शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: शरद पवार आणि राज ठाकरेंना मराठी मनाचा शोध लागेल?

By रवी टाले | Updated: January 21, 2026 11:27 IST

शरद पवार आणि राज ठाकरेंसाठी नव्याने अवकाश निर्माण करणे कठीण, पण अपरिहार्य आहे; अन्यथा, दोघेही राजकीय इतिहासातील महत्त्वाचे अध्याय ठरतील.

रवी टाले, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

राजकारणात काही व्यक्ती संस्था बनतात. त्यांची उपस्थिती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहात नाही, तर समीकरणे त्यांच्या भोवती फिरतात. असे नेते निवडणूक जिंकतात म्हणून महत्त्वाचे ठरत नाहीत, तर ते राजकारणाची दिशा बदलतात म्हणून इतिहासात नोंदले जातात. शरद पवार आणि राज ठाकरे हे त्याच वर्गातील नेते! राज ठाकरे यांच्या नावावर निवडणुकांतील नेत्रदीपक यशाची नोंद भले नसेल; पण प्रत्येक निवडणुकीत त्यांची चर्चा होतेच! नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनी त्या दोघांचाही राजकीय प्रवास एकाच टप्प्यावर आणून सोडल्याचे चित्र दिसते आणि तो टप्पा आहे अनिश्चिततेचा!

शरद पवार केवळ एक नेता नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, दिल्लीतील राजकारणात दबदबा आणि राज्यात जातीय, सामाजिक समतोल साधत सत्ता टिकवण्याची कला, हे केवळ पवारच करू शकतात. सहकार, ग्रामीण अर्थकारण, साखर उद्योग, शिक्षणसंस्था आणि दिल्लीतील सत्ताकेंद्रांशी असलेल्या सलगीच्या बळावर त्यांनी अनेकदा थेट सत्तेत सहभागी नसतानाही सत्ता नियंत्रित केली. परंतु, २०२३नंतरच्या घडामोडींनी या युगाचा शेवट जवळ आल्याचे संकेत दिले. ताज्या महापालिका निवडणूक निकालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले की काय, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.   

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन केवळ पक्षफूट नव्हे, तर पवारांच्या राजकारणातील निर्णायक वळण ठरले. ते केवळ पक्षांतर्गत बंड नव्हते तर तो पवारांच्या राजकीय मॉडेलचा पराभव होता. त्यांनी कुटुंब, संस्था आणि निष्ठावान नेत्यांच्या बळावर स्वत:चे साम्राज्य उभे केले. पण, त्याच संरचनेतून त्यांना सर्वांत मोठा धक्का बसला. आज शरद पवारांकडे वैयक्तिक करिश्मा आहे, वैचारिक स्पष्टता आहे, अनुभव आहे; पण नाही ती संघटनात्मक धार! त्यांचे सर्वांत मोठे बलस्थान म्हणजे व्यापक संपर्क आणि राजकीय अनुभव! पण आज युवावर्गासाठी पवारांचे राजकारण केवळ स्मरणरंजन ठरत आहे, प्रेरणा नाही. शहरी मध्यमवर्गात त्यांची प्रतिमा ‘चाणाक्ष, पण जुन्या पिढीतील नेते’ इतकीच उरली आहे. पवारांपुढील खरे आव्हान राजकीय वारसा टिकवणे हे आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे दिल्लीत स्वीकारार्हता आहे; पण महाराष्ट्रात संघटना नाही. पक्ष टिकवायचा असेल तर पवारांना नव्या पिढीला निर्णयाधिकार द्यावा लागेल. त्यांचे राजकारण समजूतदार, समन्वयवादी आणि चर्चेवर आधारित आहे. मात्र, त्यांच्या दुर्दैवाने आजच्या मतदाराला ध्रुवीकरण, ठाम भूमिका आणि स्पष्ट शत्रू-मित्र समज अधिक भावते.

शरद पवारांच्या तुलनेत राज ठाकरे यांचा प्रवास वेगळा. पण त्यांच्यापुढील पेचही तितकाच गंभीर आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत प्रभावी वक्त्यांपैकी एक! त्यांची भाषणशैली, मुद्देसूद मांडणी आणि व्यंगात्मक टीका आजही श्रोत्यांना खेचते. शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन करताना दिसलेली त्यांची ऊर्जा आजही पूर्णतः संपलेली नाही. मात्र, त्यांचे राजकारण कायमच ‘इव्हेंट-बेस्ड’ राहिले आहे. एखादा मुद्दा, एखादी लाट, एखादा भावनिक उद्रेक आणि त्यानंतर दीर्घकाळ शांतता! सातत्याने संघटन वाढवणे, स्थानिक नेतृत्व घडवणे आणि निवडणूक व्यवस्थापन, याबाबतीत ते कमी पडले आहेत. त्यांच्या बाबतीत सर्वांत मोठा प्रश्न आहे भूमिकेतील सातत्याचा! कधी आक्रमक मराठी अस्मिता, कधी हिंदुत्वाकडे झुकाव, कधी भाजपविरोध, तर कधी अप्रत्यक्ष सहमती, अशा सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे त्यांचे कट्टर समर्थकही संभ्रमित होतात. त्यांचे विचार ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, मत देणाऱ्यांची संख्या मर्यादित! ते कधीच सत्तेचे राजकारणी झाले नाहीत आणि आज त्याची किंमत मनसेला मोजावी लागत आहे. निवडणुकांतील अपयशामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणि त्यातून संघटनात्मक गळती हे दुष्टचक्र सुरूच आहे. तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरेंशी जुळवून घेत मुंबई महापालिका निवडणूक लढवूनही पदरी दारुण अपयश आल्याने गळतीच्या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

गत काही काळापासून सातत्याने घसरण सुरू असली आणि महापालिका निवडणूक निकालांनी कळस गाठला गेल्याचे भासत असले, तरी शरद पवारांचे राजकारण संपले म्हणणे घाईचे ठरेल. पण, ते यापुढे  निर्णायक भूमिका बजावू शकतील का, याबाबत मोठी शंका आहे. ते मार्गदर्शक किंवा समन्वयक म्हणून महत्त्वाचे राहू शकतात. मात्र, यापुढे सत्ता त्यांच्या भोवती फिरणार नाही ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे, राज ठाकरेंनी ठाम भूमिका आणि दीर्घकालीन रणनीती न स्वीकारल्यास, त्यांचे राजकारण फक्त भाषणांपुरते उरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन शक्तीसमीकरणे आकारास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार आणि राज ठाकरेंसाठी नव्याने अवकाश निर्माण करणे कठीण; पण अपरिहार्य आहे, अन्यथा दोघेही राजकीय इतिहासातील महत्त्वाचे अध्याय ठरतील. पण, वर्तमानातील निर्णायक घटक राहणार नाहीत. आठ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मुलाखत घेऊन शरद पवार नावाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला होता. आज काळाने त्या दोघांवरही मराठी मनाचा नव्याने शोध घेण्याची पाळी आणली आहे.

ravi.tale@lokmat.com

English
हिंदी सारांश
Web Title : Will Sharad Pawar and Raj Thackeray rediscover the Marathi mind?

Web Summary : Pawar and Thackeray face uncertainty. Pawar's era nears its end. Thackeray struggles with inconsistent stances. Both need new strategies or risk becoming history.
टॅग्स :marathiमराठीRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवार