अग्रलेख: पुन्हा पुन्हा समुद्र मला बोलावतो आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 07:57 IST2025-06-15T07:55:14+5:302025-06-15T07:57:18+5:30

‘पीएडीआय’ ही जगभरात मान्यताप्राप्त संस्था आहे. ती तुम्हाला सुरक्षित आणि आत्मविश्वासाने स्कूबा डायव्हिंग शिकवते. महाराष्ट्रात समुद्र डायव्हिंगसाठी योग्य आहे, पण विश्वासार्ह डायव्हिंग स्कूल्स फारच कमी आहेत. भारतात हा प्रकार हळूहळू लोकप्रिय होत आहे. पाँडिचेरी हे सध्या सर्वात प्रसिद्ध डायव्हिंग ठिकाणांपैकी एक मानले जाते. आतापर्यंत ६० ते ६५ डायव्हिंग करणाऱ्या डॉ. नम्रता कदम यांनी एका वेगळ्या अनुभवाची करून दिलेली ओळख.

The sea is calling me again and again... | अग्रलेख: पुन्हा पुन्हा समुद्र मला बोलावतो आहे...

अग्रलेख: पुन्हा पुन्हा समुद्र मला बोलावतो आहे...

स्कूबा डायव्हिंग हा प्रकार आपल्याकडे फारसा प्रचलित नाही. हा प्रकार शिकवणाऱ्या स्कूल्स ही फारच कमी आहेत. थोडी फार स्कूबा डायव्हिंग तारकर्लीजवळ केली जाते. मात्र ती देखील सुरक्षित पाण्यात. जगभरात मात्र हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. समुद्राच्या पोटात  जाऊन बघण्याचा अनुभव अलौकिक असतो हेच खरे. 

फी फी बेटावरील माझी पहिली लाइव्ह अशीच अविस्मरणीय ठरली. मी आणि माझे पती कौशल गोकारणकर त्यासाठी फारसे तयार नव्हतो. खरेतर आम्ही थोडे घाबरलेलो होतो. डाइव्ह करण्यासाठी घालावा लागणार सूट आणि आतून धडधडणारे हृदय... अंगावर चढवलेली वेगवेगळी उपकरणे आणि त्याचे ओझे अनोळखी वाटत होते. पाण्याखाली श्वास घेण्याची कल्पनाच मला भीतीदायक वाटत होती. बोटीच्या कडेला बसले असताना मनात शंभर प्रश्न होते... थोडी घाबरलेली होते... काही चुकले तर..? ही भीती मनात दाटून येण्याच्या आतच पाण्यात उडी मारली...

पाण्यात उतरल्याबरोबर, पहिले काही श्वास घेताच, सर्व काही बदलून गेले. पाण्यावरचे जग हरवून गेले... आणि आम्ही जणू एका वेगळ्याच जगात प्रवेश केला...  शांत, स्वप्नवत, हलके हलके वाटणारा तो अनुभव... पाणी रेशमासारखे आम्हाला वेढून टाकत होते. पाण्याखालचा रंगीबेरंगी प्रवाळांनी सजलेला सागरतळ एखाद्या जिवंत चित्रासारखा वाटत होता. माशांचे थवे आमच्या आजूबाजूने मुक्तपणे फिरत होते, वेळ जणू थांबून गेली होती. तिची जागा प्रचंड आश्चर्याने घेतली होती. त्या क्षणाला मी पृथ्वीवरची प्रवासी नव्हते तर एका गोड शांत आणि अतिशय सुंदर जगाच्या शोधात मी त्या पाण्यात फिरत होते.

ती पहिली डाइव्ह मला समुद्राचे आतले जग दाखवून गेली असे नाही, तर माझ्या मनातील एक वेगळाच कोपरा तिने उघडून दाखवला. निसर्गाच्या चमत्कारांनी थक्क करणारा तो अनुभव मला आणखी खोल पाण्यात जाण्याचे धाडस निर्माण करून गेला. 
गेल्या दहा वर्षांपासून मी आणि माझे पती डायव्हिंग करत आहोत. या डाइव्हने निर्माण केलेले प्रेम मला वेगळ्या जगात घेऊन गेले आहे.  आम्ही प्रत्येक महिन्याला किंवा सर्टिफिकेटसाठी धावपळ करत नाही. आम्ही डायव्ह करतो तेव्हा वेळ, नियोजन, आणि समुद्राची हाक यांचा संगम होतो. प्रत्येक वेळेस पाण्यात उतरल्यावर वेगळीच जादू परत परत अनुभवायला मिळते. यासाठीचा कोर्स आम्ही दोघे हळूहळू करत आहोत. प्रत्येक स्टेप, प्रत्येक श्वास आणि येणारा अनुभव दरवेळी काहीतरी शिकवून जातो. 

विशिष्ट संख्येत तुम्ही डायव्हिंग केले तर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळते. तुम्ही सर्टिफाइड स्कूबा डायव्हिंग करणारे म्हणून ओळखले जाता. आतापर्यंत मी ६० ते ६५ वेळा समुद्रात जाऊन आले. ते ही २३ मीटर खोल... दरवेळी समुद्राच्या आत उत्कटतेचा आणि त्याच्याशी आपले नाते जोडल्याचा एक वेगळाच अनुभव येतो. यासाठी म्हणून मी थायलंड, मालदीव, ग्रीस, इटली, लक्षद्वीप, मलेशिया, श्रीलंका, बाली, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि आपल्या कोकण किनाऱ्यांपर्यंतच्या अतिशय सुंदर समुद्रात आतपर्यंत डायव्ह केले आहेत. प्रत्येक समुद्र, तिथले बेट, आतल्या साईट्स तुम्हाला विलक्षण अनुभव देत असतात. यातील कुठलाही अनुभव जुन्या अनुभवाशी मिळताजुळता नसतो.

तुम्ही एकाच ठिकाणी, एकाच प्रवाळावर, एकाच खोलीवर पुन्हा जाऊ शकता. पण, समुद्र कधीही आपले एकच रूप दाखवत नाही. कधी रंगीबेरंगी माशांचा खेळ, कधी अचानक दिसलेली कासवे, किंवा मंटा रे, कधी केवळ सागराच्या लयीची शांत झुळूक. समुद्रातले जग विशाल, जंगली आश्चर्यांनी भरलेले आहे. ते वैविध्य तुम्हाला विनम्र बनवते. येणाऱ्या लाटेनुसार ऋतूनुसार समुद्राच्या आत येणाऱ्या प्रकाशनानुसार तुम्हाला प्रत्येक लाइव्ह एक सजीव आणि वेगळाच अनुभव देते. समुद्राच्या आत श्वास घेत असताना या जगाचे आपण पाहुणे आहोत, याची जाणीवही सतत होत राहते. मी आजपर्यंत समुद्रातले अनेक कोपरे पाहिले असतील, तरी अजूनही खूप काही शोधायचे आहे. समुद्र मला पुन:पुन्हा बोलावतो आहे... मी नेहमीच त्याच्या हाकेला ओ देत आले आहे.

Web Title: The sea is calling me again and again...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.