गुणांची ‘बरसात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:32 AM2018-06-11T00:32:22+5:302018-06-11T00:32:22+5:30

दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य.

SSC Result News | गुणांची ‘बरसात’

गुणांची ‘बरसात’

Next

दहावीचा निकाल लागलाय. गुणांची अक्षरश: बरसात झालीय. आता एक-दोन दिवसात ‘कट आॅफ’चा खेळ सुरू होईल. प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची जीवघेणी धडपड आणि मनाजोग्या कॉलेजात प्रवेश मिळाला नाही तर नैराश्य. यंदा राज्यातील १२५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत. धक्कादायक म्हणजे चार हजारावर शाळांचा निकालही १०० टक्के लागलाय. निकालाच्या टक्केवारीत नागपूर विभागाने मात्र शेवटचा क्रमांक पटकाविला. अमरावती विभाग नागपूरच्या पुढे आहे. नागपूर विभागात जवळपास ८०,००० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत तर साडेतीन हजारावर मुलांना ९० टक्क्यांवर गुण मिळालेत. सर्व गुणवंतांचे मनापासून कौतुक. पण हे अभिनंदन करीत असताना मनात सहज विचार येतो; यापैकी नेमके किती विद्यार्थी बारावीत व त्यानंतरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एवढेच यश संपादित करतात. अलीकडच्या काही वर्षांपासून गुण फुगवट्याचा जो ‘ट्रेंड’ आलाय त्याने विद्यार्थी आणि विशेषत: पालकांना पार हुरळून टाकलेय. या गुणरंजनात ते एवढे गुरफटतात की बरेचदा मग गुणवत्तेचे भानच राहत नाही. आज शिक्षण ही एक बाजारपेठ झालीय. उत्तम शिक्षण म्हणजे भरपूर गुण हे एक समीकरण झाले असून, शिक्षणातून गुणवत्तेचा विकास करण्याचा हेतू पार मागे पडलेला दिसतोय. दुसरे महत्त्वाचे असे की, या ‘गुण’गानात जी मुले कमी गुण प्राप्त करतात अथवा अपयशी ठरतात त्यापैकी अनेक मुख्य प्रवाहातून बाहेर पडतात. नैराश्याच्या गर्तेत सापडतात. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. पुढील वर्षापासून गुणांची ही खैरात बंद करण्याचा विचार शिक्षण मंडळ करतेय, हे फार चांगले झाले. अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल प्रचंड वाढलाय. पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागत नाही, ही बाब मंडळाच्या लक्षात आली यात आनंद मानायचा. त्यामुळे यापुढे गुणांवर नव्हे तर गुणवत्तेवर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरेन बफेट यांनी सांगितलंय, यशासाठी शाळेचे वर्ग करणे किंवा टॉपर असणेच आवश्यक नाही. खुद्द बफेट यांनासुद्धा हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, हे विशेष! बिल गेटस् आणि मार्क झुकेरबर्ग हे दोघेही पदवीधर नाहीत. हार्वर्डमधून अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडले. पण यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले. याला काय म्हणायचे? गेटस् एकदा म्हणाले होते, मी कधीच टॉपर नव्हतो, पण आज सर्वश्रेष्ठ विद्यापीठातील ‘टॉपर्स’ माझे कर्मचारी आहेत. ही उदाहरणे यासाठी कारण शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हे सुद्धा आम्हाला कळायला हवे.

Web Title: SSC Result News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.