तेंडुलकर, हे इतके बीभत्स क्रौर्य कुठून येते?

By संदीप प्रधान | Updated: March 22, 2025 10:55 IST2025-03-22T10:55:10+5:302025-03-22T10:55:50+5:30

ज्याची शिकार करायची त्या भक्ष्याला मारण्याआधी पंजे मारमारून ‘खेळवण्या’ची खुनशी वृत्ती माणसामधले छुपे पशुत्व अधिकच उघडेवाघडे करत निघाली आहे का?

Tendulkar, where does this horrible cruelty come from | तेंडुलकर, हे इतके बीभत्स क्रौर्य कुठून येते?

तेंडुलकर, हे इतके बीभत्स क्रौर्य कुठून येते?

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, मुंबई -

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे व्हिडीओ उजेडात आल्यावर समाजमन हेलावले. ज्या आरोपींनी हे कृत्य केले त्यांना देशमुख यांना संपवायचे होते. मात्र, त्याकरिता त्यांनी ज्या पराकोटीच्या क्रौर्याचा मार्ग अवलंबला त्यामुळे माणसांमधील दिवसागणिक वाढत असलेल्या क्रौर्याचा मुद्दा ऐरणीवर आला. अत्याचार, बलात्कार, खून हे मानवी समाजात नवे नाही; पण ज्या पद्धतीने माणूस माणसाला संपवू लागला आहे त्या पद्धती मात्र अधिकाधिक पाशवी आणि क्रूर होऊ लागल्या आहेत का? ज्याची शिकार करायची त्या भक्ष्याला मारण्याआधी पंजे मारमारून ‘खेळवण्या’ची खुनशी वृत्ती माणसामधले छुपे पशुत्व अधिकच उघडेवाघडे करत निघाली आहे का? खून करण्याआधी बेदम, नृशंस मारहाण आणि अर्धमेल्या माणसाशेजारी उभे राहून काढलेल्या सेल्फी, मृतदेहांवर पाय रोवून निर्लज्ज हसतानाचे आपलेच फोटो फोनमध्ये ठेवण्याचे विचित्र व्यसन... याला काय म्हणावे?

माणसाला मुळात हिंसेचे (अनेकदा छुपे) आकर्षण असते. रोमन साम्राज्यात गुलामांना एका मोकळ्या जागेत सोडायचे व त्यांच्यावर उपाशी सिंहांना सोडून किंवा आपल्या शस्त्रधारी सैनिकांना सोडून त्यांच्याशी झुंज द्यायला लावायचे, असे खेळ खेळले जात असल्याचे चित्रण आपण कथा, कादंबऱ्यांत व चित्रपटात पाहिले आहे. त्यातील अतिरंजित भाग दुर्लक्षित केला तरी दोन जणांनी परस्परांच्या जिवावर उठल्यासारखे एकमेकांना बुकलून काढायचे व त्यावर सट्टा लावायचा अन् दर्शकांनी त्या हिंसाचाराचा आनंद लुटायचा हा खेळ अनेक देशांत आजही खेळला जातो. मारहाणीत जो रक्त ओकत मरण पावतो त्याच्याबद्दल हा खेळ सुशेगाद पाहणाऱ्यांना काडीमात्र दु:ख होत नाही. उलटपक्षी जर हरणाऱ्यावर पैसे लावले असतील व तो गतप्राण झाला तर त्याला चार शिव्या हासडल्या जातात. सध्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसिरीज व चित्रपट पाहा. हिंसाचार खच्चून भरला आहे. बंदुकीच्या गोळीने कवटी फुटून मेंदूच्या चिरफळ्या उडताना दिसतात, चेहऱ्यावर हातोड्याने वार केले जातात, वस्तऱ्याने गळा चिरल्यावर भळाभळा रक्त वाहत असते. या हिंसेला मोठ्या संख्येने दर्शक असल्याखेरीज इतक्या हिंसक वेबसिरीज प्रदर्शित होणे अशक्य आहे. कारण ‘लोक जे पाहतात तेच त्यांना दाखवायचा’ जमाना आहे. 

माणसात एक श्वापद निद्रिस्त स्वरूपात अस्तित्वात असतेच. समाजात राहण्याची सक्ती आणि त्यासंबंधीचे अत्यावश्यक यमनियम यामुळे यातली बहुसंख्य श्वापदे काबूत राहतात, हे वास्तव होय. एखाद्याच्या मनातील हे श्वापद किरकोळ कारणामुळे नखे व दात काढून हिंसक बनते तर एखाद्याच्या मनातील श्वापद अनंत अत्याचारानंतरही कायदा हातात घ्यायला धजावत नाही, असे मानसशास्त्रज्ञ या मानवी अंतर्मनातील संघर्षाचे विश्लेषण करतात.

देशात १९६० व ७०च्या दशकात दुष्काळ, गरिबी, युद्ध, टंचाई, काळाबाजार, स्मगलिंग, अशा कारणांमुळे समाजमनात बरीच कालवाकालव सुरू होती. त्यातून प्रेक्षक तेंडुलकरांच्या वास्तववादी नाटकांकडे आणि ‘अर्धसत्य’मधील ओम पुरीच्या सबइन्स्पेक्टर अनंत वेलणकरकडे आकर्षित झाला. चॉकलेट हिरोंकडे पाठ करून दर्शकांना अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ आवडला. आताची हिंसा ही ‘मी इतरांपेक्षा सरस आहे हे ठसवण्याकरिता किंवा लक्ष वेधून घेण्याकरिता’ प्रामुख्याने दिसते. सत्तरच्या दशकात व्यवस्थेत न्याय मिळत नाही तेव्हा तो हिसकावून घ्यावा लागतो, असे वाटणाऱ्या वर्गाला हिंसेचे आकर्षण वाटत होते. हिंसेच्या माध्यमातून न्यायदान करणारा कालांतराने आपले हे न्यायदानाचे अढळपद टिकवण्याकरिता हिंसेचाच आधार घेतो, याचा तेव्हा सोईस्कर विसर पडला होता. आता सोशल मीडियावर मनोरंजनाकरिता थेट शिव्यांचे शस्त्रच हाती घ्यावे लागते, इथवर  वावदूकपणा करण्यास आपण सरावत चाललो आहोत. 

हे सारे आपल्याला कुठे घेऊन जाणार? ‘हे सारे कोठून येते?’ अशा शीर्षकाचे विजय तेंडुलकर यांचे एक पुस्तक आहे. आता तेंडुलकर नाहीत. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपले आपल्यालाच शोधावे लागणार आहे. 
    sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: Tendulkar, where does this horrible cruelty come from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.