विशेष लेख: निरलस जीवनाचा सदाबहार आदर्श : प्रा. सदानंद वर्दे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:07 IST2025-11-06T11:06:46+5:302025-11-06T11:07:12+5:30
माजी शिक्षणमंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता. लोकसेवेच्या ध्यासाने जीवन व्यतीत केलेल्या सरांची आठवण.

विशेष लेख: निरलस जीवनाचा सदाबहार आदर्श : प्रा. सदानंद वर्दे
अनिल वासनिक, ज्येष्ठ पत्रकार, नागपूर
सरकार गडगडल्याबरोबर तत्काळ आपला मंत्र्याचा बंगला सोडून देत सरकारी गाडीही तिथल्या तिथेच सोडून आपली नेहमीची शबनम बॅग काखेत अडकवून एक माजी मंत्री पायी चालत थेट घराकडे निघून गेला, असे कोणी सांगितले तर आज कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण असे आदर्श कोणे एके काळी या महाराष्ट्र राज्यात होते.
राजकारणात राहूनही अतिशय साधे, सरळ, निरलस, स्वच्छ जीवन जगणारे असे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. सदानंद वर्दे. लोकशाहीवादी, समाजवादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, फर्डे वक्ते, सेवाभावी वृत्तीने जीवन जगणारा कार्यकर्ता, आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी त्यांची सर्वदूर ख्याती होती. आज हरप्रकारे निवडणूक जिंकून सत्तेत पद प्राप्त करणे, पुढील पाच वर्षे संपत्ती संग्रह करणे आणि लोकसेवेची कामे न करताच पैशांच्या जोरावर पुन्हा निवडणूक जिंकणे एवढाच लोकशाहीचा मर्यादित अर्थ उरलेला दिसतो. याच देशात स्वातंत्र्यानंतर असे अनेक नेते होते, ज्यांनी सत्तास्थानी असतानाही लोकसेवेलाच आपल्या जीवनाचे ध्येय मानले. नैतिकता आणि मूल्यांशी जीवनात कधी तडजोड केली नाही, अशाच आदर्शवादी नेत्यांमध्ये प्रा. वर्दे अग्रणी होते.
प्रा. सदानंद वर्दे यांचा जन्म दि. ६ नोव्हेंबर १९२५ रोजी कोकणातील कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथे झाला. राष्ट्र सेवा दलात कार्यरत असतानाच स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते सक्रिय होते. नंतर बांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. मुंबई महानगर पालिकेत १९६० च्या दशकात ते नगरसेवक होते. १९७५ मध्ये त्यांनी आणीबाणीकालीन तुरुंगवास भोगला. १९७७ मध्ये देशात जनता पार्टीचे सरकार आले, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रा. वर्दे बांद्रा मतदारसंघातून जनता पार्टीतर्फे निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये त्यांनी १९७८ ते १९८० या काळात शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य या खात्याचे मंत्रीपद भूषविले होते .
शिक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अविस्मरणीय ठरली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांसाठी घेतलेला एक निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. सुरुवातीला शिक्षकांचा पगार शैक्षणिक संस्थांतर्फे दिला जात असे, प्रा. वर्दे याच्या निर्णयामुळे शिक्षकांचा पगार बॅंकेमार्फत देणे सुरू झाले. विधानसभेनंतर १९८२ मध्ये प्रा. वर्दे सर कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेत निवडून आले, तेव्हा त्यांनी मुंबई, कोकण, पदवीधर एवढीच क्षेत्रमर्यादा न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न विधीमंडळात मांडले. नागपूरच्या अविकसित आणि गरिबांच्या वस्त्यांचे अनेक नागरी प्रश्न प्रा. वर्दे सरांनी तेव्हा विधिमंडळामार्फत सोडविले होते.
त्यांचा नैतिक दरारा आणि आदर प्रचंड होता. विधिमंडळ, मंत्रालय, मुख्यमंत्री निवासापर्यंत सर्वत्र त्यांना मुक्त प्रवेश असे. सचोटीने काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळींचे ते आधारस्तंभ होते. नामांतर चळवळ आणि रिडल्स प्रकरणात ते दलितांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले.
राष्ट्र सेवादलाच्या मुशीतून तयार झालेले प्रा. वर्दे आणि त्यांच्या पत्नी सुधाताई वर्दे या दाम्पत्याने महाराष्ट्रावर आपल्या सेवाभावी वृत्तीचा अमीट ठसा उमटवला आहे. साप्ताहिक साधना, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, युसूफ मेहरअली सेंटर, बॅ. नाथ पै सेवांगण अशा अनेक सेवाभावी संस्थांमध्ये ते अखेरपर्यंत सक्रिय होते.
लातूरच्या भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनाथ मुलांसाठी नळदुर्ग येथे पन्नालाल सुराणा यांच्या मदतीने ‘आपले घर’ नावाचे वसतिगृह आणि विद्यालय उभारण्यात वर्दे सर आणि सुधाताईंचा अतिशय मोलाचा सहभाग होता. लोकशाही समाजवाद, धर्मनिरपक्षतेवर जाज्वल निष्ठा असलेल्या वर्दे सरांचे २९ जानेवारी २००७ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबईत निधन झाले, तेव्हा संपूर्ण चळवळ हळहळली. या पिढीतील तत्वनिष्ठ राजकारणी प्रा. ग. प्र. प्रधान, मृणालताई गोरे, भाई वैद्य हे एकापाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड गेले.
राजकारणात राहूनही अतिशय साधे, सरळ, स्वच्छ जीवन जगणारी अशी व्यक्तिमत्त्वे आता दुर्मीळच!