विद्वेषाने आंधळे झालेल्यांना शहाणपण कसे यावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 06:05 IST2026-02-18T06:04:29+5:302026-02-18T06:05:42+5:30

एखाद्या वेळेस ससा बैलाएवढा होऊन त्याला मोठी शिंगे येतील; पण विद्वेषाने ग्रासलेल्या जगभरातील अतिरेकी लोकांना विवेक सुचणार नाही!

Special editorial articles How can those blinded by hatred gain wisdom? | विद्वेषाने आंधळे झालेल्यांना शहाणपण कसे यावे?

विद्वेषाने आंधळे झालेल्यांना शहाणपण कसे यावे?

कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार-संपादक

राज्यसभेचे माजी सदस्य

राज कपूरचा जन्म पेशावरमधला; विनोद खन्नाचाही! सुनील दत्तचा झेलममधला (पंजाब, पाकिस्तान); यश चोप्रा लाहोरमध्ये जन्मले. असे अनेकजण फाळणीपूर्व पाकिस्तानात जन्माला आले.  डॉ. मनमोहन सिंग, इंदरकुमार गुजराल, गुलझारीलाल नंदा आणि अर्थातच लालकृष्ण अडवाणी या भारताच्या राजकारणातील अनेक उच्चपदस्थांचा जन्मही तिकडलाच! हे सर्व जन्माने हिंदू. (मनमोहन सिंग, शिख). तेव्हा ओळख धर्माने व्हायची नाही. अगदी १८५७च्या बंडात हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढले ! त्यानंतर ९० वर्षांनी फाळणीच्या वेळेस हिंदू-मुसलमानांच्या रक्तरंजित नरसंहारात कित्येक लाख हिंदू आणि मुसलमान ठार मारले गेले. पण, त्या काळातही जेवढा विद्वेष हिंदू-मुस्लिमांमध्ये नव्हता, तेवढा आज आपल्याला दिसतो. अगदी अलीकडच्या इतिहासातील सर्व संदर्भ पुसले जाऊन मानसिक पातळीवर पुन्हा फाळणी झालेली आपण पाहत आहोत.

काही वर्षांपूर्वी एका विद्वान गृहस्थांनी जाहीरपणे असे म्हटले होते की, पाकिस्तानावर अणुबॉम्ब टाकून तो देशच नकाशावरून पुसून टाकायला हवा. अण्वस्त्रांमुळे जे विषारी वायू हवेत पसरतात, त्यांना भारत-पाकिस्तान-बांगलादेश-म्यानमार-अफगाणिस्तान यांच्या भौगोलिक-राजकीय सीमा कळणे शक्य नाही. पाकिस्तान नष्ट करण्यासाठी जर अणुबॉम्ब टाकला तर विध्वंस आजूबाजूला पसरणार, म्हणजे भारतातही. वाजपेयी पंतप्रधान असताना १९९८ मध्ये भारताने अण्वस्त्र चाचण्या केल्या, तेव्हा दिल्लीतील भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लगेच पाकिस्तानला इशारा देऊन टाकला, ‘लक्षात ठेवा, आता तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे!’ या महाशयांना साधा भूगोलही माहीत नव्हता.

विद्वेषाने अंध झालेल्या अशाच एका विद्वान गृहस्थांना एका मुलाखतीत विचारले गेले, भारताने अणुबॉम्ब टाकला, तर पाकिस्तानचे सुमारे २५ कोटी लोक मरतील, तर भारतातले लोकही किमान तेवढेच मरतील, त्याचे काय? (शिवाय पाकिस्तानाकडेही अण्वस्त्रे आहेतच.) ते गृहस्थ लगेच म्हणाले, ‘काही बिघडत नाही. भारतातले जरी २५ कोटी लोक मेले तरी शंभर-सव्वाशे कोटी वाचतील, कारण आपली लोकसंख्या प्रचंड आहे, पण निदान पाकिस्तान तर नष्ट होईल!’

अर्थातच असे महामूर्ख आणि द्वेषांध जगभरात आहेत. त्यांना या ना त्या धर्माचे अस्तित्वच जगाच्या नकाशावरून पुसून टाकायचे आहे. या असल्या धर्मांध हाहाकाराचे काय परिणाम होतील याची कल्पनाही करता येणार नाही. एका काव्यशास्त्र विनोदात म्हटल्याप्रमाणे एखाद्या वेळेस ससा बैलाएवढा होऊन त्याला मोठी शिंगे येतील, सापाला दूध दिले तर विष होणार नाही, वाघ पूर्ण शाकाहारी होईल, पण अस्सल मूर्खाला अक्कल येणे शक्य नाही!

लोकसंख्येचा अभ्यास करणारे तत्त्वज्ञ- संशोधक अलीकडे असे मानतात की, जगाची लोकसंख्या अगदी कितीही वाढली तरी ती दहा अब्जाच्या वर जाणार नाही. (काहींच्या मते ९ अब्जावर स्थिरावेल.) शिवाय ही स्थिती सर्व देशांमध्ये आहे. अनेक पाश्चिमात्य (ख्रिश्चन) देशांत लोकसंख्यावाढीचा दर कमी होत आहे. अशा सर्वेक्षणात आता असे आढळून येते, की मुस्लीम धर्मीय मोठ्या प्रमाणात कुटुंब नियोजन करीत असल्यामुळे त्यांच्या वाढीचा दरही कमी होत आहे.

परंतु, अशा संख्याशास्त्राच्या पुराव्यांनी विद्वेषाचे प्रमाण कमी होत नाही. आज जगात सर्वत्र विद्वेषी मानसिकता पसरली आहे आणि पसरते आहे. त्यातूनच संघर्ष, दंगेधोपे, खून, मारामाऱ्या आणि अर्थातच लहानमोठी युद्धे होत आहेत. इस्रायलने गाझा पट्टीत अक्षरश: नरसंहार चालविला आहे. ही बाब तर फारच विरोधाभासी आणि हिंस्र आहे. हिटलरने जगातून तमाम ज्यू मारून टाकायची योजना केली होती. जर्मनीत त्याने ६० लाख ज्यूंचे हत्याकांड केले आणि पोलंड, इटली, फ्रान्स, स्पेन इत्यादी देशांत तसा प्रयत्न केला. म्हणजेच विलक्षण अशा अमानुषतेचा अनुभव ज्या ज्यू समाजाने घेतला आहे, तेच ज्यू आता पॅलेस्टिनिअन अरबांचे भयानक हत्याकांड करीत सुटले आहेत. त्यांच्यातील काही अतिरेकी ज्यू (झायोनिस्ट) यांना अरब आणि इतर मुस्लीम या भूतलावरून नष्टच करायचे आहेत. धर्मवादाचा अतिरेक असो वा राष्ट्रवादाचा, पंथवादाचा वा कोणत्याही अस्मितावादाचा;  त्याचा मुख्य गुणधर्म विद्वेष हाच आहे.

चर्चा-परिसंवादात वा भाषणांमध्ये मात्र सांगितले जाते की, सर्व धर्मांची शिकवण मानवतावादाची आहे. प्रेम आणि करुणा सर्व धर्मांचा आधार आहे. आजही आपण भारतीय ‘वसुधैव कुटुंबकम’च्या गोष्टी करतो आणि त्या कुटुंबातून विशिष्ट धर्मांना हद्दपार करतो. हे आपल्याच मनातील विद्वेषाचे विष झाकण्यासाठी  उदात्ततेचा आविर्भाव आणणे होय!

आफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ मध्ये फक्त १०० दिवसांत अतिरेकी तुत्सुंनी हुतू जातीच्या समाजातले दहा लाख लोक मारून टाकले. अतिशय क्रूरपणे. बॉम्ब वगैरे टाकून नव्हे, तर कुऱ्हाडी, कोयते, तलवारींनी माणसांचे तुकडे-तुकडे करून! ते हत्याकांड गाझासारखे टीव्हीवर दिसले नाही, तरी जगाला पूर्ण ज्ञात होते. कुणीही ते थांबवू शकले नाही. म्हणूनच गांधीजी म्हणत, अवघ्या मानवजातीचा एकच शत्रू आहे- विद्वेष ! तो धर्म, देश, देव, परंपरा, भाषा सगळ्यांच्या पलीकडे आहे.

Web Title : घृणा से अंधे हुए लोगों को ज्ञान कैसे प्राप्त हो?

Web Summary : घृणा विश्व स्तर पर संघर्षों को बढ़ावा देती है, जैसा कि इज़राइल-गाजा संघर्ष और ऐतिहासिक नरसंहारों में देखा गया है। मानवता के साझा मूल्यों के बावजूद, पूर्वाग्रह बना रहता है, जो शांति में बाधा डालता है। घृणा पर काबू पाना, जो कि वास्तविक शत्रु है, विभाजनों से ऊपर उठना आवश्यक है।

Web Title : How to enlighten those blinded by hatred and prejudice?

Web Summary : Hatred fuels conflict globally, exemplified by the Israel-Gaza conflict and historical genocides. Despite humanity's shared values, prejudice persists, hindering peace. Overcoming hatred, the true enemy, requires transcending divisions.