स्टीव्ह जॉब्जना आस होती कुंभमेळा भेटीची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:08 IST2025-01-20T09:06:27+5:302025-01-20T09:08:09+5:30
Steve Jobs: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे.

स्टीव्ह जॉब्जना आस होती कुंभमेळा भेटीची!
कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. जगभरातून लक्षावधी भाविकांची पावलं या पर्वणीकडे पडताहेत. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभाला हजेरी लावून आध्यात्मिक अनुभूतीची आस सगळ्यांनाच आहे.
या भाविकांमध्ये आणखी एक व्यक्ती आहे आणि सध्या त्यांच्याकडे सगळ्या भारतीयांचं, जगाचं आणि सोशल मीडियाचंही लक्ष लागून आहे, ‘ॲपल’चे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची पत्नी लॉरेल पॉवेल जॉब्ज याही या महाकुंभात मोठ्या आस्थेनं सामील झाल्या आहेत. त्यानिमित्त आणखी एक घटना चर्चेत आहे ती म्हणजे स्टीव्ह जॉब्ज यांचं भारतावरचं, भारतीय अध्यात्मावरचं प्रेम आणि मन:शांतीच्या शोधाचा त्यांचा अविरत प्रवास.
त्यानिमित्त स्टीव्ह जॉब्ज यांनी तब्बल ५१ वर्षांपूर्वी हातानं लिहिलेलं एक पत्रही सध्या खूप व्हायरल होतं आहे. असं काय खास आहे त्या पत्रात? स्टीव्ह जॉब्ज यांनी आपला मित्र टिम ब्राऊन याला १९७४ मध्ये लिहिलेल्या या पत्रात भारतात कुंभमेळ्याला हजेरी लावण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. काहीही करून त्यांना कुंभमेळ्याला हजेरी लावायची होती. कुंभमेळ्यातल्या पर्वणीत स्नान करून एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती घ्यायची होती.
स्टीव्ह जॉब्ज यांनी मित्र टिमला लिहिलेल्या या पत्राचा सारांश असा.. मित्रा, मला नाही माहीत मी कोण आहे.. सूर्य उगवतो आणि मावळतो, दिवसांमागून दिवस जातात.. आजवर मी खूप प्रेम केलं, खूपदा डोळ्यांतून आसवांचा पूर वाहिला. सध्या मी लॉस गेटॉस आणि सांताक्रूझच्या पर्वतांतील एका फार्महाउसमध्ये राहतो आहे. भारतात एप्रिलमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला जाण्याची माझी इच्छा आहे. मार्चमध्ये केव्हातरी मी इथून निघेन, पण निश्चित असं काहीच नाही. तुझी इच्छा असेल तर तू इथे येऊ शकतोस. तू येईपर्यंत मी निश्चितच इथे आहे. इथल्या निसर्गरम्य पहाडांत आपण दोघंही मन:शांती अनुभवू शकतो. तुझे विचार आणि अनुभव ऐकण्याची माझी इच्छा आहे. तू जी पत्रं मला पाठवलीस त्यातून मी ते नीट समजू शकलेलो नाही. आपण दोघंही एकत्र भेटू आणि आध्यात्मिक जाणिवांची आदानप्रदान करू.
स्टीव्ह जॉब्जनं हातानं लिहिलेलं हे पत्र तेव्हाही प्रचंड गाजलं होतं. २०२१मध्ये झालेल्या लिलावात स्टीव्ह जॉब्ज यांच्या या पत्राला तब्बल ४ कोटी ३२ लाख रुपये मिळाले होते. १९७४चं हे पत्र त्यांनी त्यावेळी लिहिलं होतं, ज्यावेळी ते अध्यात्म आणि बुद्धिझमच्या विचारांनी प्रचंड प्रेरित झाले होते. त्याच शोधासाठी ते अखंड भ्रमंती करीत होते. त्याचवर्षी ते भारतातही आले होते.
उत्तराखंड येथील करोली बाबांच्या आश्रमात ते गेले होते. आदल्या वर्षीच करोली बाबांचं निधन झालं आहे, हे माहीत असूनही त्यांच्या आश्रमात ते गेले होते. त्यांच्या या भारतयात्रेनं त्यांचं अख्खं आयुष्यच बदलून गेलं होतं. कुंभमेळ्याला तर ते कधी हजेरी लावू शकले नाहीत; पण त्यांची अंतिम इच्छा आता त्यांच्या पत्नीनं पूर्ण केली आहे. निरंजनी आखाड्यात त्या राहताहेत. स्वामी कैलाशानंद गिरी यांनी त्यांना ‘कमला’ हे नाव दिलं आहे. अध्यात्माचा हा वारसा असा जगभर फिरतो आहे.