‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 05:40 IST2025-04-25T05:39:58+5:302025-04-25T05:40:39+5:30
१९९६-९७ पासून काश्मीरने ‘भारत विरोधी’ ते ‘दहशतवाद विरोधी’ असा प्रवास केला. आता उर्वरित देशानेही हा रक्तबंबाळ भागाकडे ‘वेगळ्या नजरेने’ बघावे!

‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
अधिक कदम, संस्थापक
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन
मी गेली २८ वर्ष काश्मीरमध्ये आहे. इथे येतो. राहतो. काम करतो. इथल्या माणसांना भेटतो. त्यांच्यातलाच आहे आता मी. या २८ वर्षांत काश्मीरही खूप झपाट्याने बदललं. हे बदल सकारात्मक आणि म्हणूनच दिलासादायक आहेत. मी कामाला सुरुवात केली ती कुपवाडा जिल्ह्यातून. हा जिल्हा दहशतवादाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. स्थानिक भाषेत ‘अँटी इंडिया’ ! पण आता चित्र बदललंय. देशात सर्वाधिक ९५ टक्के मतदान होतं तिथे. पूर्वी इथल्या लोकांचा भारत सरकारवर प्रचंड राग होता, आज तसं नाही. काश्मीरमध्ये पर्यटनाचा ओघ वाढला तसा उर्वरित भारताशी आणि मुख्य म्हणजे भारतीयांशी दीर्घकाळाने काश्मिरींचा प्रत्यक्ष संपर्क आला. ही सगळी माणसं आपल्या भल्याचा विचार करणारी आहेत, आपल्या विरोधात नाहीत हे या संपर्कामुळेच काश्मिरींना कळलं आणि काश्मिरींचा त्या सगळ्यांशी एक भावबंध निर्माण झाला. त्यातूनच आज ‘अँटी इंडिया’ ते ‘अँटी टेररिझम’ हा प्रवास झाला हे आपल्याला नाकारता येणार नाही.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सर्व स्तरांतून येणारी प्रतिक्रिया संमिश्र आहे. अर्थात, तशी ती असणं फार अनपेक्षित नाही. काश्मीरमधले लोक श्रीमंत आहेत, त्यांना पर्यटनातून मिळणारे पैसे मिळाले नाहीत म्हणून काही फरक पडत नाही वगैरे चर्चा कानावर येत आहेत. पण त्यात तथ्य नाही. पुण्यामुंबईत माणूस रस्त्यावर झोपू शकतो. काश्मीरमध्ये जिवंत राहायचं असेल तर डोक्यावर छप्पर असणं अत्यावश्यक आहे. पण डोक्यावर छप्पर आहे म्हणून ते श्रीमंत आहेत असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.
काश्मीरमध्ये वर्षानुवर्ष होत आलेल्या भारत विरोधी कारवायांमध्ये मूठभर स्थानिकांचा सहभाग असेल; पण त्यामुळे सर्वच्या सर्व काश्मिरी भारतविरोधी हा अर्थ काढणंही तितकंच चुकीचं आहे. धर्माच्या आधारावर निर्माण झालेले देश हे भारतासारख्या सर्वधर्मसमभाव आचरणात आणत असलेल्या देशाविरोधात खार खाऊन असणार हे उघड आहे. त्यामुळे आपल्याला रक्तबंबाळ करण्याचे प्रयत्न सुरू राहणारच आहेत, त्याला उत्तर देण्यासाठी काश्मिरी किंवा मुसलमान हे निकष असू शकत नाहीत, हे ओळखणं आणि देशवासीयांनीही तसं जबाबदार वर्तन करणं महत्त्वाचं आहे, याची जाणीव आपण ठेवायला हवी.
काश्मीरमध्ये पर्यटक येतात. पण इथल्या पर्यटनावर कुणाचंही नियंत्रण नाही. मुंबई-पुण्यासारख्या शहरात एखाद्या मोठ्या रस्त्यावर किती तरी सीसीटीव्ही कॅमेरे असतात. पहलगाममध्ये लाखो पर्यटक येतात; पण तिथे असा कुठला जागता पाहारा आहे? तो का नाही? - असे प्रश्न पर्यटकांना पडायला हवेत. पर्यटनावर पोट असलेल्या स्थानिक काश्मिरींना पडायला हवेत. ते विचारले जात नाहीत तोपर्यंत हे चित्र बदलण्यास सुरुवात होणार नाही. पहलगामच्या घटनेचे परिणाम दूरगामी असतील. मुस्लिमांना लक्ष्य केलं जाईल, त्यांच्या देशनिष्ठेबद्दल शंका घेतल्या जातील, पण ते योग्य आहे का याचा सारासार विचार करायची वेळ आली आहे. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल राग असायलाच हवा, पण त्या रागाचं पर्यावसान धर्मयुद्धात होता कामा नये. ते तसं होत असेल तर आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे लक्षात ठेवायला हवं. बहुसंख्य काश्मिरींना ते आता कळलं आहे. आपल्यालाही ते जितकं लवकर कळेल तेवढं सगळ्यांच्या हिताचं असेल.
१९९६-९७ पासून काश्मीरचा ‘भारत विरोधी ते दहशतवाद विरोधी’ असा झालेला प्रवास मी स्वतः जवळून पाहिला आहे. माणसे, त्यांचे विचार बदलत जाताना अनुभवले आहे. एक प्रसंग आठवतो. २०१६-१७ चा काळ. बुरहान वाणीच्या काळात काश्मीरातील पॅलेट गनच्या हल्ल्यांमध्ये किती तरी तरुण मुलांचे डोळे गेले. वयाच्या जेमतेम विशीत ही तरुण मुलं कायमस्वरूपी अंध झाली. डोळ्यांचं अंधपण आणि द्वेषातून आलेलं आंधळेपण यातून ते तरुण आयुष्यभर संतापाने धुमसत राहिले असते. त्याचे दुष्परिणाम या ना त्या प्रकारे झालेच असते. या मुलांचं अंधत्व दूर करण्यासाठी आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टरांच्या तुकड्या काश्मीरमध्ये आणल्या होत्या. त्या तरुण मुलांवर शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्यांना नवी दृष्टी मिळाली. हाच प्रयोग आता देशभरात व्हायला हवा आहे. गेली काही वर्षे समाज म्हणून आपण आंधळे झालो आहोत. त्या आंधळेपणावर आता तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, तरच आपली दृष्टी बदलेल आणि नवा प्रकाश दिसेल !
adhik@borderlessworldfoundation.org