मुलं म्हणतील तिथे सही करताय? थांबा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:42 IST2026-03-29T12:41:48+5:302026-03-29T12:42:03+5:30
अगदी पोटच्या मुला-मुलीने दिलेला असला, तरी कागदावर सही करताना तो कागद दोन वेळा वाचा. वाटल्यास तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.

मुलं म्हणतील तिथे सही करताय? थांबा...
मूठभर बदाम खाऊन येणार नाही एवढी अक्कल एका विश्वासघाताने येते असे म्हणतात, खरेच आहे ते. एकदा एक ८५ वर्षांचे आजोबा ऑफिसमध्ये आले. आजोबांना दोन मुली, दोन मुलगे. थोरली मुलगी पुण्यात आणि इतर तिघेही अमेरिकेत... आजोबा म्हणाले, "थोरली मुलगीच माझ्याकडे बघते, बाकीची तिघं अमेरिकेत असतात. सगळे पैसेवाले आहेत आणि आपापल्या संसारात सुखी आहेत. थोरल्या मुलीचा स्वतःचा बंगलाही आहे..." आजोबा म्हणाले, " या मुलीनेच मला फसवल्याची शंका मला येते आमाझ्या फ्लॅटची या वर्षीची प्रॉपर्टी टॅक्सची पावती पाहिली तर त्यावरचे माझे नाव गायब आहे, तिथे तिचे नाव आहे... ते कसे आले मला कळत नाही. मी रजिस्टर 'विल' करून ठेवले आहे. त्यात माझ्या सर्व मुलांना माझ्या प्रॉपर्टीत समान हक्क देऊन ठेवला आहे. ते 'विल' मी गेल्यावरच लागू होणार ना?" मी म्हटले बरोबर आहे. तुमच्या हयातीमध्ये तुमचे मृत्युपत्र हा एक नुसता कागद आहे, त्याचा उपयोग तुमच्या मृत्युनंतरच होईल.
पाणी कुठेतरी मुरत होते. मोठ्या मुलीला कधी कशावर सही वगैरे दिली होती का, याची चौकशी मी केली. त्यावर आजोबा म्हणाले, "मला वयोमानानुसार बँकेत, महापालिकेत हेलपाटे घालणे जमत नाही. मोठी मुलगी पुण्यातच असल्याने ती मला म्हणाली, बाबा तुम्ही मला पॉवर ऑफ अॅटर्नी द्या. त्याप्रमाणे १-२ वर्षांपूर्वी आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेलो होतो. तिने मला पॉवर ऑफ अॅटर्नी लिहिलेला कागद दाखवला आणि माझी सही घेतली." त्याची कॉपी मागितली असता ती आजोबांकडे नव्हती. थोडा शोध घेतला असता असे लक्षात आले की, त्या मुलीने पॉवर ऑफ अॅटर्नी न घेता बक्षीसपत्र करून त्यावर वडिलांची सही घेतली होती. बक्षीसपत्राचा कायदा असा आहे की, एकदा केले की ते अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच रद्द होते. रद्द करण्यासाठी कोर्टात दावा करून आपली फसवणूक कशी झाली, हे सिद्ध करावे लागते. त्याची नोंदणी झाली की, मालकी लगेच ज्याच्या नावे बक्षीसपत्र लिहून दिले.
आहे त्याच्या नावे तबदिल होते. त्याप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या आता ती मुलगी मालक झाली होती. कायद्याने बक्षीसपत्र ज्या दिवशी नोंदविले त्याच दिवशी आजोबांची त्या फ्लॅटची मालकी त्यांच्या थोरल्या मुलीकडे गेली आणि त्यामुळे मृत्युपत्र जरी नंतर केले असले, तरी त्या दिवशी आजोबा स्वतःच त्या फ्लॅटचे मालक नव्हते!! कारण मृत्युपत्राने आपल्या मालकीची जी मिळकत असेल तेवढीच देता येते.
मग आजोबा, त्यांची अमेरिकेतील तीन मुले आणि आम्ही असा एक कॉन्फरन्स कॉल केला. 'आमचा हक्क ती अशी कशी काय घेऊ शकते? कोर्टात आपण लढूच' असे ठरले. नंतर आम्ही कोर्टात दावा दाखल केला आणि दुर्दैवाने दावा चालू असतानाच आजोबांचे निधन झाले. त्यांच्या वतीने वारस म्हणून दावा चालवायला अमेरिकेतील मुले आली नाहीत आणि त्यामुळे प्रकरण आपोआपच संपले.
यातून घ्यायचे धडे
कुठल्याही कागदावर सही करताना तो कागद दोन वेळा वाचा. वाटल्यास तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. बक्षीसपत्र करायचेच असेल तर स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी 'लाइफ इंटरेस्ट' म्हणजेच तहहयात उपभोग घेण्याचा हक्क ठेवा. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याने "माझी नीट काळजी घेईन या अटीवरच मुलाला/मुलीला बक्षीसपत्र करून देत आहे, त्यात कसूर झाल्यास बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार मी राखून ठेवत आहे." अशी स्पष्ट अट लिहिली नसेल तर बक्षीसपत्र रद्द होऊ शकणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे तसा उल्लेख बक्षीसपत्रात जरूर करा