एका दिलदार स्नेह्याच्या वियोगाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 07:30 IST2024-12-11T07:30:35+5:302024-12-11T07:30:48+5:30
स्वतः दलित पार्श्वभूमीतून आलेले असल्याने जातिव्यवस्थेचे चटके सुरेंद्र पाल सिंह यांनी अनुभवले होते; पण सामाजिक न्यायाबद्दलचा त्यांचा आग्रह एकारलेला नव्हता.

एका दिलदार स्नेह्याच्या वियोगाची कहाणी
- योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान सदस्य, स्वराज इंडिया
गेल्या महिन्याच्या २३ तारखेला सुरेंद्र पाल सिंह आपल्यातून निघून गेल्याची दुःखद वार्ता समोर आली. ‘एसपी’ म्हणायचो आम्ही त्यांना. ते लेखक, विचारवंत, कार्यकर्ता आणि मित्र तर होतेच; पण मुख्यत: ते एक उत्तम माणूस होते. पंचकुला येथे कुटुंबीयांच्या सानिध्यात त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला.
त्यांचे नाव सर्वसामान्य माणसाला फारसे परिचयाचे नसेलही; पण लेखक, बुद्धिजीवी, सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते आणि पुरोगामी चळवळीशी जोडली गेलेली माणसे अशा सर्वांना त्यांच्या अकाली जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी अत्यंत तीव्रतेने जाणवत आहे. लेखक या नात्याने त्यांनी समाजाला त्याच्याच अंतरंगातील अस्पर्शीत, अज्ञात स्तरांशी जोडले, स्वत:च्या राज्याला देशभरातील इतर लोकांच्या सुख-दु:खाशी आणि देशाला उर्वरित जगाशी जोडले. राजकीय कार्यकर्ता या भूमिकेतून त्यांनी डाव्या विचारसरणीला आंबेडकर, गांधी आणि ‘स्वराज’च्या प्रवाहाशी जोडले. एक माणूस म्हणून युवकांशी खुल्या मनाने संवाद साधत त्यांनी नव्या आणि जुन्या पिढीला जोडले. हरियाणाच्या सार्वजनिक जीवनात असा माणूस शोधूनही सापडणे कठीण.
स्वतः दलित पार्श्वभूमीतून आलेले असल्याने जातिव्यवस्थेचे चटके एसपींनी त्यांनी नुसते पाहिलेले नव्हते, तर प्रत्यक्ष अनुभवलेही होते; परंतु त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कणभरही सल किंवा कटुता नव्हती. सामाजिक न्यायाबद्दलचा त्यांचा आग्रह एकारलेला नव्हता. जगभरातील वंचित आणि पीडितांच्या वेदनांशी त्यांनी आपल्या वेदनांची सांगड घातली. शेतकरी, कामकरी, स्त्रिया, आदिवासी आणि गरिबांच्या वेदनांचे ते भागीदार झाले. केवळ भारतातीलच नव्हे, तर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील आदिम रहिवासी आणि स्थलांतरितांच्या समस्या आणि वेदनांचीही त्यांनी कृतिशील नोंद घेतली.
अण्णा आंदोलनातील सहभागानंतर एसपींनी आम आदमी पक्षाचे काम करायला सुरुवात केली; परंतु नेतेगिरी किंवा वैयक्तिक राजकीय कारकिर्दीत त्यांना मुळीच रस नव्हता. आम आदमी पक्षात फूट पडली तेव्हा आपले तात्त्विक मतभेद त्यांनी बेधडकपणे व्यक्त केले. स्वराज अभियानाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. स्वराज इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शेतकरी आंदोलनात एसपी आणि त्यांच्या पत्नी गीता हे दोघेही ऐन कडाक्याच्या थंडीत कित्येक महिने शेतकऱ्यांबरोबर तंबूत राहिले. भारत जोडो यात्रेतही एसपी बहुतांश काळ पदयात्रेत सामील होते. २०१६ मध्ये संपूर्ण हरयाणा आरक्षण समर्थन आणि विरोधाच्या आगीत होरपळून निघत होता. त्या काळात राज्यात न्याय, सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी एसपींच्या पुढाकाराने सद्भावना मंच, हरयाणा नावाच्या एका मंडळाची स्थापन करण्यात आली. या मंडळाने राज्यभरात घडलेल्या हिंसक घटनांची निष्पक्षपाती चौकशी केली, दोन्ही बाजूंच्या पीडित कुटुंबांच्या मुलाखती घेतल्या आणि जनतेसमोर संपूर्ण सत्य मांडणारा एक अहवाल सादर केला. जाती-जातींमध्ये दुभंगलेल्या समाजातील द्वेषभावना संपुष्टात आणण्यासाठी एसपींच्या पुढाकाराने आकारास आलेला हा एक ऐतिहासिक उपक्रम होता; त्यांनी हरयाणाचा समाज आणि इतिहास या विषयांवर स्वतः खूप लिहिले आणि इतरांकडून लिहूनही घेतले. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तिका उल्लेखनीय आहे. अशा छान माणसाची साथ मला मिळाली हे माझे सौभाग्य. आम आदमी पक्ष, स्वराज अभियान, स्वराज इंडियापासून ते भारत जोडो अभियानापर्यंत त्यांनी मला सोबत केली. स्वतःसाठी कोणतीही इच्छा कधी न बाळगता, लोकांचे लक्ष स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न कधी न करता प्रत्येक संघर्षात ते माझ्याबरोबर राहिले. हरयाणातील सार्वजनिक जीवनात पुरोगामित्व, लोकशाही व सामाजिक न्यायाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाला एसपींचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्त्व याची उणीव प्रदीर्घकाळ जाणवत राहील.
yyopinion@gmail.com