मुलांच्या ताटातले पोषण हरवले, चव जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:48 IST2025-11-01T08:47:41+5:302025-11-01T08:48:48+5:30

आज आपल्या मुलांच्या ताटात चव भरपूर आहे; पण त्यातले पोषण हरवले आहे. चमचमीत अन्नाने हट्टी मुलांचे पोट भरत आहे, पण शरीर आणि मेंदू उपाशी आहेत.

stomachs of stubborn children are being filled with delicious food but their bodies and brains are starving | मुलांच्या ताटातले पोषण हरवले, चव जिंकली!

मुलांच्या ताटातले पोषण हरवले, चव जिंकली!

भाऊसाहेब चासकर
जि.प. शाळा, देवठाण येथे शिक्षक, संयोजक, अॅक्टीव्ह टीचर्स फोरम

नुकतीच माझी बदली झाली. नवीन शाळेत रुजू झालो. दुपारच्या सुट्टीत मुलं जेवायला बसली की, मुलांनी डब्यात काय आणलं आहे, हे मी पाहत असतो. सुमारे १५ ते २० टक्के मुलं शाळेत येताना डब्यात चपाती भाकरीसोबत पापडाची, शेंगदाण्याची, लसणाची किंवा खुरसण्याची चटणी दिसली. शारीरिक वाढ आणि विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उभ्या चिमुकल्या मुलांचा आहार हा असा? 'मुलांच्या डब्यात फक्त चटणी देऊ नका', असं पालकांना सांगायला सुरुवात केली. पालकांनी या भूमिकेचं स्वागत केलं; मात्र, 'पोरं भाजी-भाकरी/चपातीला तोंडच लावत नाहीत', अशी लाडीक तक्रार आई करू लागल्या. हल्ली जेवणाच्या बाबतीत पोरांचे इतके नखरे असतात की 'आज कोणती भाजी करु आणि कोणती नको', हा प्रश्न आईना रोज छळतो. त्यांनी मुलांसमोर जणू हात टेकले आहेत.

पाव, बटर, बिस्कीट, मॅगी, चिप्स, कुरकुरे, चॉकलेट्स, कॅडबरी, फास्ट फूड आणि जंक फूड, हेच मुलांच्या आवडीचे अन्न झाले आहे. जेवताना मोबाइल किंवा टीव्ही असा कुठला तरी स्क्रीन समोर हवा असतो! गेल्या काही वर्षात मुलांच्या जीवनशैलीत आणि खाद्यसंस्कृतीत झपाट्याने बदल झाला. भाजीपाला, कडधान्ये अशा पोषणमूल्य असलेल्या पारंपरिक आहाराऐवजी झटपट, चटकदार आणि आकर्षक पॅकबंद पदार्थांना प्राधान्य आले. भविष्यात हा वेग अधिक वाढेल. भाजी-भाकरी, डाळ-भाताचा हिस्सा कमी होत जाईल. डिजिटल सवयींमुळे मुले निष्क्रिय बनतील, शारीरिक हालचाल कमी होईल. आहारापेक्षा चव व सोय महत्त्वाची ठरेल.

परिणाम? कुपोषण आणि स्थूलपणा दोन्ही वाढतील, प्रतिकारशक्ती कमी होईल, चिडचिड आणि आळस वाढेल. बालवयातच हृदयरोग, मधुमेह आणि रक्तदाबाचे धोके निर्माण होतील, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल. हल्ली रात्री आठ-नऊ वाजता जेवलेली मुले सकाळी केवळ चहा पिऊन शाळेत येतात. थेट दुपारी एक-दीड वाजता जेवणाच्या सुट्टीत जेवतात. परिपाठात राष्ट्रगीत अथवा राज्यगीत सुरू असताना, मुली चक्कर येऊन कोसळताना मी बघतो. बारा-पंधरा तास उपाशी राहिल्यावर दुसरे काय होणार? डोके दुखणे, कार्यक्षमता कमी होणे, शिकण्याकडे लक्ष केंद्रित न होणे, शिकवलेले आत्मसात न होणे! या गंभीर समस्येबाबत पालक अनभिज्ञ तरी आहेत किंवा हतबल तरी।

मुलांचा आहार संतुलित आणि पौष्टिक हवा. Mumbai Main फळे, भाज्या, धान्ये, प्रथिने आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असला पाहिजे. आवश्यक तेवढे मीठ आणि साखर यांचाही समतोल असावा. मुलांच्या वयानुसार, शारीरिक हालचालींनुसार पोषक तत्त्वांची गरज ठरते. आहारात त्यानुसार बदल करणे आवश्यक असते. विज्ञान विषयात मुले प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध घटक, क्षार आणि जीवनसत्त्वांविषयी शिकतात. मात्र, ते केवळ पाठांतर आणि परीक्षेसाठी असते. जीवनात त्याचे उपयोजन होताना दिसत नाही. आहाराबाबत पालक आणि मुले दोघेही कमालीचे बेफिकीर असताना शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची.

वैद्यक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मुलांना दररोज साधारण सव्वा लीटर द्रवपदार्थाची आवश्यकता असते. उष्ण वातावरणात ही गरज आणखी वाढते. पाणी हे सर्वोत्तम पेय. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षात सॉफ्ट ड्रिंक्स, फ्लेवर्ड दूध, फळांचे रस, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स यांचा अतिरेक वाढला आहे. शाळा सुटल्यानंतर मुलांची पावले दुकानांच्या दिशेने झपझप पडू लागतात. बर्फाची 'पेप्सी कांडी', कुरकुरे, वेफर्स, रिंग्ज, बिस्किट, चॉकलेट्स असे खाद्य पदार्थ घ्यायला गर्दी उसळते. फास्ट फूडच्या चवीमुळे मुलांना भाज्यांच्या चवी आवडेनाशा झाल्या आहेत. पाकीटबंद मसाल्यांच्या चवी मुलांना व्यसन लावतात. मुले हट्ट करून रडून रडून त्याचीच मागणी करतात.

'खेड्यातून शहरात शिकायला येणारी बहुतेक मुले कुपोषित दिसतात', असे निरीक्षण लेखक आणि खाद्य संस्कृतीचे अभ्यासक शाहू पाटोळे नोंदवतात, त्यामागचे कारण तेच! एकीकडे कुपोषण, तर दुसरीकडे अति खाणे असे दुहेरी संकट या पिढीसमोर उभे आहे. शाळा, पालक आणि समाज यांनी मिळून 'आहार साक्षरता' निर्माण केली नाही, तर भावी पिढी आजारांच्या सावलीत वाढेल. मुलांना भूक लागेपर्यंत थांबू देणे, त्यांच्या ताटात फळे, ताज्या भाज्यांसह चटण्या, धान्ये आणि कडधान्ये असा समतोल आहार असणे गरजेचे आहे. आज मुलांच्या ताटात चव आहे, पण पोषण हरवले आहे. पोट भरत आहे, पण शरीर आणि मेंदू उपाशी आहेत. या बदलत्या आहार संस्कृतीकडे केवळ घरापुरते न पाहता, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा जेवणात चत आहे, पण जीवनात ऊर्जा नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण होईल. 'निरोगी मुले राष्ट्राची संपत्ती आहे', असे सुविचार निव्वळ शाळांच्या भिंतींवर लिहून कसे भागेल?

bhauchaskar@gmail.com
 

Web Title : बच्चों की थाली: स्वाद जीता, पोषण हारा; बढ़ती चिंता।

Web Summary : बच्चे पौष्टिक भोजन की तुलना में जंक फूड पसंद करते हैं, जिससे स्वास्थ्य समस्याएं होती हैं। संतुलित आहार महत्वपूर्ण हैं, लेकिन बच्चे स्वास्थ्य से ज्यादा स्वाद चाहते हैं। स्कूल, माता-पिता, समाज को स्वस्थ खाने की आदतों को बढ़ावा देना चाहिए।

Web Title : Kids' plates: Taste wins, nutrition lost; a growing concern.

Web Summary : Children prefer junk food over nutritious meals, leading to health issues. Balanced diets are crucial, but kids crave taste over health. Schools, parents, society must promote healthy eating habits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.