विद्वेषाचे विष आणि गढूळलेला शेजारधर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 07:26 IST2026-02-17T07:26:13+5:302026-02-17T07:26:39+5:30

बांगलादेश आणि भारत इतिहास-भूगोलाने बांधले गेले आहेत. एकजुटीने राहिले तर प्रगती, दळणवळण आणि स्थैर्याचे ते ऊर्जा केंद्र होऊ शकते.

Special editorial articles The poison of hatred and the muddled neighborliness | विद्वेषाचे विष आणि गढूळलेला शेजारधर्म

विद्वेषाचे विष आणि गढूळलेला शेजारधर्म

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार

दक्षिण आशियातील सत्तेच्या गणितात भूगोल ही नियती असते आणि स्मृती कधीच पुसता येत नाहीत. भारत बांगलादेशशी ४ हजार किलोमीटरच्या सीमेने बांधलेला आहे. बांगलादेश हा भारताचा केवळ शेजारी नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेचा भोज्या. पन्नासेक कोटी लोकांच्या ताटात अन्न वाढणाऱ्या जलसंपदेचा तो रखवालदार आहे. भारताची कूटनीतीतील चपळता, नैतिक सातत्य आणि डावपेचात्मक संयम याची परीक्षा हा देश सतत घेत असतो.

 गतसप्ताहात बांगलादेशात मोठी उलथापालथ झाली.  तारिक  रेहमान यांच्या बीएनपीने  २९९ जाहीर जागांपैकी २१२ जागा जिंकून २/३ बहुमत मिळवले. जेन-झीच्या उठावात शेख हसीना यांची राजवट उलथवून जन्माला आलेले मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालचे हंगामी सरकार इतिहासजमा झाले. ताज्या निकालाने कट्टरपंथीय पुरते गाडले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे वास्तव लगेच लक्षात घेऊन निकाल स्पष्ट होताच रेहमान यांचे अभिनंदन केले. लोकशाहीवादी, स्थिर आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या बांगलादेशबरोबर काम करण्याची इच्छा मोदींनी व्यक्त केली. वावड्यांचे रूपांतर संशयाच्या भोवऱ्यात होण्याच्या आधी पाणी शांत करण्याची ही भारतीय पद्धत होय.

हसीना प्रकरणानंतर देशात उसळलेल्या रानटीपणाला बांगलादेशातील जनतेनेच थंडपणे शह दिला. शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेश धार्मिक अल्पसंख्याकांचे शिरकाण करणाऱ्या दहशतवादी शक्तींच्या हातात गेला. पहिल्या १०० दिवसांतच हिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील २००० पेक्षा जास्त हल्ल्यांची नोंद जागतिक संस्थांनी केली आहे. संयुक्त राष्ट्रांकडून झालेल्या चौकशीत युनूस राजवटीचा बुरखा फाटला. हिंदू, अहमदिया आणि इतर काही देशी समूहांविरुद्ध ठरवून हल्ले झाल्याचे उघड झाले. विस्थापित कुटुंबे, भग्न मंदिरे आणि पुजाऱ्यांचे शिरकाण.. अशी दृश्ये भारतीय टीव्हीच्या पडद्यावर झळकली. त्यातून उभयपक्षी संबंधांत कडवटपणा आला. पंतप्रधान हसीना यांना भारताने आश्रय दिल्याने दरी आणखी रुंदावली.

 मात्र आई खालिदा झिया यांच्या मृत्यूनंतर १७ वर्षांनी लंडनहून बांगलादेशात परतलेल्या तारिक रेहमान यांनी आपण देशात शांतता, सार्वभौमत्वाची पुनर्स्थापना करण्यासाठी आलो आहोत असे चित्र उभे केले. एकीकडे त्यांचे हे सांगणे आणि जमातच्या राजवटीची भीती यामुळे चित्र बदलले.  सुरक्षा हवी असलेले अल्पसंख्याक, प्रतिष्ठा आणि नोकरी मागणारे तरुण, घराणेशाही आणि पाश्चात्त्य प्रभाव दोन्ही नको असलेले पुराणमतवादी मुस्लिम असे सगळे एकत्र येण्याचा परिपाक म्हणजे हा निकाल होय. अर्थात कट्टरपंथीयांचे आव्हान पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही. सगळ्यात वाईट म्हणजे भारताच्या सीमेलगतच्या मतदारसंघात त्यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला. या भौगोलिक केंद्रीकरणामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते.

आपण कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करू, सर्व धर्मीयांची पूजास्थाने सुरक्षित राहील, राहतील हे रहमान यांचे वचन आहे. भारतासाठी एवढे पुष्कळ झाले. हिंदूंच्या कत्तलीमुळे परस्पर सामंजस्यावर आघात झाला होता. हसीना यांना दिलेला आश्रय  योग्य असला तरी भारताला शत्रुपक्ष म्हणून रंगवले गेल्याने उभयपक्षी संबंध बिघडले, पाणीप्रश्नावरील बोलणी अडली, सांस्कृतिक बहिष्कार सुरू झाले. बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने तर टी-ट्वेंटी वर्ल्डकपसाठी भारतीय भूमीवर न खेळण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी क्रिकेट हा पूल होता; त्याची आता रणभूमी झाली. असे असले तरी रेहमान यांना मिळालेला कौल उचलून धरून मोदी यांनी सगळे ठीकठाक करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

नवीन नेतृत्व कसे वागते हा भारताच्या दृष्टीने निर्णायक मुद्दा आहे. रेहमान अल्पसंख्याकांना संरक्षण देतात का? अत्याचार पीडितांना न्याय मिळतो का? भारतविरोधी बंडखोरांच्या मुसक्या ते आवळतात का? हे महत्त्वाचे असेल. 

येणारा काळ हा प्रागतिक नेतृत्वाचा, व्यापार, ऊर्जा आणि दळणवळण तसेच सीमा सुरक्षा वाढवणारा असण्याची गरज आहे. तडजोड करता येणार नाही अशा तीन विषयांवर संबंध अवलंबून राहतील. पहिले म्हणजे रेहमान यांनी जहाल घटकांशी संबंध तोडले पाहिजेत, भारतीय बंडखोरांना आश्रय देता कामा नये, याशिवाय परस्परांचा धोरणात्मक आणि आर्थिक लाभ होईल अशा रीतीने दोन्ही देशांत देवघेव व्हायला हवी. सीमेवरील संघर्षाने परस्पर संबंधात विष कालवले आहे. अंतिमत: बांगलादेशने आपली सर्व ओळख आत्मविश्वासाने मिळवली पाहिजे. त्याचप्रमाणे भारताची या प्रदेशातील मोलाची भूमिका मान्य केली पाहिजे.

दोन्ही देश इतिहास आणि भूगोलाने बांधलेले आहेत. कधीही न संपणाऱ्या संघर्षाचा पाकिस्तानी मार्ग बांगलादेशने फेटाळला पाहिजे. या रस्त्याने गेलेला दुराभिमानी देश असफल तर झालाच, पण भिकारी होऊन बसला. परदेशी मदतीसाठी त्याला सतत हात पसरावे लागतात. बांगलादेश आणि भारत हे दोन्ही देश एकजुटीने राहिले तर प्रगती, दळणवळण आणि स्थैर्याचे ते ऊर्जा केंद्र होऊ शकते.

Web Title : बांग्लादेश चुनाव: नया नेतृत्व, भारत की चिंताएं, और पड़ोसी संबंध।

Web Summary : बांग्लादेश चुनाव से नया नेतृत्व आया है, जिससे भारत स्थिर संबंधों को प्राथमिकता दे रहा है। अल्पसंख्यक सुरक्षा, भारत विरोधी गतिविधियों पर अंकुश और आर्थिक सहयोग पर ध्यान केंद्रित है। एकजुट मोर्चा क्षेत्रीय प्रगति का वादा करता है।

Web Title : Bangladesh election: New leadership, India's concerns, and neighborhood relations.

Web Summary : Bangladesh's election brings new leadership, prompting India to prioritize stable relations. Focus remains on minority protection, curbing anti-India activities, and fostering economic cooperation. A united front promises regional progress.