राज ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ आणि एकता सावंत
By अतुल कुलकर्णी | Updated: January 26, 2026 14:22 IST2026-01-26T14:22:15+5:302026-01-26T14:22:57+5:30
Raj Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धवसेनेने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज यांना नेमके काय म्हणायचे होते यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही विषयांवर राज ठाकरे यांनी फार स्पष्टपणे बोलणे टाळले. मात्र, काही विषयांचा अशा पद्धतीने उल्लेख केला की उपस्थितांना योग्य तो संदेशही गेला.

राज ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ आणि एकता सावंत
- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धवसेनेने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज यांना नेमके काय म्हणायचे होते यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही विषयांवर राज ठाकरे यांनी फार स्पष्टपणे बोलणे टाळले. मात्र, काही विषयांचा अशा पद्धतीने उल्लेख केला की उपस्थितांना योग्य तो संदेशही गेला. तो नेमका काय होता? जे आहे ते स्वच्छ आणि स्पष्ट बोलणे हा राज यांचा स्वभाव आहे, जो अनेकदा त्यांना अडचणीचा ठरला आहे. चांगल्या गोष्टीला चांगले म्हणायचे नाही का? असा सवाल करत त्यांनी कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. कधी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. तर कधी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मात्र, यामुळे राज सतत भूमिका बदलतात, असे आक्षेप चहूबाजूंनी येत गेले. टोलचा प्रश्न असो किंवा मराठी पाट्यांचा, त्यावरूनही राज टीकेचे धनी झाले होते. टोल आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने टोलमाफी केली; पण त्याचे श्रेय राज ठाकरे यांना मिळणार नाही, अशी व्यवस्था केली. त्यामुळे टोलमाफी सरकारने केली, राज यांच्या आंदोलनामुळे नाही असेच पर्सेप्शन तयार झाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज गेले. तिथे उद्धव त्यांचे स्वागत करत असताना ते नाकारून राज यांनीच उद्धव यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी केलेल्या भाषणातला एक महत्त्वाचा मुद्दा त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करून गेला. 'आपण शिवसेनेतून जेव्हा बाहेर पडलो त्यावेळी आपल्या वेदना वेगळ्या होत्या. आपल्यासाठी ते केवळ पक्ष सोडणे नव्हते, तर ते घर सोडणेही होते. या सगळ्याला २० वर्षांचा काळ उलटून गेला आहे. या काळात मला अनेक गोष्टी उमजल्या. उद्धवना सुद्धा उमजल्या असतील. द्या सोडून ते आता सगळं... कुठे आयुष्यभर कुंठात बसायचे,' असे ते म्हणाले. राज यांचे भाषण ऐकताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे भावूक झाल्याचे माध्यमांनी दाखवले. या घटनाक्रमाचा अर्थ एकच आहे. उद्धव आणि राज महापालिकेच्या निवडणुकीपुरते एकत्र आले होते, ते पुन्हा वेगळे होतील, अशा चर्चांना राज यांनी त्या भाषणातून पूर्णविराम दिला आहे. दोघे एकत्र राहणार, तर दोघांची राजकीय भूमिका काय असेल, यावर आता चर्चा सुरू होतील. महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी इंजिनमध्ये निखारे पेटवले. त्यातून मशाल पेटली, अशी प्रतिक्रिया सुरू झाली. राज यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. राज यांच्या बाजूने जागा वाटपासाठी जे कोणी चर्चेला गेले होते त्यांचे मुंबईचे आकलन कमी पडले. जागावाटपात जे राजकीय शहाणपण दाखवायला हवे होते ते दाखवले गेले नाही. आता अशा बोलण्याला अर्थ उरत नाही.
'आज निष्ठा सहज विकल्या जात आहेत. तत्त्वे फेकून देण्यात येत आहेत. राजकारण व्यवहारी झाले आहे. काही वर्षांपूर्वी गुलामांचा बाजार भरत असे. आता राजकारणात माणसांचा लिलाव सुरू आहे,' असे सांगताना राज यांनी त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक कल्याण-डोंबिवलीमध्ये, त्यांच्या डोळ्यांदेखत, त्यांच्या विश्वासू नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिंदेंसेनेत नेले. त्याचा रागही होता. त्यामुळेच कल्याण-डोंबिवलीसह अन्य ठिकाणी होत असलेले प्रकार पाहून आपण व्यथित झालो आहोत. या सगळ्याची आपल्याला शिसारी येत आहे, असे सांगत अप्रत्यक्षपणे राज यांनी कल्याण-डोंबिवली प्रकरणावर जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे.
एवढेच मर्यादित भाषण असले तरी पडद्याआड निश्चितपणे काहीतरी सुरू आहे. दोन्ही ठाकरेंच्या दोन सभा सोडल्या तर फारसा प्रचार झाला नाही. उमेदवारांना म्हणावे तेवढे 'बळ' दिले गेले नाही. तरीही नवे कोरे ६० नगरसेवक उद्धवसेनेकडून निवडून आले. त्यामुळे जे ठाकरेंना सोडून गेले त्यांच्याही मनात चलबिचल आहे. ठाकरे ब्रँड आहे की नाही, याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे; पण दोघांच्या बोलण्यातून काहीतरी घडत आहे, हे नक्की.
डोंबिवलीत एकता सावंत या तरुण मराठी मुलीचा स्टॉल महापालिकेने हटवला. त्यावरून राजकारण सुरू झाले. मात्र, आपल्याकडून दररोज ३०० रुपये हप्ता घेतला जातो, हे एकताने केलेले विधान जास्त गंभीर आहे. हप्ते घेऊनही आपला स्टॉल हटवण्यात आला. स्टॉलवर गॅस सिलिंडर आहे, म्हणून आपला स्टॉल हटवला; पण आजूबाजूच्या प्रत्येक स्टॉलवर गॅस सिलिंडर वापरले जाते मग ते का हलवले नाहीत, असा एकताचा सवाल आहे. मनसेने त्याविषयी आक्रमक भूमिका घेतली. त्यातून राजकारण होत राहील. मात्र एका स्टॉलवरून रोज तीनशे रुपये हप्ता घेणाऱ्या शासकीय यंत्रणा कोणत्या आहेत? हे शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. परप्रांतीय वाटेल तिथे, फूटपाथवर, उड्डाणपुलाच्या खाली टपऱ्या टाकतात. भेळ पाणीपुरीच्या गाड्या लावतात. त्यांना संरक्षण मिळते आणि मराठी तरुणांना मात्र हाकलले जाते. त्यापेक्षा सगळ्यांना एकच न्याय लावावा. फेरीवाला धोरण आखावे, असे कधीही राजकारण्यांना वाटलेले नाही. कारण लोकांमध्ये जेवढे वाद होतील तेवढी राजकारण्यांची किंमत वाढेल. लोक गुण्यागोविंदाने नांदू लागले तर यांना कोण विचारणार..? तुम्हाला पटते का बघा...