शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

तेच ते वाचणं, तेच ते पाहणं; यात कसलं ‘वेड’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 09:33 IST

मराठी माणूस नाटकवेडा आहे हे, अत्यंत बालिश व धादांत खोटं विधान आहे. आम्ही पैसे देतो, तुम्ही विनोद करा, कोलांट्या मारा, यातच मराठी लोकांना भयंकर रस!

- मोहित टाकळकर(लेखक, दिग्दर्शक)

प्रदीर्घ काळानंतर नाट्यगृहांचे दरवाजे उघडताहेत...जगात सगळीकडेच सध्या सादरीकरणाबद्दल कठीण स्थिती आहे. कोरोना साथीमध्ये जपान -आफ्रिकेचा असो किंवा आपल्याकडचा असो, प्रेक्षक आणि नाटकवाले एकाच पानावर येऊन पोहोचलेत. लोकप्रिय व्यावसायिक नाटकं आणि आम्ही करतो ती प्रायोगिक नाटकं यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. व्यावसायिक नाटकाच्या उपलब्ध, तयार प्रेक्षक वर्गाला धक्का पोहोचेल असं वाटत नाही. मात्र प्रामाणिकपणे सांगायचं तर, कोरोनापूर्वीही प्रयोगशील नाटकांना अत्यंत मर्यादित प्रेक्षकवर्ग होता, तो आणखी रोडावेल की, काय असं वाटतं. अशा नाटकवाल्यांनी सक्तीच्या विरामाचं महत्त्व ओळखायला तर हवंच, पण, आपण जो नाट्य विचार करतोय तो खरोखर वेगळा आहे का?, - हे बारकाईनं तपासावं लागेल. तसा विचार होऊन रसरशीत, आव्हानात्मक आशय दिला तर, भवितव्य आहे.

दोन दशकं तू सातत्याने प्रायोगिक नाटक करतो आहेत. जगभर तुझे मित्र. एकूणच काय चित्र दिसतंय? ऑनलाईन प्रयोगांमुळे  लंडन-पॅरिसमधले चांगले प्रयोग बघायला मिळताहेत. त्यातून लक्षात येतंय की, आपल्याकडे नाटक ही गोष्ट गांभीर्यानं घेतलीच गेली नाही. मराठी माणूस नाटकवेडा आहे हे ऐकायला सुंदर व प्रत्यक्षात अत्यंत बालिश व धादांत खोटं विधान आहे. ‘आम्ही जरा संगीतवेडे आहोत’ असं म्हणताना आपण जुनं भावगीत पुन्हा पुन्हा ऐकत आळवत बसतो की, जगभरातल्या संगीताला मोकळेपणानं मिठी मारतो?, मराठी माणसाला अन्य देशातली सोडा, आपल्या प्रादेशिक भाषांमधली वेगळा आशय घेऊन येणारी नाटकंही बघायची नसतात. सोयीस्कर पांघरूणाच्या उबेत आपण तेच ते वाचतो, तेच ते पाहातो. याला वेड कसं म्हणता येईल?, वेड नव्या शक्यता अनुभवण्यासाठी तयार असतं. परदेशात कोविडोत्तर काळात अशा कलांचं कसं होणार ही भीती किंवा प्रश्नच त्यांना पडलेला मला दिसलेला नाही. खरं तर त्यांनीही आपल्याइतकंच सोसलंय, पण, तिथं अत्यंत नवेनवे प्रयोग सुरू आहेत. 

अत्यंत जिद्दीनं लोक या स्तब्ध व उलथापालथीच्या काळात जे बदललं त्याचा शोध आपापल्या माध्यमातून घेताहेत.  आपल्याकडे अशा प्रयोगांना जागा नाही, कारण आपल्याला त्याची गरज वाटत नाही. बंद अंधाऱ्या जागेत, असुरक्षित सोबतीने चावून चोथा झालेला खेळ पाहाणं व याला मनोरंजन मानणं हे दुर्दैवी आहे. आम्ही पैसे देतो, आमच्या समोर विनोद सादर करा, कोलांट्या उड्या मारा, मोठे भपकेदार सेट्स लावा यामध्ये मराठी लोकांना भयंकर रस आहे. प्रेक्षक नावाची एन्टिटी आधीच टेस्टलेस होती, तिला कुठलाही चेहरा नव्हता. आता तर, ती आणखी अस्तित्वहीन झालेली आहे.

म्हणजे? ‘आसक्त’नं कोविडकाळात ‘द व्हाईट बुक’ या हँग कँग नावाच्या बुकर पुरस्कार विजेत्या कोरियन लेखिकेच्या पुस्तकावर बेतलेलं ‘कलर ऑफ लॉस’ नावाचं नाटक बसवलं. आधी मी ऑनलाईन नाटकाबद्दल साशंक होतो, पण, करून बघितल्याशिवाय नकारात्मक बोलण्याचा  हक्क नाही. म्हणून आम्ही तंत्र नीट समजून घेत त्यातल्या शक्यता आजमावल्या. डिजिटल नाटक म्हणजे नाट्य शूट करून दाखवणं नव्हे. तसं केलं तर, ते सपाट होऊ शकतं हे कळलं. या माध्यमातही हळूहळू नाटक उभं राहातंय हे कळलं. मृत्यू, हरवलेपण या गोष्टींबद्दल चर्चा करणारं ते अतिशय त्रास देणारं नाटक आहे. जपान, आफ्रिका, अमेरिका व कुठूनकुठून या नाटकाला तिकीट काढून प्रेक्षक उपस्थित होते. प्रयोगाला प्रतिसाद मिळाला. मात्र त्यात एकही ‘नाटकवेडा’ मराठी माणूस नव्हता.

पण, लोकांवर मनोरंजनाची चढलेली धुंदी... त्याचं काय होणार? ‘लोकांनी कोविडकाळात खूप गमावलं आहे, समोर शून्य वाढून ठेवलेलं आहे असं वाटावं इतका दबाव आहे. त्यामुळं प्रेक्षक जर, येणार असतील तर, त्यांनी गंभीर काही का बघावं?, त्यांना हसवायला हवं.’ - असा एक मतप्रवाह आहे. म्हणजे गंभीर दाखवण्यानं लोक आरसा बघितल्यासारखं बघणार आहेत का?, असं का बघतील लोक?, आणि बघितलं तर, का बघू नये?, विश्वयुद्धानंतर पोलंडसारख्या व अन्य युरोपियन देशांतही जिथं सगळं काही जमीनदोस्त झालं तिथंही सर्वात चांगलं साहित्य, संगीत, सिनेमे त्या काळात व त्या पश्चात बाहेर येताना घडले आहेत. सार्त्र, काम्यू, ब्रेख्त, बेकेट अशासारख्यांना युद्धानंतर झालेल्या तीव्र नैराश्याच्या काळात व्यक्त होण्याची, विचार करण्याची नवी वाट सापडलेली आहे. ज्या लोकांना भविष्याबद्दल कसलीच आशा उरलेली नव्हती त्या समुदायानं प्रतिसादाचे मार्ग शोधले आहेत. त्यामुळं कोविडच्या झळांनंतर आता प्रेक्षकांना स्वस्त मनोरंजन हवं हा मूर्ख युक्तिवाद आहे. मान्य की, सगळ्याच कलांचं मूलभूत उद्दिष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आहे. पण, त्याहीपेक्षा त्यांच्या जगण्याबद्दल प्रश्न विचारावेत, काही गोष्टी जाणवून द्याव्यात हे ही कलेचं काम आहे. या दोन वर्षात जे गमावलं, हातून निसटलं त्यामधून अशी एखादी ताकदीची गोष्ट बघणं ज्यातून वेगळ्या ऊर्मी कळतील, ते मनोरंजनच नव्हे का?, मनोरंजन म्हणजे निव्वळ हसणं नव्हे. नाटक ही अभिजात कला नाही. सगळ्या कलांना जरूरीनुसार पोटात सामावून घेऊन नाटकाचा प्रयोग घडतो. त्यामुळे विशिष्ट परिभाषा नसणारं नाटक सतत बदलतं राहाण्याची ताकद ठेवतं. जेवणात जसं आंबट, तिखट, तुरट, गोड सगळं आपल्याला रूचतं, त्यातले देशी-परदेशी बदल आपण काळाच्या ओघात स्वीकारले तसंच मनाचा परिपोष करणाऱ्या नाटकाचीही परिमाणं व बदलत्या संहिता समजून घ्याव्या लागणार. त्यातून आपल्या मनाला सत्त्व मिळेल. नव्या व अवघड चवी मान्य करणं कठीण असतं, पण, इतिहासाचं ओझं बाळगलं नाही व तोच कुरवाळत बसलो नाही तर, दिशा शोधता येतात! 

(मुलाखत : सोनाली नवांगुळ)

टॅग्स :Natakनाटक