आजी-आईच्या तिजोरीतले सोने आता फक्त ‘वस्तू’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:11 IST2025-10-14T14:09:37+5:302025-10-14T14:11:11+5:30
कोणे एकेकाळी भारतात सोने ही सुरक्षा, सामाजिक स्थान दाखवणारी ‘पिढीजात बांधिलकी’ होती, आता ती निव्वळ खरेदी-विक्रीची एक वस्तू बनून गेली आहे.

आजी-आईच्या तिजोरीतले सोने आता फक्त ‘वस्तू’!
दहा ग्रॅम सोने एक लाख दहा हजारांवर ! वृत्तपत्रीय मथळ्यातील हा आकडा म्हणजे केवळ बाजारातील उलाढालीची आकडेवारी नाही. देशातील लक्षावधी मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांच्या स्वप्नांवरचा आणि सुरक्षिततेवरचा हा घाला आहे. लग्नकार्ये, सणवार, कोपऱ्यातली छोटी लोखंडी तिजोरी किंवा अडीनडीला लागतील म्हणून लपवून ठेवलेले चार पैसे यांच्यावरील तो आघात आहे. एकेकाळी सवय, आवड, सुरक्षा आणि सामाजिक स्थान दर्शवणारी पिढीजात बांधिलकी म्हणून सोन्याकडे पाहिले जाई. ते आता निव्वळ एक खरेदी-विक्रीची वस्तू बनले आहे. त्याच्या आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे काहीजण गब्बर झालेत खरे; पण अनेकांच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या उडाल्या, हेही खरेच ! घरोघरी लग्ने, सणवार, पारंपरिक विधी यासाठी नित्यनेमाने, शुभमुहूर्तावर, टप्प्याटप्प्याने सोने खरेदी केली जाई. ती परवडणे आता अशक्य बनले आहे.
त्याच वेळी शेअरबाजारात आणि जागतिक बँकांच्या तिजोरीत सोने हे आर्थिक शक्तिस्थान बनले आहे. एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स आणि सरकारी कर्जरोखे वगैरेंमुळे सोन्याला आता तरल व्यापारी स्वरूप प्राप्त झाले आहे. गोल्ड इटीएफ व्यवस्थापित मालमत्ता भारतात प्रचंड प्रमाणात वाढून ६० ते ६५ हजार कोटी रुपये इतकी म्हणजे ४०-५० टन सोन्याच्या मूल्याइतकी झाली आहे. सुवर्णरोखे आणि डिजिटल पेपर गोल्ड यासारखे मंच मिळाल्यामुळे गुंतवणूकदार वर्ग वाढला आहे.
वस्तूरूप वारशाचे निव्वळ मालमत्तेत झालेले हे रूपांतर तडकाफडकी किंवा योगायोगाने झालेले नाही. सोन्याची किंमत आणि आधुनिक पोर्टफोलिओमधील त्याची भूमिका ठरवण्यासाठी देशी आणि जागतिक शक्ती दहाएक वर्षे एकत्रितपणे कार्यरत होत्या. त्याचे हे फलित आहे. रुपयाच्या किमतीत होणारी घट हे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत इतकी वाढण्याचे दुसरे कारण. सोन्या-चांदीचा बहुतेक सारा व्यापार डॉलरमध्ये होत असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर घसरताक्षणीच किरकोळ बाजारात सोन्याचा दर वधारतो. काही वर्षांपूर्वी एका डॉलरला ६० ते ७० रुपये पडत. ही किंमत आता ८७च्या पुढे गेलीय. आयात कर धोरणातील अनिश्चितता, वेळोवेळी होणारे नियामक बदल, करवाढ किंवा जीएसटी नियमात होणाऱ्या बदलांची भीती यामुळेही लोक आपली खरेदी अगोदरच करणे किंवा सोन्याचा साठा करणे अशा किंमतवाढीला चालना देणाऱ्या कृती करायला प्रवृत्त होतात. अनेक देशांनी गेल्या दशकात सोन्याचा मोठा राखीव साठा करून ठेवला आहे. भूराजकीय तणावांपासून संरक्षण मिळवणे आणि आपला संचय निव्वळ डॉलरकेंद्रित न ठेवता, तो विविधांगी करणे हे त्यामागचे हेतू आहेत.
पुरवठ्याचे म्हणाल तर सोन्याचा साठा आता संपत आलाय हा युक्तिवाद खरा नाही. नव्या खाणी शोधणे, परवानग्या मिळवणे आणि त्या विकसित करणे यात अनेक वर्षांचा काळ जातो. त्यामुळे सर्वसाधारण परिस्थितीत दरवर्षी सोन्याचे उत्पादन एक दोन टक्क्यांनी हळूहळू वाढत असते. मात्र आकड्यांच्या हिशेबाने सोन्याची जागतिक मागणी आणि पुरवठा यामागील अंतर फारसे वाढलेले नाही.
सोने हे अनिश्चित वित्तीय परिस्थितीत स्थैर्य देणारे साधन आहे की त्याचे रूपांतर आता त्याची सामाजिक भूमिका पुसून टाकणाऱ्या सट्टेबाजीच्या क्लृप्त्यांमध्ये होत आहे? - दोन्हीत तथ्य आहे. शेअर बाजारातील तणावाच्या काळात किंवा चलन फुगवट्याचे भय जाणवू लागते तेव्हा सोनेच गुंतवणुकीचे तारणहार बनले आहे आणि गेली अनेक वर्षे त्याने भरघोस परतावा दिलेला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणारे अनेकजण मालामाल झाले. परंतु भावी सुरक्षिततेचे स्वप्न बाळगून छोट्या छोट्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर भर देणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी बनते. सोन्याच्या किमती आता स्थानिक बाजारस्थितीनुसार निश्चित न होता, जागतिक प्रवाहानुसार ठरत आहेत.
लग्नामुंजीसाठी, सणावारासाठी खरेदी करावयाच्या दागिन्यांची किंमत आता हजारो मैलावरचे भांडवली प्रवाह आणि व्यापारी व्यासपीठावरील सूक्ष्म निर्णय निश्चित करतात. थोडक्यात, सोने आपल्याला देत आलेला समाजसांस्कृतिक आधार बाजाराच्या तर्कशास्त्राने आता काही प्रमाणात खिळखिळा केलेला आहे. एखादे तरुण जोडपे विवाहासाठी कुटुंबाच्या इच्छेनुसार सोने घेऊच शकत नाही किंवा आपला मूल्यसंग्रह आता मुलाबाळांच्या आवाक्याबाहेर गेलाय असे वडीलधाऱ्यांना वाटू लागते तेव्हा त्याचे सामाजिक परिणाम तर होणारच. एक वित्तीय मालमत्ता आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणून सोने उंच भरारी घेत असताना भारत एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा आहे. सोने आज एक बाजाराभिमुख साधन बनले आहे. परंतु त्यामुळे ज्या कुटुंबांच्या दृष्टीने ते सुरक्षिततेचे प्रतीक होते त्यांनाच बाजूला सारले जाऊ नये याची दक्षता घेणे मात्र गरजेचे आहे.