ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 08:25 IST2025-09-27T08:24:42+5:302025-09-27T08:25:08+5:30
अमेरिकेतील लोकप्रिय ‘जिमी किमेल शो’ बंद पाडला गेला आणि पुन्हा सुरूही झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा उंचावणाऱ्या लेटनाइट शोच्या परंपरेबद्दल !

ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...
भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार
अमेरिकेतील लोकप्रिय ‘जिमी किमेल शो’ अचानक बंद पडला आणि चार दिवसांनी पुन्हा सुरू झाला. एका वाक्यात सांगता येणाऱ्या या घटनेने अमेरिकेत एक मोठे वादळ उठले आणि ते लवकर शमेल, अशी काही चिन्हे नाहीत. या वादळाच्या केंद्रस्थानी आहेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (ज्यांचे वर्णन माध्यमे ‘थिन स्कीन्ड’ किंवा ज्याला गुदगुल्यादेखील खंजिरासारख्या वाटतात असे करतात) आणि अमेरिकेतील खुल्या अभिव्यक्तीचे प्रवक्ते मानले जाणारे लेटनाइट शो. अमेरिकेत या लेटनाइट शोजची मोठी परंपरा आहे. सुरुवातीला आठ-दहा मिनिटे सूत्रधार प्रेक्षकांशी हितगूज करतो, त्यानंतर एक दोन पाहुण्यांच्या मुलाखती घेतो आणि शेवटी गाण्याचा कार्यक्रम सादर करतो.
भारतातही अशा धर्तीवर कार्यक्रम आहेत, पण त्यांचे स्वरूप गप्पाटप्पा आणि विनोद असेच आहे. अमेरिकन लेटनाइट शोजच्या तलवारीची धार भारतात एक क्षणही टिकणार नाही, इतके ते सरकार, राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटीजवर बोचरी टीका करतात. ही लेटनाइट शोजची खासियत. या मोकळेपणाला अमेरिकन जनता ‘अमेरिकन’ असण्याची आवश्यकता मानते. हा देश हे अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य मोठ्या अभिमानाने मिरवतो. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षस्थानी आल्यापासून, विशेषतः दुसऱ्यांदा निवडून आल्यावर त्यांनी वेळोवेळी दाखवलेल्या बडग्यामुळे तिथले व्यक्तिस्वातंत्र्य जाऊन रशियातल्या ओलिगार्कसारखी ट्रम्पना खुश करून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या मोजक्या धनदांडग्यांची सत्ता येईल, अशी भीती अमेरिकेत निर्माण झाली आहे.
या मार्गावर अडथळे आहेत लेटनाइट शोज. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून या शोजच्या सूत्रधारांनी रोज रात्री ट्रम्पवर कडाडून टीका सुरू केली. ट्रम्प यांनीही मग हे शोज संपवण्याचा विडा उचलला. रोज इथले अँकर ट्रम्पच्या धोरणांवर टीका करणार आणि ट्रम्प ट्रूथ सोशलवर या अँकर्सना शिव्या देणार, हे जणू ठरून गेल्यासारखेच झाले. सीबीएस नेटवर्कवर गेली दहा वर्षे चालू असलेला स्टीवन कोलबेयर शो बंद करण्याची नोटीस सीबीएसने कोलबेयरला दिली. त्यांच्यामधील करार नव्याने होणार नाही आणि कोलबेयर शो काही महिन्यांत बंद पडेल. ही घोषणा होताच ट्रम्प यांनी सीबीएसचे अभिनंदन केले आणि त्याचवेळी एबीसीने सीबीएसपासून धडा घेऊन जिमी किमेल शो बंद करावा, अशी धमकीवजा सूचनाही केली. त्या धमकीनंतर गेल्या आठवड्यात एबीसीची मालकी असलेल्या डिस्ने कंपनीने अचानक जिमी किमेल शो स्थगित केला.
चार्ली कर्क या उजव्या विचारसरणीच्या नेत्याच्या हत्येबाबत बोलताना जिमी पातळी सोडून बोलला असे कारण त्याला काढण्यामागे आहे, असे सांगण्यात आले. या घोषणेच्या आधी अमेरिकेच्या टेलिव्हिजन नियामक मंडळाचे (फेडरेशन ऑफ कम्युनिकेशन कमिशन किंवा एफसीसी) अध्यक्ष ब्रेंडन कार यांनी एका पॉडकास्टमध्ये जिमी किमेलवर टीका केली आणि जर डिस्नेने त्याच्यावर काही कारवाई केली नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी उघड धमकी दिली होती. या कारवाईने ट्रम्प महाशय खुश झाले आणि आता एनबीसीने त्यांचा ‘जिमी फॅलन शो’ही बंद करावा, असे धमकावले. सत्ताधीश फक्त धमकी देत नसतात. सत्तेच्या नाड्यांबरोबरच पैशांच्या नाड्याही त्यांच्या हातात असतात, त्यामुळे ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडून कोलबेयर आणि किमेल यांचा आवाज बंद केला गेला, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
किमेल शो सुरू व्हावा म्हणून किमेल, त्याचे वकील आणि डिस्ने आणि त्यांचे वकील यांत जोरदार वाटाघाटी झाल्या. त्यांत काय नेमके झाले, हे अजून स्पष्ट झाले नाही, पण डिस्ने कंपनीने या शोचे निलंबन मागे घेतले. शो थांबविण्याची घोषणा झाल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ उसळेल याची कल्पना डिस्नेला नसावी. किमेल शो पुन्हा सुरू झाला, तरी अनेक राज्यांत प्रसारित झाला नाही, कारण नेक्स्टार आणि सिनक्लेयरने ‘आम्ही तो दाखवणार नाही’ असे जाहीर केले. गंमत म्हणजे असे असले, तरी किमेल परत आला आणि त्याचा पहिला एपिसोड रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला. टीव्ही आणि यूट्यूबवर त्याने रेटिंगचे सगळे विक्रम मोडले.
आपल्या परतीच्या एपिसोडमध्ये किमेलने ‘मला चार्ली कर्कच्या हत्येचे गांभीर्य माहीत आहे आणि माझा सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध आहे’, असे सांगत ट्रम्प यांच्यावर पुन्हा जहरी टीका केली. त्याच्या प्रतिस्पर्धी शोजच्या सर्व सूत्रधारांनी, स्टिवन कोलबेयर, जिम फॅलन, सेथ मायर्स, जॉन स्टुवर्ट, जॉन ऑलिव्हर यांनी आपल्या शोजमधून किमेलला उघड समर्थन दिले. त्याचे पुन्हा स्वागतही केले. इतकेच काय तर आपला शो बंद होईल की काय, या चिंतेत न पडता संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाचा खरपूस समाचारही घेतला. ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच आहे आणि या संदेशात आहे एक प्रश्न : तुम्हाला राजाचा भाट बनायचे आहे की, राजदरबारातला विदूषक? नागड्या राजाने (न) घातलेल्या कपड्यांचे कौतुक करायचे की, त्याने कपडे घातले नाहीत ही जाणीव राजाला करून द्यायची आहे?
bhalwankarb@gmail.com