आजचा अग्रलेख: हे ‘पाप’ कसे धुणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:57 IST2025-01-30T07:57:05+5:302025-01-30T07:57:29+5:30

या महाकुंभात व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक झाला आहे. सरकारचे काैतुक व्हावे म्हणून कथित प्रतिष्ठितांची सरबराई सुरू आहे. सामान्य श्रद्धाळू मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत.

Today editorial on stampede in kumbh mela 2025 | आजचा अग्रलेख: हे ‘पाप’ कसे धुणार?

आजचा अग्रलेख: हे ‘पाप’ कसे धुणार?

मानवी इतिहासातील सर्वांत मोेठे आयोजन म्हणून जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या प्रयागराजच्या महाकुंभाला बुधवारी पहाटे चेंगराचेंगरीचा डाग लागला. माैनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलेल्या बायाबापड्या, आबालवृद्धांचे त्यात बळी गेले. अनेकजण जखमी झाले. मृत व जखमींचा आकडा अधिकृतपणे सांगितला गेलेला नाही. परंतु, सत्तर रुग्णवाहिका धावतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका तासात तीनवेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलतात किंवा सर्व तेरा आखाडे अमृतस्नान पुढे ढकलतात, याचाच अर्थ दुर्घटना मोठी आहे. या दुर्घटनेची जबाबदारी कोणीतरी स्वीकारायला हवी.

पुराणकथेनुसार समुद्रमंथनानंतर कुंभातील अमृताच्या वाटणीवरून देव-दानवांमध्ये युद्ध जुंपले. आकाशमार्गे तो अमृताचा कुंभ देवलोकात नेताना जिथे अमृताचे थेंब सांडले ते प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन व नाशिक या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. या ठिकाणी स्नान केल्याने पापांचे क्षालन होते, ही हिंदूंची धार्मिक मान्यता आहे. चार ठिकाणी हा मेळा भरतो म्हणजे देशात दर तीन वर्षांनी एक कुंभमेळा होतो. त्याशिवाय, प्रयागराजला सहा वर्षांनंतर अर्धकुंभ होतो. त्याला पूर्वी ‘माघ मेला’ म्हटले जायचे. आता आयोजनाचे राजकीय महत्त्व मोठे असल्याने मेळा वगैरे शब्द किरकोळ ठरतो. शिवाय यंदा मालिकेतला बारावा अर्थात १४४ वर्षांनंतरचा महाकुंभ म्हणून जोरदार प्रचारही सुरू आहे. काहीही असले तरी हे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे आयोजन नक्कीच आहे. तब्बल ३५-४० कोटी लोक कुंभपर्वाच्या ४५ दिवसांत प्रयागराजला येतील, असा खुद्द सरकारचाच दावा आहे. हेच सरकार चेंगराचेंगरीनंतर कित्येक तासांत मृत व जखमींचा आकडा देत नाही हा दुर्दैवी विराेधाभास. या कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन, व्यवस्थापनाची जबाबदारी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारवर आहे. त्यातही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वत: शैव आखाड्याशी संबंधित, म्हणजे शब्दश: व्यवस्थापकांच्या भूमिकेत आहेत. हजारो कोटी रुपये  आयोजनावर खर्च होत असताना चेंगराचेंगरीत भाविकांचे जीव जावेत आणि योगींनी त्यासाठी अफवांचे कारण पुढे करावे, हे संतापजनक आहे. खरी व अधिकृत माहिती दडपली जात असताना या दुर्घटनेची समोर आलेली कारणे योगींच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहेत. या महाकुंभात व्हीआयपी संस्कृतीचा अतिरेक झाला आहे. सरकारचे काैतुक व्हावे म्हणून कथित प्रतिष्ठितांची सरबराई सुरू आहे. सामान्य श्रद्धाळू मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहेत.

माैनी अमावस्येच्या दिवशी कोट्यवधी भाविक गंगा, यमुना व सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी येणार हे माहीत असतानाही नदीवरील २८ पैकी बहुतेक पूल बंद ठेवण्यात आले. भल्या पहाटे लाखो लोक संगम नोजकडे जात असताना घाटावर येण्यासाठी व परत जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवण्यात आले नाहीत. २००३ मध्ये नाशिक, २०१३ मध्ये तेव्हाचे अलाहाबाद म्हणजेच खुद्द प्रयागराज, १९८६ मध्ये हरिद्वार येथील चेंगराचेंगरीचा अनुभव गाठीशी असूनही अशी दुर्घटना रोखण्याचे प्रयत्न होऊ नयेत, हा अपराध आणि पाप-पुण्याच्याच भाषेत सांगायचे तर पाप आहे. अशा मोठ्या आयोजनातील तंत्रज्ञानाच्या वापरावर खूप बोलले गेले. पण, तो वापर अनुभवास येत नाही. २०१५ मधील नाशिक सिंहस्थावेळी या तंत्रज्ञानाचा चांगला वापर झाला होता. अमेरिकेतील एमआयटीमध्ये कार्यरत डाॅ. रमेश रासकर व सहकाऱ्यांनी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी कुंभथाॅन राबविले. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. कुंभमेळा आणि माणसांचे हरवणे याला शतकांचा इतिहास आहे. पण, नाशिकच्या कुंभमेळ्यात जे हजार-दीड हजार लोक हरवले ते सगळे सुखरूप सापडले. हा प्रयोग नंतर उज्जैनला राबविण्यात आला. प्रयागराजलाही असे करता आले असते. तिथे सरकारने अधिकृतपणे अर्नस्ट अँड यंग या जगातील मोठ्या व्यवस्थापन संस्थेकडे गर्दीवर नियंत्रणाची जबाबदारी सोपविली आहे. तरीदेखील दुर्घटना घडली असेल तर  या संस्थेनेदेखील ही जबाबदारी स्वीकारायला हवी. ती स्वीकारली जात नसेल तर सरकारने त्यांना दिलेली रक्कम रोखायला हवी. अशा काही उपाययोजना केल्या तरच चेंगराचेंगरीच्या रूपाने प्रशासनाच्या हातून घडलेले पाप काही प्रमाणात धुऊन निघेल.

Web Title: Today editorial on stampede in kumbh mela 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.