सूनबाई शेफारल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2015 23:22 IST2015-04-20T23:22:47+5:302015-04-20T23:22:47+5:30

मानव संसाधनासारखे महत्त्वाचे मंत्रिपद वयाच्या ३८ व्या वर्षी हाती आलेल्या स्मृती इराणी यांचे शेफारलेपण पंतप्रधान, पक्षाध्यक्ष आणि त्यांचा संघ परिवार

SUNBAYE CAMPRELASH | सूनबाई शेफारल्या

सूनबाई शेफारल्या

मानव संसाधनासारखे महत्त्वाचे मंत्रिपद वयाच्या ३८ व्या वर्षी हाती आलेल्या स्मृती इराणी यांचे शेफारलेपण पंतप्रधान, पक्षाध्यक्ष आणि त्यांचा संघ परिवार या साऱ्यांच्याच फार अंगलट येऊ लागले आहे. ‘सास-बहू’ या मालिकेतून प्रसिद्धीला आलेल्या या सूनबाई प्रमोद महाजनांचा हात धरून भाजपात आल्या आणि आल्या दिवसापासून प्रकाशझोतात राहण्याच्या प्रयत्नाला लागल्या. २००४च्या निवडणुकीत महाजनांनी त्यांना दिल्लीत कपिल सिब्बलांच्या विरोधात उभे करून त्यांना हवा तसा स्पॉटलाईट त्यांच्यावर टाकण्याची व्यवस्था केली. त्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. मात्र सदैव चर्चेत राहण्याची कला तोवर त्यांनी आत्मसात करून घेतली होती. महाजनांच्या जवळिकीमुळे त्या मोदींना आरंभी मान्य नव्हत्या. परंतु पुढल्या काळात त्यांनी मोदींशीही नीट जुळवून घेतले. आताच्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशीच गट्टी जमवून त्यांनी स्वत:ला मोदींच्या खास गोटात सामील करून घेतले. त्याचमुळे त्यांना राज्यसभेवरही जाता आले. २०१४च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना अमेठीतून राहुल गांधींविरुद्ध उभे करून पुन्हा एकवार स्पॉटलाईट मिळवून दिला. त्यांच्या प्रचारासाठी अमेठीत गेलेल्या मोदींनी त्यांचा उल्लेख ‘मेरी बहन’ असा केला. मोदींनी त्यांचे मंत्रिमंडळ तयार केले तेव्हा आपल्या या बहिणीला महत्त्वाचे मंत्रिपद देऊन साऱ्यांनाच त्यांच्या भुवया उंचावायला लावल्या. त्यांचा हा निर्णय अडवाणी-जोशी सोडा, खुद्द अमित शाह आणि संघ यांनाही आवडला नव्हता. त्याच काळात कुठल्याशा ज्योतिष्याने या सूनबार्इंना त्या येत्या काही वर्षांत भारताच्या राष्ट्रपती होतील असे सांगून टाकल्याने त्यांचे सत्तापद नको तसे त्यांच्या डोक्यात शिरले. मग सचिवांच्या अंगावर फाईली फेकण्यापासून प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांचा जाहीर अपमान करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या करायला लागल्या. त्यांनी केलेल्या अपमानांना कंटाळलेल्या मानव संसाधन खात्यातील किमान दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली बदली दुसऱ्या खात्यात करावी असे विनंतीअर्ज पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे केले व त्यातले निम्म्याहून अधिक त्या कार्यालयाने मंजूरही केले. शिक्षण विभाग त्यांच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांच्यामुळे अपमानित झालेल्या देशातील कुलगुरूंची संख्याही लवकरच काही डझनांवर गेली. आपण कसेही वागलो तरी मंत्री म्हणून ते खपते व पंतप्रधान आपल्या पाठिशी राहतात याची खात्री पटलेल्या या बार्इंनी पुढे प्रत्यक्ष अनिल काकोडकरांसारख्या देशभरात मान्यता पावलेल्या संशोधक-शास्त्रज्ञाला त्याच्या पदावरून पायउतार व्हायला लावले. त्यांनी माशेलकरांचा अपमान केला आणि अमर्त्य सेन यांनाही खाली पहायला लावले. प्रत्येकच शासकीय समारंभात अग्रस्थानी राहण्याचा प्रयत्न करण्याच्या भरात त्यांनी राजनाथसिंह आणि जेटलींसारख्या ज्येष्ठांनाही अपमानित केले. पक्षातील खासदारांना, आमदारांना व वरिष्ठ कार्यकर्त्यांनाही त्यांची भीती वाटावी असेच त्या त्यांच्याशी वागत राहिल्या. त्या साऱ्यांत आलेल्या नाराजीची प्रतिक्रिया ही की संसदेत त्यांना उद्देशून शरद यादव जेव्हा ‘बाई, तू पूर्वी काय होतीस हे मला चांगले ठाऊक आहे’ असे म्हणाले तेव्हा त्यांच्या बचावासाठी एकही मंत्री वा त्यांच्या पक्षाचा कोणताही खासदार उभा राहिला नाही. ‘लोणची आणि पापडाचे खाते सांभाळण्याचीही लायकी जिच्यात नाही तिला मोदींनी मानव संसाधनासारखे मंत्रिपद देऊन काय साधले’ हा एका ज्येष्ठ महिला पत्रकाराचा प्रश्न येथे उल्लेखनीय ठरावा. या बार्इंविषयी संसदेच्या परिसरात जे बोलले जाते ते लिहिण्यासारखेही नाही. हे सारे अतीच झाले तेव्हा पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी बाईंचे नाव पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतून वजा केले. आपले नाव असे अनपेक्षितरीत्या कापले गेल्याचा बार्इंना बराच धक्काही बसला. त्याच काळात संघानेही त्यांच्याविषयीची आपली नाराजी सरकारला कळवून टाकली. प्रशासनातला अधिकारी वर्ग त्यांच्या विरोधात कधीचाच उभा होता. या साऱ्यामुळे आपल्या वाट्याला येत असलेले एकाकीपण समजण्याएवढा संवेदनशीलपणा त्या नटीत नक्कीच असावा. त्याचमुळे ‘पंतप्रधान (मेरे भय्या) परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या नकळत पक्षाध्यक्षांनी माझे नाव कार्यकारिणीतून काढले’ असे म्हणण्याचा आगाऊपणाही त्यांनी केला. परवा भाजपाची बेंगळुरूमध्ये बैठक सुरू असताना, तिचे निमंत्रण नसलेल्या या बाई गोव्यात गेल्या आणि तिथल्या एका दुकानात नको तसा धिंगाणा घालून प्रसिद्धीचा सगळा प्रकाशझोत बेंगळुरुवरून आपल्याकडे वळवून घेण्याची किमया त्यांनी केली. परिणामी त्यांनी नेमलेल्या व त्यांच्या कार्यालयात काही महिने काम करीत असलेल्या एका खाजगी अधिकाऱ्याच्या (ओएसडी) नावाला पंतप्रधानांच्या कार्यालयाने परवानगी नाकारून त्यांना त्यांची जागा नव्याने दाखविली. राजकीय जाणकारांच्या मते केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ घातलेल्या पुढल्या बदलाच्या वेळी एकतर त्यांना काढून टाकले जाईल, त्यांच्याकडे कमी महत्त्वाचे पद दिले जाईल किंवा त्यांना पक्षकार्याला जुंपले जाईल. सत्ता खपवून घेतली जाते, प्रसंगी सत्ताधाऱ्यांचा अहंकारही पचवून घेतला जातो पण आपल्या राजकारणात कुणाचाही माजोरीपणा फार काळ चालत नाही याचा हा ताजा नमुना ठरावा.

Web Title: SUNBAYE CAMPRELASH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.