नैराश्यावर बोलू वेगळे काही!

By Admin | Published: April 23, 2017 01:55 AM2017-04-23T01:55:24+5:302017-04-23T01:55:24+5:30

‘नैराश्यं परमं सुखम्’। दचकलात का? जीवनगीतेचा हा षड्ज त्रिकालाबाधित सत्य आहे. आशावादाचा मंत्र जपणाऱ्या या जगात नैराश्याकडे तिरस्काराने पाहिले जाते. त्याला जीवन

Talk to depression, something different! | नैराश्यावर बोलू वेगळे काही!

नैराश्यावर बोलू वेगळे काही!

googlenewsNext

- डॉ. नीरज देव

‘नैराश्यं परमं सुखम्’। दचकलात का? जीवनगीतेचा हा षड्ज त्रिकालाबाधित सत्य आहे. आशावादाचा मंत्र जपणाऱ्या या जगात नैराश्याकडे तिरस्काराने पाहिले जाते. त्याला जीवन ग्रासणारं, उदासीनता पोसणारं, अर्थशून्यतेचा छंद लावणारं व मनोविकृतीचं मूळ मानले जातं. आधुनिक मनोवैज्ञानिक सांगतात, ‘नैराश्यापासून दूर राहा!’ पण इथे तर चक्क नैराश्याला परम सुख म्हटलंय. मनोविज्ञानानं सांगितलेलं पथ्य तत्त्वज्ञांना अपथ्य का बरं वाटत असावं? याचं कारण असं की, मानसशास्त्रज्ञ नैराश्याचा अर्थ आशेचा भंग असा काढतात; तर भारतीय तत्त्वज्ञ नैराश्याचा अर्थ आशेचा लोप असा काढतात.
भारतीय तत्त्वचिंतकांना असं वाटतं की, आशा हा पाश आहे, आशा ही एक अशी बेडी आहे की जी बसली तर माणूस वेडा होऊन स्वप्नांच्या न संपणाऱ्या साखळीमागे धावत सुटतो व ती बेडी तुटली; आशा सुटली की पांगळा होऊन बसतो. नीट विचार केला तर लक्षात येईल, त्यांचं म्हणणं रास्त आहे. आशा-अपेक्षा अर्थात् मागण्या कधीच पूर्ण होत नाहीत. एकानंतर एक साखळी चालूच राहते. तृप्ती लाभतच नाही. खरं दु:ख; खरी वेदना आशेतच असते. आशा स्वप्नांचा इमला उभा करते अन् तो कोसळला की त्याखाली चिरडून, त्याच आशेला तडा जातो व निराशेचा जन्म होतो. खरेतर, आशावान आशाळभूत केव्हा होतो त्याचं त्यालाच कळत नाही. मग मला काय मिळालं, माझ्या हातात काय आहे तिकडं त्याचं लक्षच राहत नाही. ‘मला काय मिळालं नाही हे मात्र विसरता विसरलं जात नाही.
दुनिया अजब खिलौना है
मिल जाय तो मिट्टी
खो जाय तो सोना है।
असं कोणीतरी म्हटलंय ते किती यथार्थ आहे. जे मिळालं नाही त्याचा हव्यासच मूळ ठरतो निराशेचं; नैराश्याचं! म्हणजे निराशा फक्त परिणाम असतो आशेचा, आशावानतेचा. गीता म्हणते, ‘उदासिनो गतव्यथ:’ जे नैराश्याला वरतात त्यांच्यात व्यथा नसते. खरंच व्यथा उपज असते आशेची, ‘हे असं झालं नाही तसं झालं नाही, हे मिळालं नाही ते मिळालं नाही’ यातच बीज असतं व्यथेचं, दु:खाचं!
तत्त्वज्ञाच्या नैराश्याचं तसं नसतं. नैराश्यात काम चालतं, कर्तव्य पार पाडलं जातं, त्यात गरज नसते मानपान प्रतिष्ठेची. त्यात केवळ नेमून दिलेले कर्म करायचे असते अगदी स्वत:च्या नकळत श्वास-उच्छ्वासासारखे. त्यात फळाची आशा नसते, स्वप्नांचा भार नसतो वा कर्तृत्वाचा डौल नसतो. मला काय मिळालं याचा हिशोब नसतो. कार्याचा डोंगर वाहताना नैराश्य वरणारे हे सारे ज्ञानी पुरुष कर्तृत्वाचा बोझा भिरकावून देतात अपौरुषेयाच्या दरबारात. त्यामुळेच असेल कदाचित सर्वम् दु:खम् म्हणणाऱ्या सिद्धार्थ गौतमाचा चेहरा प्रसन्न वाटतो, जगन्मिथ्या म्हणणाऱ्या शंकराचा प्रफुल्लित वाटतो, निराशेचा गाव आंदण मिळाला सांगणारा तुकोबा हसरा, खेळकर वाटतो तर नैराश्यं परमं सुखम् म्हणणारा विवेकानंद सळसळत्या तारुण्याचे प्रतीक वाटतो.
या साऱ्यांचे रहस्य फार सोपं आहे, आपल्याकडे जे नाही त्यासाठी व्यर्थ झुरायचे नाही, शेखचिल्लीसारखं फुकट स्वप्नरंजन करीत बसायचं नाही. स्वप्नरंजन म्हणजे यशाचा विचार, यशाच्या मार्गात येणाऱ्या अडीअडचणींचा विचार होय. त्यातून केवळ ताणतणावच निर्माण होतो, हताशताच जन्माला येते. याउलट जर आपण आपल्याला मिळालेल्या गोष्टीत समाधान मानलं, आपल्या मर्यादांचं भान राखून म्हणजे अंथरुण पाहून पाय पसरले तर जग काही म्हणो, आपण आशाभंगातून येणाऱ्या निराशेपासून दूर राहू. कधी कधी मला वाटतं मानसशास्त्राला भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार मिळाला तर मनोव्यापाराचा दृष्टीकोनच बदलेल किंबहुना beyond the psychology जाता येईल.


(लेखक प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आहेत.)

 

Web Title: Talk to depression, something different!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.