प्रा. दीपक शिंदे, माजी संचालक, श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन, नांदेड
भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत की, ज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरते. अशा महान विभुतींचे कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरते. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादूर जी, हे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्य, न्याय, करुणा, धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांचे सामाजिक सुधारक म्हणून कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत.
१ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादूर जी हे सहावे शीख गुरु श्री गुरु हरगोबिंद साहेब यांचे तेजस्वी पुत्र. बालपणापासूनच त्यांच्या जीवनावर अध्यात्म, शौर्य आणि सेवाभावाचे संस्कार कोरले गेले. वेद - उपनिषदे, इस्लामी तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल चिंतनातून त्यांच्या विचारांना सर्वधर्मसमभाव आणि उदात्त मानवतावादाची झळाळी प्राप्त झाली. गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते एक प्रभावी सामाजिक सुधारक होते. त्या काळात भारतीय समाज जातीय भेदभाव, धार्मिक अत्याचार, अंधश्रद्धा आणि राजकीय दडपशाहीने ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी समाजाला सत्य, समानता आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला.
भारतीय इतिहासात मुघल सम्राट औरंगजेब आणि गुरु तेगबहादूर जी, ही दोन व्यक्तिमत्त्वे परस्परविरोधी विचारधारांचे प्रतीक म्हणून समोर येतात. सत्ता, कट्टरता आणि धर्मांतराची सक्ती यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगजेबाने धर्म-युध्द पुकारले, तेव्हा गुरु तेगबहादूर जी यांनी औरंगजेबाच्या अन्यायी धोरणांना उघड आव्हान दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणे हे अधर्माचे लक्षण आहे. या संघर्षात त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याचा मार्ग स्वीकारला. १६७५ साली दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेगबहादूर जी यांनी दिलेले बलिदान कोणत्याही राजकीय सत्तेविरुद्ध नव्हते, तर विचार आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी होते. गुरु तेगबहादूर जी मानवतेचे अमर नायक बनले. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ असे गौरवाने संबोधले जाते.
त्यांचे पुत्र श्री गुरु गोबिंदसिंग जी यांनी पुढे खालसा पंथाची स्थापना करून अन्यायाविरुद्ध संघटित लढ्याचा मार्ग दाखवला. आज आपण मानवाधिकारांची चर्चा करतो. पण, गुरु तेगबहादूर जी यांनी १७व्या शतकातच मानवी हक्कांचा पुरस्कार केला. धर्म मानण्याचा अधिकार, विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार हे मूलभूत मानवी हक्क आहेत, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले.
त्या काळात अस्पृश्यता, भेदभाव आणि अन्याय हे भारतीय समाजजीवनाचे वास्तव होते. अशा विषम आणि अन्यायी सामाजिक रचनेत मानवी समानतेचा विचार मांडणे हे क्रांतिकारक धैर्याचे लक्षण होते. याच अंधाऱ्या काळात गुरु तेगबहादूर जी यांनी शीख परंपरेतील ‘एक ओंकार’ या तत्त्वाचा आशय समाजजीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने ईश्वर एकच असून, त्याची निर्मिती असलेला प्रत्येक मानव समान आहे. जात, धर्म, वर्ण किंवा पंथ यांवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. जातीभेदाच्या जखमांवर करुणेचा लेप लावला आणि समाजाला समतेचा मार्ग दाखवला.
गुरु तेगबहादूर जी यांच्या बाणीत आत्मचिंतनाला विशेष महत्त्व आहे. मनुष्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणाचा शोध घ्यावा, इच्छांचे बंधन ओळखावे आणि विवेकाच्या प्रकाशात जीवन जगावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या मते ईश्वरभक्ती ही केवळ शब्दांत, वेशात किंवा विधींमध्ये व्यक्त होत नाही; ती माणसाच्या आचरणात, व्यवहारात आणि सेवाभावात प्रतिबिंबित झाली पाहिजे. समकालीन वास्तवात गुरु तेगबहादूर जी यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. धार्मिक सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि मानवतेचा सन्मान ही मूल्ये आजही अमूल्य आहेत. सदैव राहतील. गुरु तेगबहादूर जी यांच्या ३५०व्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या सामाजिक सुधारणा, मानवतावादी विचारांचे स्मरण करणे, ही काळाची गरज आहे.
profdeepakshinde@gmail.com
Web Summary : Guru Tegh Bahadur championed truth, equality, and freedom. His sacrifice against religious oppression and for human rights remains inspiring. He advocated for 'Ek Onkar,' emphasizing equality and rejecting discrimination, leaving an enduring legacy of social reform and humanism.
Web Summary : गुरु तेग बहादुर ने सत्य, समानता और स्वतंत्रता का समर्थन किया। धार्मिक उत्पीड़न और मानवाधिकारों के खिलाफ उनका बलिदान प्रेरणादायक है। उन्होंने 'एक ओंकार' की वकालत की, समानता पर जोर दिया और भेदभाव को खारिज कर दिया, जिससे सामाजिक सुधार और मानवतावाद की स्थायी विरासत बनी।