गावच्या गल्लीतली पोरं परवापरवापर्यंत होती, ती गेली कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:50 IST2026-03-10T08:50:05+5:302026-03-10T08:50:46+5:30
इथे तिथे बसून गप्पा मारणारी किंवा रात्री उशिरापर्यंत व्हॉलीबॉल खेळणारी पोरं नाहीशी झाली. कुठे चार पोरं दिसली, तर चौघांच्याही मुंड्या मोबाइलमध्ये !

गावच्या गल्लीतली पोरं परवापरवापर्यंत होती, ती गेली कुठे?
बालाजी सुतार
कवी-कथाकार
गावाला प्राचीनत्वाचा स्पर्श देणाऱ्या काही खास गोष्टी असतात. उदाहरणार्थ, सांजेचा प्रहर. ‘झाल्या तिन्ही सांजा.. करून शिणगार साजा..’ या गाण्यात येतो तो तिन्हीसांजेचा प्रहर. दिवसभर सुन्नाट उन्हातल्या स्तब्ध शांततेमध्ये निपचित पडल्यासारखं वाटणारं गाव ‘सांच्यापार’च्या प्रहरी प्राण धारण करायला लागतं. दिवसभर शाळेच्या कोंडवाड्यात अडकून सुटलेली पोरं गावातल्या गल्ल्यांमधून, बारक्या बारक्या वाटांवरून दिसायला लागतात. रानामाळातून कष्टून गावात परत येणारी माणसं-बायामाणसं दिसायला लागतात. पाण्याच्या आडा-हापश्यांवर वर्दळ वाढते. पूर्वी ‘आकाशवाणी’ बोलत असायची, आता टीव्हीवरल्या बातम्यांच्या सिग्नेचर ट्यून्स किंवा मालिकांची शीर्षकगीतं विरळ-सघन स्वरात वाऱ्यावर भिरभिरायला लागतात.
जराभर उशिराने गावातल्या रस्त्यांवरच्या लायटींचे खांब पेटतात, तेव्हा त्यातून प्रकटणारा मळकट धूसर आणि पिवळसर उजेड. मधल्यामधल्या घरांतून रस्त्यावर ओसंडत असलेले उजेडाचे तुकडे. गल्लीत काहीबाही खेळणारी बारकी पोरं, त्यांचे कल्लोळ आणि घराघरांतून दरवळणारे स्वैपाकातले चटकदार गंध. मधूनच मशिदीतून अजान-नमाजीचे स्वर उठतात. देवळातल्या घंटेचे निनाद ऐकायला येतात. कुठे भजनाचे सूर. उशीरभराने देवळात पोथी चालू होते. याच्या त्याच्या ओट्यावर तरणी पोरं चावटसावट गप्पांमध्ये रंगून जातात. उशिरा एखादा चुकार ‘देशीवादी’ आरोळ्या ठोकत हेलपाटत शेजाऱ्याला किंवा बांधभावाला गाळ्या देत इकडून तिकडे जाताना दिसतो. अगदी शेवटपर्यंत गल्लीगल्लीतून कुत्र्यांच्या भांडणांचे आवाज उठत राहतात. हळूहळू गाव पुन्हा सकाळपर्यंत गुडूप झोपी जातं. अगदी शेवटून उरतात ते गर्द काळोख्या शांततेचे आवाज.
...हे असं चित्र परवापर्यंत होतं आणि क्वचित आजही दिसतं गावांमधून. संध्याकाळी, आणि पुढे रात्र चढत जाईल तसतशी, गावं त्यांच्या मूळ प्राचीन रूपात जात राहतात. प्राचीन म्हणजे फारच प्राचीन. गावाचे बाहेरचे रंग बरेचसे बदलले असले तरी गावाचं अंतरंग अजूनही जाणवतं, ते रात्री उशिरा. संध्याकाळी कधी गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत उगाचच चालत गेलं, तर काही गोष्टी बदललेल्या दिसतात अर्थात. म्हणजे माझ्या लहानपणी दिसायची तेवढी बारकी पोरं आता रस्त्यात खेळताना दिसत नाहीत. तरण्या पोरांच्या बसायच्या काही ठराविक जागा होत्या, त्या रिकाम्या दिसतात आता. कुठे एखाद्या घराच्या ऐसपैस ओट्यावर, कुठे बाजाराच्या मैदानात, शाळेच्या ग्राउंडवर, वेशीशी असलेल्या दुकानांच्या उतरत्या पायऱ्यांवर जागजागी मोठी पोरं गप्पांचे अड्डे जमवून असत. कुठे भांडणं होत. कुठे नुसत्याच ‘चर्चा’ घडत. ही पोरं आता तशी दिसत नाहीत.
मागच्या बारा-पंधरा वर्षांत मोबाइल नावाच्या मूठभर यंत्राने खूप गोष्टींना मूठमाती दिली. त्यात ही इथे तिथे बसून गप्पा मारणारी किंवा रात्री उशिरापर्यंत शाळेच्या मैदानात व्हॉलीबॉल खेळणारी पोरं नाहीशी झाली. ‘लपनापाणी’ किंवा विटीदांडू वगैरे खेळत असलेली बारकी पोरंही मोबाइलने गावांच्या रम्य चित्रातून पुसून टाकली. एखाद्या ओट्यावर चार पोरं बसलेली असली तर चारही जणांच्या मुंड्या मोबाइलमध्ये खुपसलेल्या असतात. हजार वर्षांपासून एकसारख्या असणाऱ्या रात्री मागच्या एकदीड दशकात कुणास ठाऊक कुठे हद्दपार झाल्या आहेत. गावांना प्राचीनत्व बहाल करणारे ते लक्षणसंपन्न स्वप्नासारखे सांजप्रहर विरून गेल्याचं लक्षात येतं, तेव्हा मला बराच वेळ वाईट वाटत राहतं.