विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 07:11 IST2025-09-13T07:08:50+5:302025-09-13T07:11:34+5:30

Gen z: नेपाळमध्ये सरकार उलथवून टाकणारी ‘जनरेशन झेड’ सध्या विशेष चर्चेत आहे. या पिढीच्या वाट्याला आलेला वर्तमान, त्यातल्या घुसमटीची कारणे काय आहेत?

Special Article: Who put this agony in the head of ‘Gen Z’ of Nepal? | विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 

विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 

-मुक्ता चैतन्य, समाजमाध्यमांच्या अभ्यासक
‘जेन झी’ म्हणजे जनरेशन झेड. साधारण १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली, तंत्रज्ञानाबरोबरच वाढलेली पहिली पिढी. ज्यांचं ‘बेबीसिटिंग’ही डिजिटल होतं. टीव्हीसमोर नाक लावून बसलेल्या पिढीतल्या पालकांची ही मुलं.  मोबाइल, टीव्ही, टॅब आणि गेमिंग गॅजेट्सबरोबरच ती वाढली. त्यामुळे सोशल मीडियाशी त्यांचा संबंध केवळ मनोरंजनापुरता नाही; तर तो स्व-ओळख, मैत्री, शिक्षण, करिअर, काम, प्रेम, सेक्स, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये विणला गेलेला आहे. 

ही पिढी कौटुंबिक व सामाजिक बदलांच्या काळात मोठी झाली. मध्यमवर्गीय घरांतील स्पर्धा, ‘जाल तिथे/ त्याच्यात टॉप करायलाच हवं’ हा दबाव, बेरोजगारीची तीव्र समस्या आणि विविध युद्धांच्या निमित्ताने जगभर सतत दिसणारी अस्थिरता. परिणामतः या पिढीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. योलो (यू ओन्ली लिव्ह वन्स) सारख्या संकल्पना म्हणूनच जोर धरताना दिसतात. त्यातून ‘लाइक्स-व्ह्युज-फॉलोअर्स’ हे त्यांच्या प्रयत्नांचं मोजमाप बनतं. 

अल्गोरिदमने रचलेल्या फीडमध्ये त्यांना लहान-लहान ‘डोपामीन रिवॉर्ड्स’ मिळतात. कधी अनपेक्षितपणे, कधी मोठ्या प्रमाणात. हाच ‘व्हेरिएबल रिवॉर्ड’ (म्हणजे बक्षीस मिळण्याची वेळ व प्रमाण अनिश्चित ठेवणारे डिझाइन, ज्यामुळे मेंदू उत्सुक राहून आपण पुन्हा पुन्हा ॲप/फीड तपासत राहतो.)चा खेळ फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) वाढवतो आणि अवलंबित्वाकडे घेऊन जातो. 

या पिढीला समजून घ्यायचं तर माणूस आणि तंत्रज्ञान यांचे परस्पर संबंध समजून घेणं महत्त्वाचं. अल्गोरिदमने ठरवल्यानुसार आपली मतं, आवडी, ओळखी फीडमध्ये परत परत दिसत राहतात, हे झालं तांत्रिक; पण ‘जेन झी’ पिढीतले अनेकजण या अलगोरिदम्सना वळसे घालायला आणि त्यापलीकडे जाऊन जगभर, देशभर, गल्लीत काय सुरू आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करतात. 

सोशल मीडियाने या पिढीवर ‘पर्सनल ब्रँड’ तयार करण्याचा प्रचंड दबाव निर्माण केलेला आहे. इन्फ्लुएन्सर्स मार्केटचा हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम. कंटेंट निर्माते व्हा, सातत्य ठेवा, एंगेजमेंट वाढवा, त्यासाठी त्यात वैविध्य ठेवा याचं तुफान प्रेशर प्रत्येकावर आहे. 

आपला समाज माध्यमशिक्षित नसल्याने निवड कशी करायची, याबाबत अनेकदा प्रचंड संभ्रम असतो आणि माहितीपूर्ण निवडीपासून माणसं दूर जातात. आपण खरंच कोण आहोत, आपल्या क्षमता काय आहेत, हे दाखवून कनेक्शन्स तयार करण्याची शक्यता असलेले हे प्लॅटफॉर्म्स आहेत; पण माणसं हीच महत्त्वाची गोष्ट ‘एडिट’ करून टाकतात. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे, असं आपण मानतो; पण सोशल मीडियावर गेल्यानंतर मात्र एकमेकांच्या आवृत्त्या बनवण्यात अडकतो. ‘जेन झी’ही यातून सुटलेली नाही. 

या पिढीसमोर पुढचे अनेक प्रश्न हे सोशल मीडियाशी जोडलेले आहेत. माहितीचा प्रचंड पुरवठा; पण त्या माहितीचं करायचं काय हे ठाऊक नाही. मिळालेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवण्याचं प्रमाणही पुष्कळ.  डिजिटल अर्थव्यवस्थेत ‘क्रिएटर इकोनॉमी’ संधी देते; पण अस्थैर्यही सोबत घेऊन येते. 

वैयक्तिक माहितीच्या खासगीपणावर (प्रायव्हसी) होणारं अतिक्रमण, वैयक्तिक माहितीचा बाजार, लक्ष-अर्थव्यवस्थेची (attention economy) राजकारणाशी असलेली सांगड हे सगळं ‘जेन झी’च्या नशिबी आहे. एकीकडे संधी, दुसरीकडे पैसा, तिसरीकडे त्या सगळ्यातून येणारी अस्वस्थता आणि चौथीकडे त्यावरचं अवलंबित्व आणि त्यातून व्यसन अशी विचित्र गुंतागुंत झालेली आहे. 

‘एंडलेस स्क्रोल’, ‘ऑटो प्ले’, ‘पुश नोटिफिकेशन्स’, ‘कॅन्सल’ कल्चरची भीती, फोमो आणि अभिव्यक्तीचं महत्त्वाचं माध्यम यांसारख्या डिझाइनमध्ये असलेल्या गोष्टींमुळे माणसं दीर्घकाळ सोशल मीडियाला चिकटून राहतात. त्यातही या पिढीबाबत वाढीच्या वयातच कोरोना कृपेने सगळं ऑनलाइन गेल्याने तंत्रज्ञानाशी असलेलं त्यांचं नातं अधिकच घट्ट झालं. ही पिढी खऱ्या अर्थाने हायब्रीड आयुष्य जगते आहे. अशी जीवनशैली जी मानवी उत्क्रांतीच्या ज्ञात प्रवासात कुणीही जगलेलं नाही. 

आभासी आणि प्रत्यक्ष जगण्याचा एकत्रित अनुभव माणसासाठी नवाच आहे. माणूस माहिती कशी गोळा करतो, त्या माहितीचं विश्लेषण तो कसं करतो, ती माहिती साठवतो आणि वापरतो कशी, यातही बदल होताना दिसता आहे. माहिती मिळवल्यापासून व्यक्त होण्यापर्यंत सगळ्याच टप्प्यात कमी-अधिक बदल होत आहेत आणि ‘जेन झी’ पिढीत हे बदल  ठळकपणे दिसत आहेत. त्यांची भाषा बदलते आहे, त्यांचे शब्द निराळे आहेत, त्यांचे अर्थ निराळे आहेत, अभिव्यक्त होण्याच्या त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. 

मागच्या पिढ्यांनी तयार केलेल्या या व्यसनाभिमुख जगात ही पिढी स्वतःला फिट्ट बसवण्याची धडपड करते आहे. त्यासाठी सगळं ढवळून काढण्यावाचून या पिढीला पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा जगण्यातला हस्तक्षेप वाढणार आहे. त्याचा सगळ्यात जास्त परिणाम आणि प्रभाव ‘जेन झी’ आणि येणाऱ्या पिढ्यांना सोसावा लागणार आहे. ‘जेन झी’ पिढीचं सोशल मीडियाशी नातं ‘बिघडलेलं’ नाही, तर ते ‘गुंतागुंतीचं’ आहे. ही गुंतागुंत माणूस आणि तंत्रज्ञान यांच्या परस्परपूरकतेची, सहजीवनाची आणि संबंधांची आहे.
cybermaitra@gmail.com

Web Title: Special Article: Who put this agony in the head of ‘Gen Z’ of Nepal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.