आज ‘उबर’ चालवाल, झोमॅटोचा पिझ्झा पोचवाल.. उद्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 08:54 IST2026-02-11T08:54:02+5:302026-02-11T08:54:34+5:30

‘गिग्ज’ प्रकारच्या कामांमुळे कायमस्वरूपी असुरक्षितता, अनिश्चित रोजगार आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावात जगणारा कामगारांचा नवा वर्ग जन्माला आला आहे.

Today you will drive 'Uber', deliver pizza from Zomato.. what about tomorrow? Article on Gig Workers | आज ‘उबर’ चालवाल, झोमॅटोचा पिझ्झा पोचवाल.. उद्या काय?

आज ‘उबर’ चालवाल, झोमॅटोचा पिझ्झा पोचवाल.. उद्या काय?

डॉ. कुलदीपसिंह राजपूत, स्थलांतर, कामगार विषयांचे अभ्यासक

परवा एका कॉलेजमध्ये स्थलांतरित आणि गिग कामगारांविषयी व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात एका विद्यार्थिनीने विचारले, “आज शहरांमधील अनेक तरुण विद्यार्थी शिक्षणासोबत  पार्ट-टाइम गिग कामगार म्हणून काम करतात, अर्थव्यवस्थेत काम करण्याच्या  या ‘फ्लेक्सिबिलिटी’कडे तुम्ही कसे पाहता?”- बदलत्या श्रमबाजाराचे स्वरूप समजून घेण्यासाठीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. 

वरकरणी पाहता रोजगारातील ही ‘फ्लेक्सिबिलिटी’ आकर्षक आहे. मात्र, मुख्य प्रवाहातील रोजगारच तात्पुरता, कंत्राटी आणि अस्थिर होत असेल, तर तो रोजगाराच्या स्थैर्यावर व कामगारांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारा संरचनात्मक बदल ठरतो आणि आपण अशा अर्थव्यवस्थेत प्रवेश केला आहे.
सन २००९मध्ये अमेरिकेत उबर कंपनीची  स्थापना होऊन जगभरात सेवा, रोजगार क्षेत्रात आणि कामगार संबंधात मोठी क्रांती घडली. उबर आज ६०हून अधिक देशात आणि ६००हून अधिक मोठ्या शहरात सेवा देत आहे. भारतात २०१०मध्ये ओलाची स्थापना होऊन सेवा क्षेत्रात होणाऱ्या जागतिक बदलात आपणही सामील झालो. आज भारतीयांची ओला २५०हून अधिक शहरांत सेवा देत आहे. अमेरिकेतील उबरच्या यशानंतर हे ‘ॲप- आधारित मॉडेल’ झपाट्याने जगभरात इतर सेवा क्षेत्रांत पसरले. 

आज अन्न वितरण, ई-कॉमर्स, घरगुती सेवा, लॉजिस्टिक्स, आरोग्यसेवा, कंटेंट निर्मितीपर्यंत सेवांचे ‘उबराईझेशन’ झाले आहे. एकीकडे या प्रक्रियेने ग्राहकाला खूश करत जलद, स्वस्त आणि सहज सेवा उपलब्ध करून दिल्या, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माणही केला. पण, या तात्पुरत्या आणि असुरक्षित रोजगारात कंत्राटं देऊन कमी वेतनात कामे करून घेतली जाऊ शकतात, हे तत्व इतर सर्वच क्षेत्रात वेगाने स्वीकारले जाऊ लागले. परिणामी आधीच्या स्थायी नोकऱ्यांच्या जागी ‘गिग्ज’ आले आणि रोजगार संघटित व्यवस्थांकडून असंघटित स्वरुपात बदलू लागला. २००९मध्ये जगभर सुरू झालेली ‘उबराईझेशन’ची प्रक्रिया केवळ ‘डिजिटल इनोव्हेशन’पुरती मर्यादित न राहता, श्रम बाजारपेठेच्या आणि कामगार संरचनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. आज ही व्यवस्था भारतातही स्थिरावताना दिसत आहे.

सन २०११मध्ये ख्यातनाम श्रम अभ्यासक गाय स्टँडिंग यांनी ‘द प्रिकॅरियट: द न्यू डेंजरस क्लास’ या पुस्तकात कामगार वर्ग, भांडलवशाही आणि जागतिक श्रमबाजारपेठांच्या बदलत्या स्वरुपाचे आकलन करण्यासाठी एक नवी सैद्धांतिक चौकट दिली. या पुस्तकात स्टँडिंग यांनी कायमस्वरूपी असुरक्षितता, अनिश्चित रोजगार आणि सामाजिक सुरक्षेच्या अभावात जगणारा कामगारांचा एक नवा सामाजिक वर्ग जन्माला आल्याचे मांडले आहे, हा वर्ग म्हणजे ‘प्रीकॅरियट’ होय. स्टँडिंग यांच्या मते, हा पारंपरिक कामगार वर्गापेक्षा वेगळा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कामगारांना स्थिर नोकऱ्या, निश्चित वेतन, कामगार संघटनांचा आधार आणि सामाजिक सुरक्षा यांचा लाभ मिळत होता. मात्र उदारीकरण, खासगीकरणाच्या रेट्यामुळे कामगारांसाठी असलेल्या सामाजिक संरक्षणात्मक चौकटी हळूहळू मोडीत निघाल्या. परिणामी, मोठ्या प्रमाणावर कामगार नोकरीची हमी, निश्चित कामाचे तास, उत्पन्नाची स्थिरता आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव असलेल्या अस्थिर रोजगार व्यवस्थेत ढकलले गेले. आज रोजगाराचे होत असलेले ‘उबराईझेशन’म्हणजे स्टँडिंग यांचा ‘प्रीकॅरिटी’चा सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवायला येत असल्याचे उदाहरण आहे.

आज आपल्याकडेही कामगारांचा प्रचंड मोठा वर्ग कंत्राटी नोकऱ्या, गिग-प्लॅटफॉर्म काम, असंघटित रोजगार, वारंवार रोजगार बदलत मिळेल ते काम करत आहे. १९९१च्या उदारीकरणानंतर निर्माण झालेल्या सुमारे ६.१ कोटी नोकऱ्यांपैकी ९२ टक्के नोकऱ्या असंघटित स्वरुपाच्या असल्याचे केंद्राच्या पीरिऑडिकल लेबर फोर्स सर्वेक्षण (२०१७–१८) मधील आकडेवारी दर्शविते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या असल्या तरी त्याचबरोबर तंत्रज्ञानाधिष्ठीत नवीन जोखिमा, कोंडी, अस्थिरताही अधिक तीव्र झाल्या आहेत. 

विशेष म्हणजे या प्रीकॅरियट कामगारांचे संघटन करणे अतिशय अवघड होत आहे. या असुरक्षिततेचा दीर्घकालीन परिणाम कामगारांच्या जीवनावर होतो. अस्थिर उत्पन्नामुळे कुटुंब नियोजन, मुलांचे शिक्षण, घर, आरोग्यसेवा आणि मानसिक आरोग्य यांसारख्या मूलभूत बाबींवर गंभीर परिणाम होतो. श्रम बाजारपेठेतील प्रस्थापित झालेली ‘फ्लेक्सिबिलिटी ते प्रीकॅरिटी’ही व्यवस्था नव-उदारमतवादी, गैर-समावेशक धोरणांची देण आहे. आज या व्यवस्थेत अकुशल ते कुशल बहुसंख्य कामगारांची फरपट होत आहे. यावर ठोस उपाय म्हणजे मजबूत, सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा आणि हक्काधिष्ठित दृष्टिकोन स्वीकारणे.
    rajputkdr@gmail.com

Web Title : उबर से ज़ोमैटो: गिग वर्क का अनिश्चित भविष्य

Web Summary : गिग वर्क का उदय लचीलापन प्रदान करता है, लेकिन नौकरी की सुरक्षा को खतरे में डालता है। सेवाओं का 'उबेरीकरण' असुरक्षित, कम वेतन वाली नौकरियाँ पैदा करता है, श्रमिकों को अनिश्चितता में धकेलता है। इस बदलते श्रम बाजार में कमजोर श्रमिकों की रक्षा के लिए सामाजिक सुरक्षा और अधिकार महत्वपूर्ण हैं।

Web Title : From Uber to Zomato: The Precarious Future of Gig Work

Web Summary : Gig work's rise offers flexibility but threatens job security. The 'uberization' of services creates insecure, low-wage jobs, pushing workers into precariousness. Social security and rights are crucial for protecting vulnerable workers in this evolving labor market.