विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?

By विजय दर्डा | Updated: April 13, 2026 07:23 IST2026-04-13T07:21:42+5:302026-04-13T07:23:33+5:30

US-Israel-Iran War Update: इराण-अमेरिका चर्चेत पाकिस्तानचा कोणताही राजनैतिक विजय झाला नाही. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी केवळ पोस्टमनची भूमिका निभावली..

Special Article: Why so much confusion and uproar over Pakistan's stance? | विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?

विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?

- डाॅ. विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

सारे जग श्वास रोखून बसले होते. ७ एप्रिलची संध्याकाळ. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, होर्मुझ खुले झाले नाही तर इराणी संस्कृतीसाठी आजची रात्र शेवटची असेल. परंतु त्यानंतर काही तासातच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घोषणा केली की, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला आहे. ट्रम्प यांनी पवित्रा बदलला आणि समाजमाध्यमांवर दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली. 

लगोलग पाकिस्तानची तारीफ होऊ लागली. हे अनपेक्षितच होते. भारतात नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांच्या हाती तर जॅकपॉटच लागला. अशा प्रकारचा समझोता भारत का करू शकला नाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पाकिस्तानने फार मोठा राजनैतिक विजय मिळवला असून, भारताला त्यामुळे मोठा धक्का बसला आहे, अशा प्रकारची विधाने वाचून मी वैतागलो. परराष्ट्रांशी संबंधित गोष्टींकडेही राजकारणाच्या दृष्टीने पाहणे उचित होईल का? पाकिस्तान मध्यस्थ का झाला? आणि भारताला यामध्ये काही करण्यासारखे काय होते?.. या मुद्द्यांचे विश्लेषण व्हायला नको का? अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धात भारताला काही विशेष भूमिका होती असे मला वाटत नाही. 

भारत हा कोणापुढेही शेपूट हलवत फिरणारा देश नाही, हे अमेरिकेला ठाऊक आहे.  विचारपूर्वक आणि सत्य तेच बोलणारा मध्यस्थ अमेरिकेला नकोच होता. अमेरिकेसाठी पाकिस्तान हाच एक असा देश होता की जो कितीही अविश्वसनीय आणि धोकेबाज असला तरी अमेरिकेचीच भाषा बोलेल आणि ऐकून घेईल. 

पाकिस्तानने ट्रम्प यांना शांतिदूत म्हणून टाकले आणि शांततेचे नोबेल देण्याची शिफारसही केली. असा मित्र कुठे मिळेल? याशिवाय इराणबरोबर पाकिस्तानची जवळपास ९०० किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे इराणने त्याला संदेशवाहक म्हणून स्वीकारले.  चीनचीही अशी इच्छा होती की बोलणी पाकिस्तानातच व्हावी. यासाठीच पाकिस्तान समोर आला. एरवी अमेरिकेला आणि इराणलाही कुठल्याही गोष्टी पटवून देऊ शकेल अशी या देशाची लायकी तरी आहे का? पाकिस्तान केवळ एका पोस्टमनच्या भूमिकेमध्ये आहे. इस्लामाबादमध्ये बैठक आयोजित केल्याची योग्य ती किंमत पाकिस्तानला भविष्यात मिळेलच.

तसे पाहता पाकिस्तानला यावेळी मदतीचीही अत्यंत गरज आहे. कारण संयुक्त अरब अमिरातीने ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज आणि अनामत परत करण्यास सांगितले आहे. हे कर्ज पाकिस्तानच्या विदेशी चलनाच्या साठ्याच्या सुमारे १८ टक्के आहे. 

कर्जाला मुदतवाढ मिळावी अशी पाकिस्तानची इच्छा होती. केवळ व्याज देत राहून काम चालू राहील असे वाटत होते. परंतु अनेक मिनतवाऱ्या करूनही अमिरातीने ऐकले नाही. संयुक्त अरब अमिरातीने भारताच्या चिथावणीमुळे हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. 

पाकिस्तानचे सिनेटर मुशाहिद हुसेन यांनी खुद्द अमिरातीला असा सल्ला दिला की, तुमच्याकडे ४३ लाख भारतीय आहेत. या वाढत्या मैत्रीमुळे तुम्हीही अखंड भारताचे हिस्सा होऊन जाणार नाही ना हे एकदा पाहा!. - मुशाहिद हुसेन हे बकवास करत आहेत. भारताने ‘वसुधैव कुटुंबकम’ची नीती अवलंबिली आहे. आणि भारताची मनापासून  इच्छा आहे की शेजारी पाकिस्ताननेही फळावे-फुलावे. परंतु पाकिस्तान एकीकडे हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरतो आणि दुसरीकडे दहशतवादाचे कारखाने चालवतो. 

मुशाहिद हुसेन यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की, पाकिस्तानने अलीकडेच सौदी अरेबियाशी संरक्षणविषयक करार केला. या करारामुळे संयुक्त अरब अमिरात नाराज झाली नसेल का? इराणने सर्वात मोठा हल्ला अमिरातीवर केला. २ हजारपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे त्या देशावर डागली. परंतु युद्धविरामाच्या बोलण्यात अमिरातीला सामील करून घेतले गेले नाही. यामुळे अमिरातीने युद्धविरामाची तारीफ तर केली; परंतु पाकिस्तानचे नावही घेतले नाही.  मुशाहिद हुसेन, हे लक्षात ठेवा की अमिरात विशाल अंत:करणाचा देश आहे, जो आपल्या देशात मंदिर उभारण्याचीही परवानगी देतो. 

युद्धविरामाच्या घोषणेची तारीफ करताना बांगलादेशनेही पाकिस्तानचे नाव घेतले नाही. म्हणजे भारताने त्या देशाला तसे सांगितले होते काय? -तर नाही. आपण पाकिस्तानच्या बाजूने झुकलो तर बरबादी निश्चित आहे, याची बांगलादेशच्या नव्या सरकारला जाणीव आहे. पाकिस्तानने मोहम्मद युनूस यांच्या माध्यमातून बांगलादेश कट्टरपंथी राहावा असे प्रयत्न केले होते; परंतु त्यांचा राक्षसी आनंद टिकला नाही. बांगलादेशच्या जनतेने लोकशाहीचा रस्ता स्वीकारला. 

बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारीख रहमान उदारमतवादी आणि लोकशाही विचारांचे आहेत. त्यांचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर खलीलूर रहमान यांनी अलीकडेच भारताचा दौरा केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली.  दुसऱ्या दिवशी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याबरोबरही त्यांची चर्चा झाली. शिवाय, जयशंकर यांच्याबरोबर एकाच विमानातून ते मॉरिशसला रवाना झाले. 

दोन्ही देशांच्या मंत्र्यांमध्ये अशा प्रकारे बोलणी झाल्याने पाकिस्तान संत्रस्त झाला. परंतु दोन्ही देशांनी मौन राखले आहे. बांगलादेश आणि भारत पुन्हा एकदा चांगल्या नातेसंबंधांच्या रस्त्यावर पुढे निघाले आहेत. आता पाकिस्तान त्यामुळे आतून जळू लागला तर आपण काय करणार? जळणे त्याच्या नशिबातच आहे;  तर त्याने जळत राहावे!

Web Title : पाकिस्तान की भूमिका: भ्रम और हंगामा क्यों, सरल स्पष्टीकरण

Web Summary : अमेरिका और ईरान के बीच पाकिस्तान की मध्यस्थता ने बहस छेड़ दी। आलोचकों ने भारत की अनुपस्थिति पर सवाल उठाया, जबकि अन्य ने पाकिस्तान को केवल एक संदेशवाहक के रूप में देखा, जो वित्तीय परेशानियों और भारत और अन्य देशों के साथ क्षेत्रीय तनाव के बीच स्थिति से लाभान्वित हो रहा है।

Web Title : Pakistan's Role: Why the Confusion and Uproar Explained Simply

Web Summary : Pakistan's mediation between the US and Iran sparked debate. Critics questioned India's absence, while others saw Pakistan as a mere messenger, benefiting from the situation amid financial troubles and regional tensions with India and other countries.