...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 07:56 IST2025-07-29T07:53:52+5:302025-07-29T07:56:14+5:30
उपराष्ट्रपती धनखड यांचे पतन हा भाजपसाठी धोक्याचा इशारा होय. योग्य वेळेत आपल्या मुळांकडे परतला नाही, तर सत्ताकांक्षी भाजप केवळ भविष्यहीन पक्ष बनेल.

...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याने देशाच्या राजकीय क्षितिजाला तडे जावेत इतका गडगडाटी गदारोळ झाला. भाजपने काळजीपूर्वक तयार केलेल्या ‘कथ्या’चा (नरेटिव्ह) चक्काचूर झाला. ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे’ अशा मुखवट्याखाली झालेल्या या पदत्यागाचा औषधोपचाराशी काही संबंध नव्हता. हिंदुत्वाचा धगधगता ध्वजवाहक असलेले जाट नेते धनखड, आपले भगवेपण एखाद्या सन्मानचिन्हासारखे मिरवत राजस्थानातून ल्युटेन्स दिल्लीत आले होते. पण खुशामत आणि महत्त्वाकांक्षा यामधील कसरतीत कुठेतरी त्यांच्याकडून मर्यादाभंग झाला. खरे तर, क्षमता नसतानाही ते उपराष्ट्रपती झाले. त्यांच्या अनिर्बंध वक्तव्यांनी पक्षातील आतला गोट सावध झाला.
अखेरीस मोदींनी आपले मौन सोडून एक्सवर त्यांच्याबद्दल एक त्रोटक, भावशून्य पोस्ट लिहिली. तो धनखड यांचा राजकीय मृत्युलेखच होता. मग मात्र धनखडांवर नियोजनबद्ध टीकेचा भडिमार सुरू झाला. निष्ठावान संघस्वयंसेवकांना योग्य संकेत मिळताच दडवलेली शब्दशस्त्रे पटापट बाहेर आली. परंतु धनखडांच्या अशा अपघाती आणि लज्जास्पद गच्छंतीमुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.
वयाच्या पंचाहत्तरीनंतर नेत्यांनी पदावरून पायउतार झाले पाहिजे हा भाजपचा अलिखित नियम! काही जणांना वेचून दूर करण्यासाठी आणि वैचारिक अनुरूपता नसलेल्या इतर अनेकांना पदोन्नत करण्यासाठीच हा नियम आणला/वापरला गेला हे उघड गुपित. परिणामस्वरूप, २०१४ ला मोदी-शहांची सत्ता स्थिरावत असताना अनेक जुन्या जाणत्या पण गैरसोयीच्या नेत्यांना पक्षात किंवा सरकारात काम करण्याची संधी नाकारण्यात आली. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे दिग्गज आदरपूर्वक बाजूला केले गेले आणि त्यांची जागा ताज्या दमाच्या आक्रमक नेतृत्वाने घेतली. महत्त्वाचे विरोधी पक्ष ‘राजकीय जीवाश्मां’चे संग्रहालय बनले असताना भाजपने अतिज्येष्ठांना निवृत्ती सक्तीची करणे हे प्रभावी वेगळेपण ठरते. हा नियम सुरूही आहे आणि होकायंत्रही. त्यामुळे नकोसे झालेले खराब लाकूड कापले जाते आणि पक्षाच्या नौकेला नवचैतन्याच्या मार्गावर दिशाही मिळते.
या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचे निर्गमन हे व्यवस्थात्मक पुनर्रचनेचे सुतोवाच ठरते. लोकसभा निवडणुकीत केवळ २४० जागा मिळाल्याच्या तडाख्याने पक्षातील उणिवा उघड्या पडल्या, सहकारी पक्षावरील अवलंबनामुळे भाजपचे वर्चस्वही उणावले. भाजपच्या अहंकारावर मोहन भागवत यांनी केलेल्या प्रखर टीकेमुळे बळ येऊन आरएसएस आता वैचारिक निष्ठेचा आग्रह धरू लागलेला दिसतो. धनखड यांचे पतन हे संघाच्या मुशीतून न घडलेल्या लोकांना उच्च स्थानी बसवल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचे द्योतक मानले जाते आहे. संघाच्या गुणवैशिष्ट्यात आणि नीतिमूल्यांत मुरलेले लोक हवेत, अस्थिर संधीसाधूंचा भरणा नको हा संघाचा आक्रोश आहे. त्यातच कट्टर स्वयंसेवक असलेल्या राजनाथ सिंह यांचे नाव उपराष्ट्रपतिपदासाठी पुढे आले आहे. तसे घडले तर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणे भाग पडेल. गेली पाच वर्षे मंत्री असलेल्या अनेकांना पदावरून जावे लागेल. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या लांबत चाललेल्या कारकिर्दीमुळे संघटनात्मक रचनेतील बदलही अडला आहे.
‘नेत्यांनी पंचाहत्तरीनंतर निवृत्त व्हावे’ असा मुद्दा नुकताच मोहन भागवत यांनी मांडला. याचे पडसाद परिवारात उमटले. येत्या सप्टेंबरात भागवत आणि मोदी हे दोघेही ७५ वर्षांचे होतील. परंतु, निवृत्तीच्या नियमाला ते मात्र अपवाद ठरतील. वयाचा मुद्दा लागू करण्यातील या अनाकलनीय विसंगतीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. अनेक भाजप आणि संघ कार्यकर्ते अडगळीत टाकले जात असताना मोदी सत्तरीतल्या सल्लागारांना निरोप देत नाहीत आणि नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुनः पुन्हा वाढवत राहतात. मग ‘केवळ संघातील ज्येष्ठांनाच कोपऱ्यात का बसवले जावे’ असा प्रश्न येतो. थातूरमातूर डागडुजीची वेळ निघून गेली असून भाजपसाठी हा निर्णायक टप्पा आहे. धनखड सरसर वर चढले, पण धप्पकन खाली पडले. नेतृत्वबदलाची घटिका उभी ठाकलेली असताना, वैचारिक स्पष्टता पुन्हा बळकट करण्याची नवी संधीच भाजपला मिळाली आहे. कार्यकर्त्यांनाही सोयीचे नव्हे तर ठाम विचारसरणीचे राजकारण हवे आहे. मोदींची मार्चमधील नागपूर भेट निव्वळ प्रतीकात्मक नव्हती, ते एक प्रायश्चित्त होते. निवडणुकीतील विजयाच्या मागे लागून भाजप निहित मार्गापासून ढळला असल्याची ती नि:शब्द कबुली होती.
भगव्या राजकारणाचे पुढील पर्व हे ठाम विश्वास, शिस्त आणि वैचारिक निष्ठा यांनीच प्रेरित असायला हवे, असे संघाने भाजपला स्पष्टपणे बजावलेले दिसते. २०२९ पर्यंत बारा राज्यांत निवडणुका होणार आहेत. भाजपला योद्धे हवे आहेत, वातकुक्कुट नकोत. योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस या निकषावर नीट उतरतात. इतरांना चाळण लावून बाजूला सारावे लागेल. सोयीसाठी आणलेले भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत. भाजपने आपल्या मुळांकडे परतले पाहिजे, अन्यथा तो सत्तेच्या मागे लागलेला एक दिशाहीन, निष्ठाहीन आणि अंतत: भविष्यहीन पक्ष बनेल.