द्या’, अशा आशयाच्या या पोस्टमध्ये आंदोलनाच्या समर्थनाचा अभिनिवेश आहेच. पण, हेही खरे की गेल्या आठवडाभरात सर्वसामान्यांच्या वापरातल्या डिझेल व पेट्रोलची ‘महंगाई डायन खाए जा रही है!’ गेले सहा-सात दिवस दोन्ही इंधनांचे दर रोज पंचवीस-तीस पैशांनी वाढत आहेत. मुंबई, तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली. डिझेलही ऐंशीच्या घरात पोहोचले. देशातल्या अन्य सर्व शहरांमध्येही पेट्रोलचे भाव पंचाऐंशी रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. दिवाळीनंतरच्या तीन आठवड्यांमध्ये डिझेल-पेट्रोलच्या भावात तीन-साडेतीन रुपये इतकी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात आणखी किती वाढ होणार याची सर्वसामान्यांना चिंता आहे. कारण इंधनाचे भाव वाढले की महागाई वाढते आणि त्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसते.आता तांत्रिकदृष्ट्या इंधनाच्या दरावर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे अशा दरवाढीविरोधात उठणारा आवाज, केली जाणारी आंदोलने यांना तितकासा तार्किक आधार नाही. पण, या सगळ्या व्यवहारातून सरकार पूर्णपणे अंग काढून घेऊ शकत नाही. कारण, इंधनांवरील अधिभाराच्या रूपाने केंद्र व राज्यांच्या तिजोरीत जमा होणारा मोठा महसूल हेच दरवाढीचे प्रमुख कारण आहे. पेट्रोल किंवा डिझेलची मूळ किंमत व त्यावरील नाना प्रकारचे कर यांची तुलना केली तर मूळ किमतीपेक्षा सरकारने लावलेले कर कितीतरी अधिक आहेत. निवडणूक नजरेसमोर ठेवून गेल्या वर्षी काही राज्यांनी त्यांच्या अखत्यारीतील करांमध्ये कपातीची घोषणा केली होती. त्यामागेही ही मनमानीपणे केलेली करआकारणीच आहे. प्रश्न असा आहे, की निवडणुकीसाठी कर कमी केले जात असतील तर मग आता दर आकाशाला भिडल्यानंतर का नाही? जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलची किंमत वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतात, हा खुलासा ऐकून ऐकून लोकांना तोंडपाठ झाला आहे. हे खरे, की गेल्या महिनाभरात कच्चा तेलाची किंमत प्रतिबॅरल दहा डाॅलर्सनी वाढून पन्नास डाॅलर्सवर पोहोचली. पण, वर्षभरापूर्वी ते दर दहा-पंधरा डाॅलर्सपर्यंत घसरले होते, तेव्हा ग्राहकांना लाभ झाला नाही, स्थानिक बाजारात दर कमी झाले नव्हते. गमतीचा भाग असा की आता जरी कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्या तरी या आधी पेट्रोल-डिझेलचे उच्चांकी दर ऑक्टोबर २०१८ मध्ये नोंदविले गेले होते आणि त्यावेळी क्रूड ऑइलची किंमत जेमतेम तीस डाॅलर्स प्रतिबॅरल इतकीच होती.
आजचा अग्रलेख - डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीच्या झळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 03:59 IST