जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 05:20 IST2025-05-13T05:19:14+5:302025-05-13T05:20:44+5:30

अनेक रुग्णांना तर पैशांअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आपल्या प्राणांचीही बाजी लावावी लागते. 

the world first robotic ai hospital | जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल!

जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल!

सध्याची परिस्थिती अशी आहे, कोणत्याही दिवशी, कोणत्याही दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये जा, तिथे रुग्णांची महाप्रचंड गर्दी असते. डॉक्टर रुग्णांवर उपचार करण्यात बिझी असतात आणि रुग्णांनाही आपला नंबर येईपर्यंत बराच काळ ताटकळत उभं राहावं लागतं. रुग्णांचा डॉक्टरांवर भरवसा असला तरी आपल्यावर योग्य, सर्वोत्तम उपचार व्हावेत अशीच प्रत्येकाची इच्छा असते. पण रुग्णांना बऱ्याचदा हा खर्च सोसत नाही. अनेक रुग्णांना तर पैशांअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आपल्या प्राणांचीही बाजी लावावी लागते. 

यावरच उपाय म्हणून चीननं जगातलं पहिलं असं रुग्णालय उघडलं आहे, ज्यात अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आहेत, अत्याधुनिक सेवा आहे, ज्याची फी अत्यंत वाजवी आहे, रुग्णालयात पराकोटीची स्वच्छता आहे, रुग्णांना येथे रांगा लावण्याची, ताटकळत बसण्याची गरज नाही. एकाच दिवशी तब्बल तीन हजार रुग्ण तपासण्याची या रुग्णालयाची क्षमता आहे, जी येत्या काळात आणखी वाढेल!

एकाच दिवशी तीन हजार रुग्ण इथे तपासले जाऊ शकतात, तर मग इथे डॉक्टरांची संख्याही हजारांत असेल, असं अनेकांना वाटेल, पण तसं नाही. - या रुग्णालयांत केवळ ४२ डॉक्टर आणि चार नर्स आहेत! - मग कसं शक्य आहे इतक्या रुग्णांवर उपचार करणं? - कारण हे सारे डॉक्टर आणि नर्स ‘एआय’ संचलित रोबोटिक तज्ज्ञ आहेत. या रुग्णालयाच्या माध्यमातून चीन आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती घडवू पाहात आहे. त्सिंगुआ विद्यापीठानं विकसित केलेलं हे ‘एजंट हॉस्पिटल’ सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय झालं आहे. हे हॉस्पिटल संपूर्णपणे सज्ज असलं तरी अजून जनतेसाठी ते खुलं करण्यात आलेलं नाही. लवकरच या रुग्णालयातून आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असं आश्वासन मात्र संयोजकांनी दिलं आहे. 

दररोज ३००० रुग्ण तपासण्याची क्षमता तर या रुग्णालयाची आहेच, याशिवाय एआय आणि मशीन लर्निंगद्वारा संचलित हे रोबोटिक डॉक्टर्स अतिशय उच्च गुणवत्ताधारक आहेत. कोणत्याही मानवी तज्ज्ञांपेक्षा अधिक वेगानं ते नवीन गोष्टी शिकू शकतात आणि त्यांच्याकडे असलेल्या डेटाचं अत्यंत वेगानं विश्लेषणही करू शकतात. कोणत्याही मानवी डॉक्टरांच्या हस्तक्षेपाशिवाय हे डॉक्टर उपचार करू शकतात. स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून रुग्ण कुठूनही या डॉक्टरांशी केव्हाही संपर्क साधू शकतात. 

मानवी डॉक्टरांना ज्याप्रमाणे विविध परीक्षांच्या माध्यमांतून आपली गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करावी लागते, तसंच या डॉक्टरांनीही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या एआय डॉक्टरांनीही ही परीक्षा दिली आहे आणि १०,००० गुणांपैकी त्यांनी तब्बल ९३०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत.  

या हॉस्पिटलला भेट देण्याची किंवा डॉक्टरांकडून तपासणी करवून घेणंही अगदी सोपं आहे. रुग्णालयाच्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून डॉक्टरांबरोबरची आपली अपॉइंटमेंट शेड्यूल करायची. तुम्ही व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून डॉक्टरांशी बोलू शकता किंवा या एआय डॉक्टरांची प्रत्यक्षही भेट घेऊ शकता. डॉक्टर तुमची संपूर्ण तपासणी करतील, आजाराची लक्षणं पाहतील, तुमचा मेडिकल इतिहास पाहतील, आवश्यक त्या टेस्ट करायला सांगतील आणि त्याप्रमाणे तुमच्यावर उपचार करतील !

 

Web Title: the world first robotic ai hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.