शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विशेष लेख: शेतकरी नवरा नको म्हणून तरुणीने संपवलेल्या जीवनाची कहाणी

By सचिन जवळकोटे | Updated: April 2, 2025 09:27 IST

Farmer News: जिथं बागायतदार वडील रोजच्या खुरपण्यासाठी मजुरांना आठ-दहा हजार रुपये खर्च करतो, तिथंच मुलगा दरमहा वीस-पंचवीस हजारांची नोकरी हुडकत पुण्यात भाडेकरू बनतो, हा किती विचित्र विरोधाभास? या समस्येवर अचूक उत्तर म्हणजे ‘शेतकऱ्याचं ब्रँडिंग’ झालं पाहिजे. शेतीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढली पाहिजे..

- सचिन जवळकोटे(कार्यकारी संपादक,  लोकमत, सोलापूर) 

तिचे वडील इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक. सासरे शेतकरी. पती साखर कारखान्यात कामाला. वर्षभरापूर्वी लग्न झालं. गेल्या आठवड्यात माहेरी आली. आईसोबत बराच काळ गंभीर चर्चा झाली. दोघीही अस्वस्थ आहेत, हे घरातल्या कर्त्या पुरुषाच्या ध्यानातच आलं नाही. मुलीचे वडील शाळेत गेल्यानंतर दोघींचे मृतदेह एकाच दोरीला लटकलेले आजूबाजूच्यांना दिसले. सारेच हादरले. पोलिस घटनास्थळी धावले. चिठ्ठी सापडली. ‘मला खूप शिकायचं होतं, मात्र शेतकऱ्याच्या पोरासोबत माझं लग्न लावून दिलं गेलं,’ हे नैराश्य पोरीने चिठ्ठीत तळमळून लिहिलं होतं.

सारा गाव हळहळला. ही घटना तुळजापुरातली. साडेतीन शक्तिपीठांपैकी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रावरची. जिथं स्त्रीशक्तीचा जागर मोठ्या भक्तिभावानं केला जातो, तिथंच दोघींनी एकाच दोरीला गळफास घेऊन जीवनाची अखेर केली. पंचनाम्यानंतर दोघींचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. तिथं एकाचवेळी दोघींवर अग्निसंस्कार केले गेले. त्यातही मनाला चटका लावणारा योगायोग म्हणजे ज्या रानावनात राहायचं नाही म्हणून लेकीनं जीव दिला, त्याच शेतात दोघींवर अंत्यसंस्कार केले गेले.

तिच्या चिठ्ठीत दोन मुद्दे होते. पहिला- तिला खूप शिकायचं होतं; खरं तर तिचं शिक्षण एमए-बीएड झालेलं. तिला शिक्षक व्हायचं होतं; परंतु कदाचित तिला सध्याच्या शिक्षण क्षेत्रातला नवा पायंडा ठाऊक नसावा. ‘शिक्षणसेवक’ नावाखाली डबल ग्रॅज्युएटवालेही दरमहा केवळ तीन-साडेतीन हजारांवर खासगी शिक्षण संस्थेत राबताहेत. दहा-पंधरा वर्षे काम करूनही पाचशे-हजारांपेक्षा जास्त पगारवाढ कुणालाच मिळत नाही. बहुतांश जण वयाच्या पस्तीशी-चाळिशीनंतर ही बेभरवशाची नोकरी सोडून स्वत:चा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करतात. कुणी यार्डात मुनीमची चाकरी पत्करतो, कुणी थेट चौकात चायनीज गाडा टाकतो, एवढाच काय तो फरक. 

तिच्या चिठ्ठीतला दुसरा मुद्दा- शेतकऱ्याच्या पोराचा. गावालगतच्या शेतातच सासऱ्याची वस्ती. या ठिकाणी तिचं कुटुंब राहतं. तुळजापूरसारख्या मोठ्या गावातून थेट शिवारातल्या ओसाड वस्तीवर राहण्याची कदाचित तिची मानसिकता नसावी. नवरा मुलगा लगतच्या साखर कारखान्यात काम करत असला तरीही कुटुंबाची ओळख शेतकरी म्हणूनच. तशात तिचे वडील मुख्याध्यापक. भाऊ रशियात डॉक्टरकी शिकायला गेलेला. कदाचित ही तुलना तिचं भावविश्व उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरली असेल. मात्र, सासूरवाडीत सहा एकर शेती. उजनी धरणालगतचा हा सुपीक पट्टा. जणू सोन्याचा तुकडा. 

या भागातल्या कैक शेतकऱ्यांनी जमिनीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. गुंठ्यावर लाखो रुपये कमवण्याचं आधुनिक पीकतंत्र शोधून काढलं आहे. तोच निकष लावला तर तीन हजारवाल्या नोकरदारापेक्षा लखपती शेतकरी कधीही श्रीमंतच. मात्र आता हजारो मुलींच्या दृष्टीनं लाइफस्टाइलचे संदर्भ बदलले आहेत. स्वमालकीच्या चाळीस हजार स्क्वेअर फुटांच्या एकरामधल्या शेतकऱ्यापेक्षा पुण्यात पाचशे स्क्वेअर फुटांच्या भाड्याच्या फ्लॅटमधला ‘जॉबकरी’ भारी वाटतो, हा काळाचाच महिमा म्हटला पाहिजे!

यामुळंच की काय गावाकडं भरगच्च शेतकरी असूनही केवळ लग्नासाठी पोरगी मिळावी म्हणून शहरात खोटी-खोटी नोकरी करणाऱ्या तरुणांची नवी पिढीच तयार होऊ लागली आहे. लग्नानंतर एखादं मूलबाळ झालं की पुन्हा पत्नीला घेऊन गावाकडं जाण्याची प्रथा पडू लागलीय. मात्र, आपला विश्वासघात झाला या भावनेतून घटस्फोट घेणाऱ्या तरुणींचं प्रमाणही प्रचंड वाढत चाललंय. अलीकडच्या काळात कौटुंबिक न्यायालयातली किचकट प्रकरणं हेच दर्शवतात. ज्यांना गावी उत्पन्नाचा स्रोत नाही, त्यांनी नाइलाजानं मोठ्या शहरात जाऊन नोकरी हुडकली तर एकवेळ ठीक म्हणायचं, मात्र जिथं बागायतदार वडील रोजच्या खुरपण्यासाठी मजुरांना आठ-दहा हजार रुपये खर्च करतो, तिथंच मुलगा दरमहा वीस-पंचवीस हजारांची नोकरी हुडकत पुण्यात भाडेकरू बनतो, हा किती विचित्र विरोधाभास? या समस्येवर अचूक उत्तर म्हणजे ‘शेतकऱ्याचं ब्रँडिंग’ झालं पाहिजे. शेतीची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढली पाहिजे..(sachin.javalkote@lokmat.com) 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीmarriageलग्नMaharashtraमहाराष्ट्र