ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 11:24 AM2024-03-09T11:24:22+5:302024-03-09T11:26:24+5:30

वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी ताडोबात उभारलेली ‘आभासी भिंत’ अतिशय उपयोगी ठरत आहे. या उपक्रमाचे प्रेझेंटेशन लवकरच अमेरिकेत केले जाणार आहे.

The 'virtual wall' in Tadoba is preventing the attacks of wild animals! | ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले!

ताडोबातील ‘आभासी भिंत’ रोखतेय वन्यप्राण्यांचे हल्ले!

बंडू सीताराम धोतरे, माजी मानद वन्यजीव रक्षक -

चंद्रपूर हा जसा जंगलाचा जिल्हा, तसा आता वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचा व व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. चंद्रपूरच्या सर्वच वनक्षेत्रांत वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज देशात आणि जगात सर्वाधिक वाघ असणारा चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. सर्वाधिक वाघांसोबत मानव-वन्यप्राणी संघर्ष व मनुष्यहानी, जखमी होण्याचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात वाघ, बिबट, अस्वल व रानडुक्कर या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत ५० पेक्षा अधिक मनुष्यहानीच्या घटना घडतात. अशा घटना टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज ठरते. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील सीतारामपेठ या गावात प्रायोगिक तत्त्वावर कॅमेऱ्याच्या माध्यमाने नुकतीच ‘आभासी भिंत’ उभारण्यात आली आहे. मार्च २०२३मध्ये या उपक्रमाचा प्रारंभ झाला. याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘मनकी बात’ कार्यक्रमात केला होता. चार पोलवर ६ कॅमेरे, सहा एलईडी लाइट, ६ अलार्म देण्यास हूटर याद्वारे ही आभासी भिंत संरक्षणाचे काम करीत आहे. मार्च २०२३ पासून आतापर्यंत २२२ वाघ, ९२ बिबट आणि २४७ अस्वलांची माहिती या भिंतीद्वारे प्राप्त झाली. यानुसार संबंधित गावांमध्ये दवंडी पिटवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या उपक्रमाचे प्रेझेंटेशन लवकरच अमेरिकेत केले जाणार आहे.

या गावाच्या परिसरात नेहमीच एकापेक्षा अधिक वाघांचा वावर असतो. सोबत बिबट, अस्वल, रानडुकरांचासुद्धा वावर असतो. उन्हाळ्यात तर ताडोबा कोअर क्षेत्रातील वन्यप्राणी इरई धरण्याच्या बॅक वाॅटरमध्ये पाणी पिण्यास येतात. त्यात सर्व प्रकारच्या वन्यप्राण्यांचा वावर असतो. यामुळेच या गावाची निवड करण्यात आली. या आभासी भिंतीतून म्हणजेच कॅमेऱ्याच्या समोरून जाताच कोणता वन्यप्राणी गावाजवळ आला याची माहिती लगेच संबंधित वनरक्षक व वनाधिकारी यांना मिळते.

मागील अनेक वर्षांतील घटनांचा आलेख बघता, अशा प्रकारच्या उपाययोजनांची खरी गरज आहे. या आभासी भिंतीच्या कॅमेऱ्यासमोरून ३० मीटर मागे-पुढे कोणताही वन्यप्राणी गेला तरी त्याचा संदेश संबंधितांना जातो. माहिती मिळताच गावात सक्रिय असलेल्या  युवकांची टीम गावकऱ्यांना सूचना देते. सोबतच पोलवरील लाइट, हूटरमधून सायरनचा आवाज यामुळे सतर्कतेचा इशारा दिला जातो. पहाटेच्या वेळी वन्यप्राण्यांचा गावाजवळ वावर आणि त्याच वेळी गावकरी गावाच्या सीमेवर कामासाठी बाहेर पडणे, वनक्षेत्राकडे जाणे धोक्याचे ठरते. त्यामुळे असा सतर्कतेचा इशारा सहायक ठरत आहे.

या प्रणालीमुळे वनविभाग व वन कर्मचारी यांना ई-मेल, मोबाइलवर सतत अलर्ट व फोटो मिळतात, वेळेचीही नोंद होते. ही आभासी भिंत येत्या काळात आणखी काही गावांत सुरू होईल. एका पोलला जवळपास ३ लाखांचा खर्च असून छोटे-मोठे गाव यानुसार २५ ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आभासी भिंत म्हणजे त्या गावाचे संरक्षण कवच आहे. प्रत्येकी ५० ते ६० मीटरवर एक पोल अशी सलग भिंत तयार करण्याची गरज दिसून येते. वन्यप्राण्यांच्या नेहमीच्या मार्गातील पोलवरील कॅमेरे किंवा लाइट बायपास करून जाणारे वन्यप्राणी गावाकडे गेले तर त्याचा कुठलाही संदेश संबंधितांना येणार नाही. मात्र  या पोलला बायपास करून जाणारे वन्यप्राणी लगतच लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेले आहेत, जे आभासी भिंतीच्या दुरून गेले आहेत. 

गावकरी जेव्हा आपल्या गरजांसाठी दाट जंगलात प्रवेश करतो तेव्हा वाघाकडून मारला जातो, मात्र ‘बिबट’सारख्या वन्यप्राण्याकडून जंगलात अशा घटना होत नाहीत, तो आपल्या खाद्यासाठी थेट गावात येतो, म्हणून बिबटकडून कुत्री-डुकरांसारखे प्राणी मारले जातात. अशा सर्वच घटना आभासी भिंतीमुळे आता टळतील. 
ecoprochd@gmail.com

Web Title: The 'virtual wall' in Tadoba is preventing the attacks of wild animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.