आदिवासी मुलांच्या जगातली-मनातली अद्भुत 'जिकनी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:45 IST2026-01-17T09:44:50+5:302026-01-17T09:45:06+5:30

आदिवासींच्या भाषेत 'जिकनी' म्हणजे कोडं! या मुलांच्या भावविश्वातल्या गप्पा, गाणी, नाट्यखेळ अशा अनेक गोष्टींतून 'जिकनी' आकाराला आलं, त्याची गोष्ट!

The wonderful Jikani in the world and minds of tribal children | आदिवासी मुलांच्या जगातली-मनातली अद्भुत 'जिकनी'

आदिवासी मुलांच्या जगातली-मनातली अद्भुत 'जिकनी'

ऋचिका खोत 
दिग्दर्शक, 'जिकनी'

नाटक करायला मला लहानपणापासून आवडायचं, पण 'आयुष्यात चोवीस तास नाटक करायचा निर्णय घेऊया का' या विचाराची सुरुवात मात्र पुण्याला ललित कला केंद्रात प्रवेश घेतला तेव्हा झाली. खेड्यातून नाटकाच्या ओढीने शहरात आलेली मुलगी नाटकाबद्दल जो विचार करते तो 'मोठं स्टेज, मोठ्ठ नेपथ्य, मेकअप, कॉस्च्युम' असा काहीसा मर्यादित असतो. 

नाटक म्हणजे हे सगळं आहेच, पण फक्त तेवढंच नाही हा विचार मला ललित कला केंद्राने दिला. 'तुम्ही जिथून आलात, तुमची जी रूट्स आहेत, तुमच्या मातीतल्या लोककला, संस्कृती हेही तुमच्या नाटकाचा भाग असू शकेल' ही दृष्टी मला तिथे मिळाली. 'अप्लाईड थिएटर' किंवा उपयोजित रंगभूमी हा विषय आनंद चाबुकस्वार आम्हाला शिकवायचे. त्यातून नाटक हे 'टूल' वापरून आपण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी कसं आणि काय काम करू शकू हा विचार मला मिळाला. त्यानंतर माझ्या आयुष्यात 'गोष्टरंग' ही फेलोशिप आली.

२०१५-१६ मध्ये मी गीतांजली कुलकर्णी यांचं 'पिया बेहरुपिया' हे नाटक पाहिलं होतं. त्या नाटकातलं तिचं काम बघून मी अक्षरशः भारावले होते. 'गोष्टरंग' मुळे मला गीतांजली ताईच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर बालरंगभूमीचा अभ्यास करायला मिळाला. 

पालघरच्या वाडा तालुक्यात वडवली सोनाळे या गावी अतुल आणि गीतांजली कुलकर्णी यांचं एक टुमदार घर आहे. याच घराच्या खालच्या बाजूला त्यांनी एक नाट्यावकाश तयार केलाय. या अवकाशाचं नाव तारपा! ही इथल्या मुलामुलींसाठी एक हक्काची जागा आहे. पहिल्यांदा मी 'तारपा'मधल्या माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना घेऊन माधुरी पुरंदरेंचं 'वेडा वारा' बसवलं होतं. तेव्हा गीतांजली ताई म्हणाली, 'हे एवढ्यावर थांबता नये'. ते वाक्य माझ्या डोक्यात राहिलं होतं.

नंतर एका वेगळ्या कामासाठी सोनाळ्याला गेले असताना मुलांशी गप्पा सुरू होत्या. 'चला, तुमचं Mumbai Main Page No. 6 Jan 17, 2026 Powered by: erelego.com एखादं गाणं तयार करूया' असं म्हणत आम्ही गाणं बसवलं. या मुलांचं गाण्याचं, तालासुराचं ज्ञान हे खास त्यांच्या मातीतलं आणि अस्सल आहे. आम्ही त्यांचं गाणं बसवलं तेव्हा असं बसल्या बसल्या, आपलं स्वतःचं गाणं, आपल्यासमोर तयार झालं याची त्यांना खूप गंमत वाटली.

ही 'जिकनी'ची सुरुवात होती. आदिवासींच्या भाषेत 'जिकनी' म्हणजे कोडं! या मुलांच्या भावविश्वातल्या गप्पा, चर्चा, गाणी, नाट्यखेळ अशा अनेक गोष्टींतून 'जिकनी' हा प्रयोग आकाराला येत गेला. 

दरम्यान मी 'झी'चा एक 'रिअॅलिटी शो' केला. तिथे झालेल्या कौतुकाकडे तटस्थपणे बघताना माझ्या एक लक्षात आलं ते म्हणजे मी नाटकवालीच आहे. फिल्म, वेबसिरीज, एखादी आर्टफिल्म करायला मला नक्की आवडेल, पण नाटकात होणारा प्रत्यक्ष संवादच मला जास्त भावतो. 'जिकनी' केलं तेव्हा त्यात काम करणारी सगळी मुलं नाटक करणारी नव्हती. त्यामुळे हे नाटक त्यांच्या कलाने पुढे जात राहिलं. माझ्यासारख्या एरवी नाटक करताना अगदी कठोर शिस्तीच्या दिग्दर्शिकेसाठी हे सोपं नव्हतं. पण जमवलं.

एखादी गोष्ट नीट जमेपर्यंत शंभर वेळा करायची वगैरे हे या मुलांना आवडत नसे. त्यांना कंटाळा यायचा. पण त्यांच्या कलाने घेत घेत 'जिकनी' उभं राहिलं. आम्ही या नाटकाच्या पूर्ण प्रवासात त्या 'प्रोसेस'चा विचार जास्त केला. त्यातून काही 'प्रॉडक्ट' मिळणार आहे का, हा विचार तेव्हा आमच्यासाठी दुय्यम होता. 'जिकनी' पूर्ण झाल्यावर आम्ही ते मुलांच्या आई-बाबांनाच दाखवलं. त्यांना ते प्रचंड आवडलं... मग आम्ही ते बाहेर दाखवून पहावं, असा विचार केला आणि 'प्रयोग' सुरू झाले. अनेक वर्षे 'तारपा' मध्ये येऊन या मुलांबरोबर काम करणाऱ्या दिग्गजांनी या कामाचं कौतुक केलं, 'बाहेरच्या जगाचा, त्यातल्या कृत्रिमतेचा स्पर्शही 'जिकनी' ला नाही,' या प्रतिक्रियांनी मुलं खुश झाली आहेत, मी सुखावले आहे. माझं मन समाधानाने काठोकाठ भरलेलं आहे.

ruchirajk95@gmail.com

 मुलाखत, शब्दांकन : भक्ती बिसुरे
 

Web Title : आदिवासी बच्चों की दुनिया की अद्भुत 'जिकनी': एक झलक

Web Summary : निर्देशक रुचिका खोत ने 'जिकनी' पर चर्चा की, जो वाडा, पालघर में आदिवासी बच्चों के साथ बातचीत से जन्मा एक नाटक है। यह उनकी अनूठी कलात्मक अभिव्यक्ति पर जोर देता है, रचनात्मक प्रक्रिया को एक पॉलिश उत्पाद से अधिक महत्व देता है, और उनकी कच्ची प्रतिभा का जश्न मनाता है।

Web Title : The wondrous 'Jikni': A glimpse into tribal children's world.

Web Summary : Director Ruchika Khot discusses 'Jikni', a play born from interactions with tribal children in Wada, Palghar. It emphasizes their unique artistic expression, valuing the creative process over a polished product, and celebrates their raw talent.

टॅग्स :Theatreनाटक