विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!

By यदू जोशी | Updated: August 29, 2025 10:21 IST2025-08-29T10:20:15+5:302025-08-29T10:21:42+5:30

Maharashtra Political Update: राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत जाणार असे चित्र असताना ते फडणवीस यांच्याही तितक्याच संपर्कात असतात. पक्ष म्हणून भाजपचीही नक्की भूमिका कळत नाही!

Special Article: Uddhav-Raj and Fadnavis: Something is 'upside down'! | विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!

विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!

- यदु जोशी
सहयोगी संपादक, लोकमत

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'राज'कीय भेटी झाल्या, उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंकडे सहकुटुंब पोहोचले. काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गेले. फडणवीस-राज यांच्यात बंदद्वार चर्चा झाली, नेमके काय घडले असावे? एक मात्र नक्की. राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत जाणार असे चित्र असताना, ते फडणवीस यांच्याही तितक्याच संपर्कात असतात; यात काहीतरी मेख नक्की आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी महायुती-महाविकास आघाडीचे स्वरूप निश्चित होईल, तेव्हा ही मेख नेमकी काय होती, याचा अर्थ महाराष्ट्राला कळेल.

जातीय ध्रुवीकरणाच्या राजकारणाने सध्या पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. या ध्रुवीकरणाचे परिणामही आगामी निवडणुकांवर संभवतात. फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली म्हणून भाजपचे काही छोटे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका करत आहेत; पण चंद्रशेखर बावनकुळे ज्या पद्धतीने फडणवीसांसाठी ढाल बनले आहेत, तसा अन्य कोणी मोठा नेता समोर येताना दिसत नाही. पक्ष म्हणून भाजपची भूमिका नेमकी कळत नाही.

उपराष्ट्रपती निवडणूक : चमत्कार होईल का?
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला आहे. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे न्या. बी. सुदर्शन रेड्डी असा सामना होत आहे. महाराष्ट्राचा विचार करता उत्सुकता एकाच गोष्टीची आहे की, महायुतीकडे आहेत त्यापेक्षा अधिकची मते त्यांना मिळतील का? केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून फडणवीस यांनी एक धागा पकडला आहे, तो असा की, राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, ते इथलेच मतदारदेखील आहेत, एकप्रकारे ते महाराष्ट्राचेच आहेत आणि म्हणून प्रादेशिक अस्मितेची भाषा करणारे शरद पवार गट, उद्धवसेना यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा. 'आमचा इंडिया आघाडीचा उमेदवार आहे,' असे सांगत शरद पवार यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. रेड्डी शुक्रवारी 'मातोश्री'वर जातील, त्यानंतर ठाकरे त्यांना पाठिंबा जाहीर करतील असे दिसते.
या निवडणुकीत व्हिप नसतो. सदसद्विवेकबुद्धीने लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी मतदान करावे असे अपेक्षित असते. 'आपण चमत्कार करू शकतो' असे देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मधील राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिले होते. या चमत्काराची पुनरावृत्ती उपराष्ट्रपती निवडणुकीत होईल का, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्रात ३८ मते आहेत; तर महायुतीकडे २९ मते आहेत. आपला मतांचा आकडा वाढावा, हा देवेंद्र फडणवीस यांचा निश्चितच प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी काही खेळी खेळली तर कदाचित वेगळेही घडू शकेल. आपले एकही मत फुटता कामा नये यासाठी महाविकास आघाडीचे नेते अजूनही एकत्रित बसलेले नाहीत. तिकडे महायुती धक्का देण्याच्या तयारीत आहे.

भाजपचे काय चालले आहे?
'लाखमोलाच्या जनतेचा रविदादावर जीव हाय २... असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गुणगान गाणारं गीत गेल्या आठवडचात वारंवार वाजवलं जात होतं. लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाखो राख्या प्रदान करण्याचा समारंभ झाला तेव्हाचा हा प्रकार. मुंडे, गडकरी, फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा असं गीत नव्हतं; पण हा बदललेला भाजप आहे; आणखीही बदलत जाईल. व्यक्तिस्तोमाला थोडी सुरुवात आधीच झालेली होती, रवींद्र चव्हाण तो कॅन्व्हास मोठा करताना दिसतात. मुंबईचे अध्यक्ष असताना आशिष शेलार असे काही करत नसत. नवे अध्यक्ष अमित साटम हे पथ्य पाळतील अशी अपेक्षा आहे. साटम हे श्रीश्री रविशंकर यांचे भक्त आहेत. तणावमुक्त जीवन जगण्याची कला 'आर्ट ऑफ लिव्हिंग' श्रीश्री सांगत असतात. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपलाही अंतर्गत तणावमुक्तीची गरज आहे. साटम यांनी त्यासाठीचा फॉर्म्युला आणाता, शेलार है उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या सोडीचे वाटत होते. त्यामुळे त्यांची विधाने, प्रतिक्रियांना माध्यमे चांगली जागा देत असत. अमित साटम हे आदित्य ठाकरेंच्या तोडीचे वाटतात. त्यापेक्षा अधिकची उंची स्वतः गाठण्याची संधी मुंबई अध्यक्षपदाच्या रूपाने त्यांच्याकडे चालून आली आहे. साटम मराठी आहेत, मराठाही आहेत. मुंबईत काँग्रेस (वर्षा गायकवाड), मनसे (संदीप देशपांडे) आणि आता भाजप (अमित साटम) असे महत्त्वाच्या पक्षांचे चेहरे मराठीच आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबई अध्यक्ष, मुंबई प्रमुख वगैरे भानगढ़ सुरुवातीपासूनच नाही. मातोश्री' हे एकच पद त्या पक्षात आहे.

भजन आणि भोजन
भजनी मंडळांना यावेळी राजकीय नेत्यांकडून चांगली मदत झाली. सप्टेंबरमध्ये नवरात्रोत्सव आहे, अधिक चांगली वर्गणी मिळण्याची संधी मंडळांना असेल. सरकारही मेहरबान इथले आहे. राज्यातील १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपये असे एकूण साडेचार कोटी रुपये वाटण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाने हाती घेतले आहे. भजनसाहित्याच्या खरेदीस्वठी ही रक्कम दिली जात आहे, ती सरकारला परत करण्याची गरज नसेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भजनी मंडळांना खुश केले जात आहे. नवरात्रोत्सवात आणखी वेगळ्या मार्गाने खुश केले जाईल. १०० रुपयांत पाच खाद्यवस्तू देणारा 'आनंदाचा शिधा' मात्र यंदाच्या गणेशोत्सवात दिला गेला नाही. दिवाळीत तरी ती द्यावा, अशी अपेक्षा आहे. भजनापेक्षा भोजन महत्त्वाचे।
yadu.joshi@lokmat.com

  

Web Title: Special Article: Uddhav-Raj and Fadnavis: Something is 'upside down'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.