सपकाळ यांना टिपू सुलतानवर बोलायची काय गरज होती?
By अतुल कुलकर्णी | Updated: February 17, 2026 07:35 IST2026-02-17T07:34:20+5:302026-02-17T07:35:11+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गांधीवादी विचाराने पक्ष चालवायला निघाले आहेत. त्यामुळे अनेकदा ते स्वतःहून स्वतःची अडचण करून घेतात.

सपकाळ यांना टिपू सुलतानवर बोलायची काय गरज होती?
अतुल कुलकर्णी, संपादक मुंबई
राजकारण्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची एवढी घाई का झालेली असते कळत नाही. धूर्त राजकारणी अनेक प्रश्न लीलया टोलावतात. आपण ऐकलेच नाही असेही सांगतात. विचारलेल्या प्रश्नाचे भलतेच उत्तर देऊन स्वतःची सुटकाही करून घेतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गांधीवादी विचाराने पक्ष चालवायला निघाले आहेत. त्यामुळे अनेकदा ते स्वतःहून स्वतःची अडचण करून घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष टिपू सुलतान होते, असे विधान सपकाळ यांनी केले. अशी तुलना करणेच पूर्णपणे चुकीचे होते. त्यामुळे भाजपला राजकारण करण्याची आयती संधी त्यांनी दिली.
बऱ्याचदा सपकाळ यांच्या भाषणात अनेक असे शब्द असतात जे माध्यमांमध्ये छापताही येत नाहीत. मात्र असे बोललेले लोकांना आवडते, असे त्यांना वाटत असावे. ते अभ्यासू आहेत. त्यांच्या मागे कसल्या चौकशांचा ससेमिरा लावता येत नाही, हे जरी खरे असले तरी त्यांचे हे विधान ‘आ बैल मुझे मार’ पठडीतले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली होती. त्यांना जे प्रश्न विचारले त्याची भलतीच उत्तरे त्यांनी दिली असे म्हणून त्यांची पप्पू अशी प्रतिमा तयार केली गेली. मात्र, गेल्या काही वर्षांत भाजपचे अनेक नेते विचारलेल्या थेट प्रश्नांना बगल देऊन भलतीच उत्तरे देतात किंवा नवीन प्रश्न तयार करतात. सपकाळ यांनी यातून धडा घेतलेला दिसत नाही.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या काळात टिपू सुलतान यांची नावे कुठे व कशी दिली गेली? त्यात कोणी, कसा पुढाकार घेतला, हे सांगितले. २०१२ मध्ये अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव ‘शहीद-ए-वतन शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान’ ठेवण्याचा ठराव भाजपनेच मांडला. सूचक होते माजी महापौर व सध्याचे भाजपचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल. २०१३ मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ नाव देण्याच्या भाजप नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. त्यात मुंबईच्या सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नावही होते. २००१ साली अंधेरी (प) येथे ‘शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान’ मार्ग नामकरणाचा ठराव भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत एकमताने मंजूर झाला होता. भाजप नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले होते. २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते अशी काही उदाहरणे सावंत यांनी दिली. यासाठीची कागदपत्रेदेखील त्यांनी माध्यमांना दिली. हे खोटे असेल तर भाजपने पुराव्यानिशी सांगितले पाहिजे, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल.
मात्र यात काँग्रेसला जेवढे डॅमेज करायचे होते तेवढे करून झाले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी टिपू सुलतानचा विषय भाजपच्या हाती दिला. अधिवेशनात भाजप सातत्याने काँग्रेसला या विषयावरून टोमणे मारत राहील. उद्धवसेनाही यासाठी फारशी मदतीला येणार नाही. हा असा ‘सेल्फ गोल’ प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या हाताने करून घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या नेत्यांनी कधीही सरकारला अडचणीत आणल्याचे एकही उदाहरण नाही. मुंबईचे नेते धारावीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. राज्यातले नेते कुठे गेले हे प्रदेशाध्यक्षांनाही सापडत नाहीत. सरकारला जनतेच्या प्रश्नांवर येण्यासाठी मजबूर करणे, आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडणे हे काम विरोधकांचे आहे. इथे विरोधक जर सत्ताधाऱ्यांना धर्म आणि जातीवरून भांडण्याचे आयते मुद्दे देत असतील तर सत्ताधाऱ्यांना दोष कसा देणार..?
‘टिपू सुलतानची तुलना करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जीभ कापा’, असे विधान भाजपच्या मुंबईतल्या नेत्याने केले तेव्हा कुठे सपकाळ यांनी, ‘माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप, हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल.. तर माझी जीभ नक्की कापा’, असे प्रत्युत्तर दिले. आपण प्रदेशाध्यक्ष आहात, राज्याचे मुद्दे आपण मांडावेत, देशाचे राजकारण करायला शीर्षस्थ नेते दिल्लीत आहेत, अशी टिप्पणी काँग्रेसच्या एका नेत्याने यावरून केली आहे. सपकाळ यांच्या नजीकचे लोक टिपूच्या विधानावरून सपकाळ यांना खंत वाटत असल्याचे सांगतात. मात्र ‘बुंद से गई वो हौद से नही आती’ हेच खरे.