विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

By विजय दर्डा | Published: January 29, 2024 08:13 AM2024-01-29T08:13:18+5:302024-01-29T08:14:14+5:30

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर हे देशाचेच मंदिर बनले आहे. श्रद्धेला उधाण आलेले असताना रामराज्याच्या संकल्पनेचे उद्दिष्ट अधिक महत्त्वाचे!

Special Article: ...Ram Rajya must come now! | विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

- डाॅ. विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, 
लोकमत समूह) 

सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वीच्या काळ्या पाषाणातून तयार करण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हा केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे डोळे अयोध्येवर खिळले होते. भारतात श्रद्धेला असे उधाण आलेले स्वातंत्र्यानंतर कोणी क्वचितच पाहिले असेल. २२ जानेवारी या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी दिवाळी नसतानाही सगळ्या देशात दिव्यांचा झगमगाट झाला; कारण अयोध्येमध्ये शेकडो वर्षांची तपस्या आणि बलिदानानंतर मंदिर उभे राहिले आहे. रामलल्ला केवळ अयोध्येत आलेले नाहीत तर संपूर्ण देशात मानवतेचे मंदिर उभे राहिले आहे.

यामागच्या राजकारणात मी जात नाही. ३७० व्या कलमाविषयी मी म्हटले होते की देशाच्या अखंडतेसाठी हे कलम हटवणे अत्यंत गरजेचे होते. त्याचा फायदा कोणाला झाला असेल तर भले होवो. राममंदिराच्या मागेही राजकारण आहे; परंतु केवळ राजकीय कारणांनी एखाद्या मंदिराच्या उभारणीने जनमानसात असे श्रद्धेला उधाण येऊ शकते? थंडीत कुडकुडणाऱ्या उत्साही गर्दीच्या मागे माणुसकीचा धडा शिकवणारे प्रभू श्रीरामांचे व्यक्तित्त्व आहे. आपण ज्या कल्याणकारी राज्याची कल्पना करत आलो, त्यालाच तर रामराज्य म्हटले जाते.

प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनाकडे पाहिले तर ते वनवासी, शोषित आणि वंचितांचे नायक असल्याचे स्पष्टपणे दिसते. अयोध्येहून वनवासाला निघाले तेव्हा काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग त्यांनी यासाठी निवडला की सामान्य माणसाच्या हालअपेष्टा समजू शकतील. श्रीरामरायांचा साधेपणा पाहा... नदी पार करून देण्यासाठी ते नावाड्याला विनंती करतात आणि पलीकडे पोहचल्यानंतर कृतज्ञतेच्या भावनेने त्यालाही हृदयाशी धरतात. शबरीची उष्टी बोरे खाऊन ते भावुक होतात. आपल्या १४ वर्षांच्या वनवासात ते वनवासींची एकजूट करताना दिसतात.

वास्तविक, प्रभू श्रीराम राजपुत्र! त्यांनी मनात आणले असते तर माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी त्यांच्या पादुका समोर ठेवून राज्य करणारा त्यांचा बंधू भरत याला  सैन्यासह बोलावता आले असते; किंवा दुसऱ्या साम्राज्यांकडून  सैन्याची मदतही घेता आली असती. परंतु त्यांनी तसे केले नाही. वनवासी आणि जनजातीय समुदायांना एकत्रित करून श्रीरामांनी आपले सैन्य उभे केले. सैन्य उभारणीचे आणि सामाजिक एकजुटीचे असे दुसरे उदाहरण अन्य देशांच्या इतिहासात मिळणार नाही. याच कारणाने आदिवासींच्या लोकगीतात आणि श्रुती परंपरेने चालत आलेल्या गोष्टींमध्येही त्यांचे नाव सर्वत्र आढळते. श्रीरामांची व्यापकता पूर्ण भारतीय द्वीपकल्पात दिसते. कंबोडिया, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान, सुमात्रा, थायलंड, मलेशिया, लाओस इतकेच नव्हे तर  सर्वांत मोठे मुस्लिम राष्ट्र इंडोनेशियाच्या संस्कृतीतही प्रभू श्रीराम यांचे अस्तित्व  दिसते.  बालीमध्ये मोठ्या प्रमाणावर रामलीला सादर केली जाते.

प्रभू श्रीराम साम्राज्यवादाच्या विरोधात होते. त्यांनी मनात आणले असते तर बालीचा वध केल्यानंतर किष्किंधा आणि रावणाच्या वधानंतर श्रीलंकेला अयोध्येचे मांडलिक राष्ट्र करू शकत होते. परंतु त्यांनी किष्किंधा सुग्रीवाच्या हाती आणि श्रीलंका विभीषणाच्या हाती सोपविली. आज जगातील प्रत्येक देश श्रीरामाप्रमाणे आचरण करू लागेल तर सध्या वाहणाऱ्या रक्ताच्या नद्या बंद होतील आणि माणूस माणसाच्या जीवावर उठणार नाही. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर  प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी अयोध्येत मंदिर उभे राहत असेल तर कोणाला आनंद होणार नाही? हे केवळ सनातन धर्माचे मंदिर नाही तर जैन, बौद्ध आणि शिखांसाठीही अयोध्या हे आराध्य स्थळ आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्याबरोबरच आणखी तीन तीर्थंकरांची ती पुण्यभूमी आहे. काही लोक असे मानतात की या संपूर्ण प्रकरणात एका समुदायावर अन्याय झाला आहे. अख्ख्या देशाचे मला माहीत नाही, परंतु अयोध्येतील माझा एक मित्र म्हणाला, ‘आमच्या पूर्वजांचे आयुष्य संघर्ष करण्यात संपले; परंतु आता आम्हाला या मंदिरामुळे रोजीरोटी मिळेल.’ भुकेला धर्म नसतो. आता श्रीरामाच्या उद्घोषात आक्रोश नव्हे, तर सद्भावना आणि करुणेचा भाव दिसू लागला आहे. अयोध्या नगरीचा चेहरामोहरा पालटल्याचा मोठा आनंद मुस्लिम समुदायालाही आहे. देशाचे काेनेकोपरे रस्ते आणि हवाई मार्गे अयोध्येशी जोडले जात आहेत. जगभरातील भाविकांसाठी सुसज्ज विमानतळ आहे. नवी हॉटेल्स, धर्मशाळा उभ्या राहत आहेत. दरवर्षी लाखो भाविक जगभरातून अयोध्येत येतील. या शहराची संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदलते आहे. रोजगाराच्या अधिक संधी आता उपलब्ध होतील.  गोव्याला जातात, त्याहून कितीतरी अधिक लोक अयोध्येला जात आहेत. भविष्यात हे नगर व्हॅटिकन सिटीसारखे रूप धारण करील.

अयोध्येत राममंदिर तर उभे राहिले आहे; आता भविष्याकडून कोणती अपेक्षा करावी? आता अपेक्षित आहे ते संपूर्ण रामराज्य! प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले ते खरेच,  की आपण मंदिरापासून समरसता,  मैत्रभाव आणि धर्मनिरपेक्षतेची प्रेरणा घेतली पाहिजे; आणि पराक्रम, पुरुषार्थ व समर्पणाचा नैवेद्य दाखवला पाहिजे. हीच तर रामराज्याची कल्पना आहे. रोमारोमात धर्मनिरपेक्षता भिनलेले राष्ट्रपिता महात्मा गांधीही रामराज्याची कल्पना मांडत असत. वास्तविक अर्थाने शोषित, वंचित आणि उपेक्षितांचे भाग्य बदलायचे असेल तर रामराज्य आणले पाहिजे आणि त्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच आपण सर्वांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तेव्हाच आपण संपूर्ण सामर्थ्याने म्हणू शकू- ‘जय श्रीराम!’

Web Title: Special Article: ...Ram Rajya must come now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.