रोबोट्स माणसांच्या नोकऱ्या घालवतील आणि माणसं बेरोजगार होतील अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती, आजही व्यक्त केली जात आहे, पण तंत्रज्ञान कोणीही रोखू शकत नाही आणि जे कोणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार नाहीत, ते मागे पडतील, उशिरा का होईना, त्यांना तंत्रज्ञानाची कास धरावीच लागेल, हे एव्हाना सिद्ध झालं आहे. त्यामुळेच रोबोट्स आज ‘हमाली कामा’पासून ते वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात कामापर्यंत प्रत्येक ठिकाणी दिसू लागले आहेत. ‘मानवाचे सोबती’ ही त्यांची प्रतिमाही आता मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे.
त्याच्याच पुढचा टप्पा म्हणजे ‘मानवाचे प्रतिस्पर्धी’ म्हणूनही रोबोट्स आता पहायला मिळतील. त्याचा पहिला टप्पा आता लवकरच पाहायला मिळेल. मानवी धावपटू आणि ‘ह्यूमनॉइड रोबोट्स’ यांच्यातील जगातली पहिली अर्धमॅरेथॉन स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यात चीनमध्ये पाहायला मिळेल. २१ किलोमीटर धावण्याच्या या शर्यतीत मानव आणि यंत्रमानव एकाच वेळी धावताना दिसतील.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शर्यतीतला स्पर्धक, मग तो मानव असो किंवा यंत्रमानव, पहिल्या तीन क्रमांकाची माेठी बक्षिसं त्यांना दिली जाणार आहेत. ‘ह्यूमनॉइड रोबोट्स’ म्हणजे माणसासारखे दिसणारे रोबोट्स. वेगवेगळ्या वीस जागतिक कंपन्यांनी तयार केलेल्या डझनभर रोबोट्सबरोबर धावण्याचं मोठं आव्हानं मानवी धावपटूंपुढे असेल. १२ हजारपेक्षाही जास्त धावपटू या शर्यतीत धावतील. या यंत्रमानव धावपटूंसाठी काही नियमही आहेत. या यंत्रमानवांना माणसासारखं दोन पायांवर धावता आलं पाहिजे. त्यांची उंची ०.५ मीटर ते दोन मीटरच्या आत असावी. यंत्रमानव धावत असताना त्यांची बॅटरीही बदलता येणार आहे. रिमोटवर कंट्रोल करता येणारे आणि स्वयंचलित अशा दोन्ही प्रकारच्या रोबोट्सना या स्पर्धेत भाग घेता येईल. विविध जागतिक कंपन्या, संशोधन संस्था, रोबोट क्लब्ज आणि विद्यापीठांनाही आपल्या यंत्रमानवांना या स्पर्धेत उतरवता येईल.
जगभरात रोबोट्सच्या वापराला आणि निर्मितीला चालना मिळावी या हेतूनं चीननं ही स्पर्धा आयोजित केली आहे. राेबोट्सच्या निर्मितीत सध्या चीनचा दबदबा आहे. चीनमध्ये २०२३ या वर्षात वेगवेगळ्या कामांसाठी तब्बल २,७६,३०० रोबोट्स बनवण्यात आले. जगात त्या वर्षी तयार झालेल्या एकूण रोबोट्सच्या तब्बल ५१ टक्के एवढं हे प्रमाण होतं. २०३०पर्यंत चीनमध्ये रोबोट्स निर्मितीच्या क्षेत्रात तुफान घोडदौड दिसून येईल आणि या क्षेत्रातील त्यांची उलाढाल तब्बल ५५ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
चीनच्या ‘एम्बडिड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रोबोटिक्स इनोव्हेशन सेंटर’नं तयार केलेल्या ‘तिआनगाँग’ या ह्यूमनरॉइड रोबोट्सनंही याआधी एका अर्धमॅरेथॉनमध्ये (२१ किलोमीटर) भाग घेतला होता. या रोबोटचा वेग ताशी दहा किलोमीटर इतका होता. अर्थात, या स्पर्धेत हा रोबेट ‘स्पर्धक’ म्हणून नव्हे, तर ‘पेसर’ म्हणजे धावपटूंना प्रोत्साहन, उत्तेजन देण्यासाठी धावपटूंबरोबर धावत होता.
जगापुढे ‘आदर्श’ घालून देण्यासाठी या वर्षअखेरपर्यंत ह्यूमनॉइड रोबोट्सचा सहभाग असलेली विविध खेळांसाठीची जागतिक स्पर्धाही चीन आयोजित करणार आहे. त्यातही या रोबोट्सचा जलवा पाहायला मिळेल!..