विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
By यदू जोशी | Updated: September 12, 2025 07:26 IST2025-09-12T07:23:11+5:302025-09-12T07:26:07+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion:व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम तर आहे; पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते.

विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
-यदु जोशी (सहयोगी संपादक, लोकमत)
एकेकाळी फाटाफुटीनंतर एकमेकांचा चेहरा बघण्यासही तयार नसलेले उद्धव आणि राज ठाकरे आता युतीच्या मार्गावर आहेत. दोघांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत. परवा शिवतीर्थावर दोघा भावांनी सोबत येण्याची 'ब्ल्यू प्रिंट' नक्कीच केली असेल. मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते. राज यांच्याकडे जेवढा मोठा टीआरपी आहे तेवढी मोठी व्होटबँक नाही. काँग्रेसकडे टीआरपी नसेल, पण व्होटबँक तर आहेच. व्होटबँकवाल्या काँग्रेसपेक्षा टीआरपीवाल्या भावाला उद्धव यांनी जवळ केले आहे. यात जोखीम आहे पण ती स्वीकारायची असे त्यांनी ठरवलेले दिसते.
उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिकेत नक्कीच अडकलेला आहे. या महापालिकेवर आपला झेंडा नसेल तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल, असे त्यांना वाटत असणार आणि ते खरेदेखील आहे. उद्धव यांच्याकडे असलेल्या 'मराठी व्होटबँके'त आधीच एकनाथ शिंदे यांनी काही प्रमाणात छिद्र केले आहे. ते बुजवता येणे शक्य नाही.
राज ठाकरे यांनीही छिद्र केले आहे. ते बुजविण्याला संधी आहे आणि त्या दृष्टीनेच उद्धव यांचे प्रयत्न आहेत. मुंबईत सत्ता टिकवली तर त्या भरवशावर राज्यात पाच वर्षे राजकारण करता येईल आणि राज यांच्या सोबतीने आणखी काही ठिकाणी जिंकता आले तर तो बोनस असेल, असा साधारणपणे उद्धव यांचा विचार दिसतो आणि त्यासाठीच ते आपले चुलत बंधू राज यांना सोबत घेऊ पाहत आहेत.
राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असलेले राज यांनाही दुसरा पर्याय नाही. केवळ राजकीय अपरिहार्यतेतून दोघे एकत्र आले तर त्यांची एकी फार काळ टिकणार नाही; पण दोघांमध्ये भावनिक समेट झाला असेल तर मात्र ते दीर्घकाळ एकत्र राहतील.
मुंबईवरील वर्चस्व कायम टिकवण्यासाठी राज यांचा हात हातात घेऊन उद्धव पुढे गेले तर काही गोष्टी मात्र ते निश्चितच गमावतील. उद्धव हे भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत गेले तेव्हापासून त्यांना दलित-मुस्लीम आणि परंपरेने काँग्रेससोबत असलेल्या मतदारांनी जी साथ दिली आहे ती राज यांना सोबत घेण्याने मिळणार नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस आणि काँग्रेस विचारांची मते मिळाली होती तेवढ्या प्रमाणात त्यांची मते काँग्रेसला ट्रान्सफर झाली नव्हती. आपली मते उद्धव यांना ट्रान्सफर होतात; पण त्यांची मते पूर्णपणे आपल्याला मिळत नाहीत, याचा तपशीलवार अभ्यास मुंबई आणि राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने केला आहे. त्याची आकडेवारीदेखील आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलताना एक भावना जाणवते की उद्धव-राज एकत्र आले तर फार वाईट वाटण्याचे कारण नाही. उलट काँग्रेसला मोठी स्पेस मिळेल. याला त्याला खांद्यावर घेत भार वाहून नेण्यापेक्षा बिनाभाराचे चाललो तर झपझप चालता येईल, असे मानणारा नेत्यांचा वर्ग काँग्रेसमध्ये मोठा आहे. कितीही वाईट परिस्थिती असली तरी बिनभाराची चाल चालावी, असे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना वाटत आहे. अर्थात, दिल्ली त्यांना अंतिमतः काय सांगते ते महत्त्वाचे.
उद्धव यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत राहावे आणि राज ठाकरे यांची साथही घ्यावी, असेही होऊ शकते. आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका अशा तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असे जवळपास चित्र आहे.
अशावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका यामध्ये सध्या आहे तशी महाविकास आघाडी असावी. त्यात काँग्रेस उद्धवसेना आणि शरद पवार गट असेल. महापालिका निवडणुका सर्वात शेवटी म्हणजे पुढच्या वर्षी जानेवारीअखेर होतील अशी शक्यता आहे. त्यावेळी मग उद्धव-राज यांनी एकत्र यावे असा पर्याय खुला असेल.
उद्धव यांनी आधी महाविकास आघाडीत राहावे आणि नंतर राज यांच्यासोबत जावे असा पर्याय पुढे आला तर तो काँग्रेस आणि शरद पवार यांना मान्य असेल का, हेही महत्त्वाचे. मुंबई महापालिकाकेंद्रित विचार करून उद्धव हे शिवतीर्थावर पोचले आहेत. काँग्रेस 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे.
yadu.joshi@lokmat.com