लग्नासाठी टिकटॉकर मातेचा घेतला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:51 IST2025-07-31T08:51:43+5:302025-07-31T08:51:43+5:30
पाकिस्तानात सध्या नुकतीच घडलेली एक घटना जगभरात व्हायरल होते आहे.

लग्नासाठी टिकटॉकर मातेचा घेतला जीव!
पाकिस्तानात सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सची मोठ्या प्रमाणात हत्या होते आहे. तरुणींना टार्गेट करण्यात येत असून, त्यांना नाहक आपले प्राण गमवावे लागत आहेत; पण हे प्रमाण आता इतकं वाढलंय की तरुण मुली तर जाऊ द्या, त्यांच्या आयांनाही मारलं जात आहे. पाकिस्तानात सध्या नुकतीच घडलेली एक घटना जगभरात व्हायरल होते आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सुमीरा राजपूत ही एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर. टिकटॉक क्रिएटर म्हणून पाकिस्तानात ती बरीच प्रसिद्ध आहे. तिची १५ वर्षीय मुलगीही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. या दोघींचे मिळून एक लाखापेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत; पण याच सुमीरा राजपूत यांची नुकतीच हत्या झाली. का? तर १५ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या सुमीरावरही लग्नासाठी जबरदस्ती केली जात होती.
सुमीरा यांच्या मुलीनंच स्वत: सांगितलं, काही जण जबरदस्तीनं माझ्या आईशी लग्न करण्यासाठी बऱ्याच काळापासून तिला त्रास देत होते, तिचा छळ करीत होते. तिनं लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आली.
सुमीरा राजपूतचे टिकटॉकवर ६० हजार फॉलोअर्स आहेत, तर १० लाखांपेक्षा जास्त लाइक्स अनेकदा तिच्या कंटेन्ट्सला मिळाले आहेत. त्यांची मुलगीही टिकटॉकवर ॲक्टिव्ह असून, टिकटॉकवर तिचेही ५८ हजार फॉलोअर्स आहेत. पाकिस्तानात महिलांची, तरुणींची हत्या हा प्रकार नवीन नाही. त्यातलं प्रमुख कारण अर्थातच ‘ऑनर किलिंग’ आहे. घराची, कुटुंबाची, समाजाची इज्जत धुळीला मिळवली, ‘संस्कृती बुडवली’ म्हणून त्यांना ठार मारलं जातं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तरुणी तर सोडाच; पण ज्या महिला स्वत: माता आहेत, ज्यांना मुलं आहेत, अशा मध्यमवयीन महिलांनाही याच आरोपाला सामोरं जाऊन त्यांच्याच घरच्यांकडून त्यांचा जीव घेतला जातो. जीव घेणारी व्यक्ती बऱ्याचदा कधी त्यांचा सख्खा भाऊ असतो, कधी बाप असतो, कधी नवरा असतो, तर कधी दीर..
गेल्या वर्षभरात पाकिस्तानात ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली ५४७ महिलांना आपला जीव गमवावा लागला! त्यांच्या कटुंबीयांनीच त्यांचा जीव घेतला! इस्लामाबादच्या ‘सस्टेनेबल सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माहितीनुसार गेल्यावर्षी पाकिस्तानात ३२ हजारांपेक्षाही जास्त लैंगिक हिंसाचाराच्या तक्रारी पाेलिसांकडे दाखल झाल्या. त्यात ५४७ घटना ऑनर किलिंगच्या होत्या. लैंगिक हिंसाचाराच्या घटना तर मोजता येणार नाहीत इतक्या आहेत. कारण आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्यास महिला स्वत:च त्याची तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. कारण बऱ्याचदा या घटनांमध्ये मुख्य आरोपी त्यांचा जवळचा नातेवाईकच असतो!
नुसत्या बलुचिस्तान प्रांतातच गेल्यावर्षी ऑनर किलिंगच्या ३२ अधिकृत घटना घडल्या. त्यातल्या केवळ एकालाच आतापर्यंत शिक्षा झालेली आहे. गेल्याच महिन्यात १७ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सना युसूफला तिच्याच घरात गोळ्या घालण्यात आल्या होत्या.. सोशल मीडिया स्टार कंदील बलोचलाही याच पद्धतीनं तिच्याच घरात गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. पाकिस्तानची ती पहिली सोशल मीडिया सेलिब्रिटी मानली जाते.